Advertisement

अखेर उर्मिला मातोंडकर यांच्या हाती शिवबंधन, केला शिवसेनेत अधिकृत प्रवेश

मागील महिन्याभरापासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत अखेर बाॅलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश केला आहे.

अखेर उर्मिला मातोंडकर यांच्या हाती शिवबंधन, केला शिवसेनेत अधिकृत प्रवेश
SHARES

मागील महिन्याभरापासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत अखेर बाॅलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या कोट्यातून विधान परिषदेत जातील, यावरही जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी सकाळी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (uddhav thackeray) यांच्या उपस्थितीत आणि रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला, अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे. 

मुंबईतील प्रसारमाध्यमांशी बोलताना, शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी उर्मिला मातोंडकर या शिवसैनिकच आहेत. बहुदा त्या उद्या शिवसेनेत प्रवेश करतील, त्यांच्या पक्षात येण्याने महिला आघाडी मजबूत होईल, असं वक्तव्य सोमवारी केलं होतं. त्यानंतर चर्चांनी वेग धरला असता उर्मिला मातोंडकर यांनी स्वत: मंगळवारी संध्याकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार असल्याची माहिती दिली. तुम्ही सर्वजण देत असलेल्या पाठिंब्याबाबत आभार. कृपया कोरोनाचे नियम पाळून उपस्थित राहा, जय महाराष्ट्र, असं म्हणत उर्मिला मातोंडकर यांनी प्रसारमाध्यमांना निमंत्रीत केलं. 

हेही वाचा- बाॅलिवूडमधील वादावर आदित्य ठाकरेंनी सोडलं मौन, म्हणाले…

गेल्या वर्षी म्हणजेच २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काँग्रेसकडून त्यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं. मात्र भाजपचे तगडे उमदेवार गोपाळ शेट्टी यांनी उर्मिला मातोंडकर यांचा या निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभव केला. काँग्रेस नेते, पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव, कार्यकर्त्यांची न मिळालेली साथ आपल्या पराभवाला कारणीभूत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. एवढंच नव्हे, तर मुंबई काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष मिलिंद देवरा यांना पराभवाची कारणमिमांसा करणारं त्यांनी लिहिलेलं पत्र माध्यमांसमोर आल्याने एकच खळबळ उडाली होती.  

त्यानंतर त्यांनी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून काँग्रेसला रामराम ठोकला असला, तरी त्या अधूनमधून काही महत्त्वाच्या राजकीय-सामाजिक विषयांवर व्यक्त होत होत्या. त्यातच अभिनेत्री कंगना रणौतने कलाकार-ड्रग्ज माफिया कनेक्शन, बाॅलिवूडमधील घराणेशाही आणि मुंबईची पाकव्याप्त काश्मीरसोबत तुलना करून वाद ओढावून घेतल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी माध्यमांसमोर येऊन तिला सडेतोड उत्तर दिलं होतं. 

शिवसेना विरूद्ध कंगना अशा वादात उर्मिलाने अप्रत्यक्षरित्या शिवसेनेची (shiv sena) भूमिका मांडल्याने शिवसेना पक्षनेतृत्वाने त्यांना पक्षात योग्य संधी देण्याचं ठरवत विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी एका जागेसाठी त्यांच्या नावाची शिफारस केली. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी उर्मिला यांच्यासोबत चर्चा केली होती.

 हेही वाचा- उर्मिला मातोंडकर करणार शिवसेनेत प्रवेश?

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा