Advertisement

मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी शरद पवार, मुख्यमंत्री प्रयत्नशील

किमान मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनची सुविधा मिळावी, जेणेकरून त्यांना जलद प्रवास करता येईल. यासाठी लवकर निर्णय करणं आवश्यक आहे.

मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी शरद पवार, मुख्यमंत्री प्रयत्नशील
SHARES

मुंबईची लोकल ट्रेन (mumbai local train) सेवा सुरू करण्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं एकमत असून दोघांकडूनही तसे प्रयत्न करण्यात येत आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (ncp chief sharad pawar) यांच्यातील बैठकीत महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. शिवाय मुंबई, ठाण्यात काय उपाययोजना करण्यात आल्या, कुठल्या सेवा सुरू करता येऊ शकतील यावरही चर्चा झाली. या बैठकीला मंत्री जयंत पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत, राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता उपस्थित होते. 

हेही वाचा - परप्रांतीय मजुरांची यादी तर दिली, फक्त गोरखपूरला निघालेली ट्रेन ओडिशाला पोहचू नये- संजय राऊत

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईतील लोकल ट्रेनची सेवा सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी राज्य सरकारची इच्छा आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना एकदा नव्हे, तर तीनदा लेखी पत्रं देखील पाठवली आहेत. परंतु मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याविषयी अद्याप तरी रेल्वे मंत्रालयाकडून कुठलाही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. 

त्याशिवाय परप्रांतीयांसाठी अधिकाधिक विशेष श्रमिक ट्रेन सोडण्यात याव्यात यावरही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं एकमत आहे. परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी अधिक ट्रेन उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी राज्य सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारकडे करण्यात येत आहे. परंतु अजून तरी जास्त ट्रेन उपलब्ध झालेल्या नाहीत.  

केंद्राकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला, त्यावेळीच मुख्यमंत्र्यांनी रेल्वेकडे परप्रांतीय मजुरांना सोडण्यासाठी ट्रेन सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पुन्हा तीन वेळा लेखी मागणी करण्यात आली. त्याचसोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी या विषयावर बोलत आहेत. किमान मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनची सुविधा मिळावी, जेणेकरून त्यांना जलद प्रवास करता येईल. यासाठी लवकर निर्णय करणं आवश्यक आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं.

हेही वाचा - परप्रांतीय परत जाताहेत, येत्या १५ दिवसांत देशाचं खरं चित्र समोर येईल- उद्धव ठाकरे

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा