Advertisement

पालिका मलिष्कावर दावा ठोकणार का नाय?


पालिका मलिष्कावर दावा ठोकणार का नाय?
SHARES

रेडिओ एफ एमची आरजे मलिष्काने मुंबईतल्या समस्यांसाठी मुंबई पालिकेला आणि पर्यायाने शिवसेनेला 'सोनु तुझा माझ्यावर भरोसा नाय का' या गाण्यातून लक्ष्य केले होते. एकप्रकारे पालिकेच्या कारभाराची 'पोलखोल'च या गाण्यातून करण्यात आली होती. आणि त्यावर संतापलेल्या शिवसेनेने मलिष्कावर 500 कोटींचा मानहानीचा दावाही ठोकण्याची मागणी केली होती. मात्र शिवसेनेच्या या राणा भीमदेवी थाटातल्या मागणीला पालिका प्रशासनाने चक्क केराची टोपलीच दाखवल्याचं सध्या तरी दिसून येत आहे.


शिवसेना नरमली?

मलिष्का हा विषय महापालिकेसाठी संपलेला असून अशाप्रकारे मानहानीचा दावा ठोकण्याची प्रशासनाची कोणतीही इच्छा नाही. तसेच, खुद्द शिवसेनेकडून या प्रकरणाबाबत नारमाईची भूमिका घेतल्यामुळे आयुक्तांनी दावा न ठोकण्याचा निर्धार केल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.


काय केलं होतं मलिष्कानं...

सोनू तुला बीएमसीवर भरवसा नाय काय...या गण्याद्वारे एफएम रेडिओ 93.5 वरून आरजे मालिष्काने महापालिकेवर विडंबन गीत गायले. या गाण्याद्वारे तिने मुंबईतील खड्डे, ट्रॅफिक, पावसात पाण्यामुळे रखडणारी रेल्वे लोकल आदी समस्या मांडल्या होत्या. या गाण्यामुळे सत्ताधारी पक्ष असलेली शिवसेना चांगलीच अस्वस्थ झाली आणि त्यांनी मलिष्काला टार्गेट करण्यास सुरुवात केली.

मलिष्काला इंगा दाखवण्यासाठी मग शिवसेनेच्या वतीने युवा सेनेचे पदाधिकारी असलेले नगरसेवक समाधान सरवणकर आणि अमेय घोले यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन मलिष्का आणि तिच्या 93.5 रेड एफएम रेडीओवर 500 कोटींचा दावा ठोकण्याची मागणी केली होती. एकप्रकारे महापालिकेची प्रतिमा मालिन करण्याचा हा कुटील डाव असून यामुळे अविरत सेवा बजावणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे या रेड एफएमवर कडक कारवाई करून अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची मागणी त्यांनी 18 जुलै रोजी केली होती.


सेनेच्या निवेदनाला केराची टोपली?

मात्र, महापालिकेच्या विधी विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे अशाप्रकारे दावा ठोकणारे कोणतेही पत्र आलेलेच नाही! त्यामुळे अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा तूर्तास तरी कोणताही निर्णय प्रशासनाने घेतला नसल्याचे या विभागाकडून समजते. तर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे निवेदन बाजूला ठेवले असून त्यावर कोणतीही प्रक्रिया करण्यात आलेली नाही. त्यामुळे किमान सध्यातरी पालिकेकडून आरजे मलिष्काला अभयच देण्यात आल्याचं दिसून येत आहे.



हेही वाचा

बीएमसीवरच्या 'भरोसा'ला सोशल साईट्सवर तडा!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा