Advertisement

गडकरी म्हणतात 'युती राहिलीच पाहिजे'

मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत गडकरींनी सेनेसोबत युती राहायला हवी, असं वक्तव्य केलं आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर आमची सेनेसोबत युती आहे. थोडं फार कधी तरी इकडं तिकडं होतं. पण आमचं म्हणजे तुझं माझं जमेना तुझ्याविना करमेना अशी जी मराठीत म्हण आहे तसं असल्याचं म्हणत गडकरींनीही आता सेनेला जवळ आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

गडकरी म्हणतात 'युती राहिलीच पाहिजे'
SHARES

राज्यासह केंद्रात भाजपला साथ देणाऱ्या शिवसेनेचं गेल्या काही वर्षांपासून चांगलंच खटकू लागलं आहे. इतकं की, आता शिवसेनेनं भाजपाला दूर लोटत आगामी निवडणुका युतीशिवाय स्वबळावर लढवण्याचं जाहीर केलं आहे. तर भाजपाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडत त्यांच्यावर आगपाखड करण्याची एकही संधी सेना सोडताना दिसत नाही.


सेनेला गोंजारण्यास सुरुवात

एकीकडं मित्रपक्षांची ही नाराजी नि दुसरीकडं विरोधीपक्षांनी भाजपासरकारविरोधात बांधलेली मोट हे लक्षात घेता भाजपाला शिवसेनेला दुखावणं परवडणारं नाही. त्यामुळेच आतापर्यंत राज्यपातळीवरील भाजप नेते सेनेला गोंजरताना दिसत होते, तिथं आता केंद्रातील नेत्यांनीही सेनेला गोंजारण्यास सुरुवात केली आहे.


काय म्हणाले गडकरी?

मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत गडकरींनी सेनेसोबत युती राहायला हवी, असं वक्तव्य केलं आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर आमची सेनेसोबत युती आहे. थोडं फार कधी तरी इकडं तिकडं होतं. पण आमचं म्हणजे तुझं माझं जमेना तुझ्याविना करमेना अशी जी मराठीत म्हण आहे तसं असल्याचं म्हणत गडकरींनीही आता सेनेला जवळ आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे आता यावर सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणतात याकडंच सर्वांचं लक्ष लागलं आहे.


इंधन दरवाढीवरही दिली प्रतिक्रिया

गेल्या १६ दिवसांपासून होणारी इंधनवाढ, पालघर पोटनिवडणुकीतील ईव्हीएम घोळ आणि भाजप सरकारची चार वर्षे या सर्व पार्श्वभूमीवर गडकरींची पत्रकार परिषद होत असल्यानं गडकरी या विषयांवर नेमकं काय बोलणार याकडेच सर्वांच लक्ष लागलं होतं. त्याप्रमाणे गडकरींनी या सर्वच विषयांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

इंधन दरवाढीबाबत बोलताना गडकरींनी इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणलं तर दर कमी होतील, त्याचा राज्यांना फायदा होईल, असं म्हणत त्यादृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यासाठी जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत लवकरच निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितंल आहे.


सरकारच्या कामगिरीचा पाढा

अच्छे दिन हे मानण्यावर असतात असं म्हणत त्यांनी चार वर्षांतील सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचला. गरीबांना स्वस्तात घर देण्याचा सरकारचा प्रयत्न असून त्याअनुषंगानं नागपूरमध्ये साडे तीन लाखांत घर विकत घेता येईल, अशी घर बांधली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.


पालघर पोटनिवडणुकीबद्दल...

पालघर पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशिन बंद पडणं ही गंभीर बाब असल्याचं म्हणत गडकरींना निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र यंत्राणा असून त्यांनी याकडं गांभीर्यानं लक्ष द्यावं असं स्पष्ट केलं आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेस जिंकल्यावर ईव्हीएम योग्य आणि उत्तर प्रदेशात हरल्यावर मशिनमध्ये गडबड असं कसं असा सवाल करत ईव्हीएम मशिन गोंधळावरून काँग्रेसलाही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न त्यांनी यावेळी केला.


मुख्यमंत्र्यांची केली पाठराखण

पालघर निवडणुकीच्या प्रचारसभेत सेनेकडून मुख्यमंत्र्यांची जी आॅडिओ क्लिप एेकवण्यात आली त्याबद्दलही गडकरींनी भाष्य करत मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे.

मुख्यमंत्र्यांना आपण लहानपणापासून ओळखतो, ते असं कधीही बोलणार नाहीत, ते सुसंस्कृत आहेत असं सांगतानाच गडकरींना साम, दाम, दंड आणि भेद याचा मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असलेला अर्थही सांगितला आहे. त्याचा अर्थ म्हणजे निवडणुका जिंकण्यासाठी सर्व ताकद लावा, असा होता असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा - 

'हो ती क्लिप माझीच, पण...' - मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेवर पलटवार!

'शिवाजीचं नाव घेऊन अफझलखानासारखं काम', योगीचा शिवसेनेवर बाण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा