Advertisement

मुंबई पालिकेतली समीकरणं बदलणार?


मुंबई पालिकेतली समीकरणं बदलणार?
SHARES

मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या पारड्यात मुंबईकरांनी कौल टाकला. आघाडी की बिघाडी या वादानंतर सरतेशेवटी मोठ्या नाट्यमय पद्धतीने सत्ता स्थापन झाली. मात्र त्यानंतरही या दोन्ही पक्षांमध्ये सुंदोपसुंदी सुरुच आहे. त्यातच आता भर पडली आहे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नव्या वक्तव्यामुळे. 'मुंबई पालिकेतली समिकरणं बदलणार' असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं आहे.


का बदलू शकतं समीकरण?

फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये वॉर्ड क्रमांक 116मधून काँग्रेसच्या प्रमिला पाटील विजयी झाल्या. निकालानंतर मुंबईतील एकूण 227 वॉर्डांपैकी शिवसेनेला 84, भाजपा 82, काँग्रेस 31, राष्ट्रवादी 9, मनसे 7 आणि इतर उमेदवारांना 14 जागांवर विजय मिळाला. त्यामुळे 84 जागांसह सर्वात मोठा पक्ष शिवसेना ठरला. मात्र दोनच महिन्यांपूर्वी प्रमिला पाटील यांचं निधन झालं आणि 116 वॉर्डमधली जागा रिक्त झाली. 


आशिष शेलारांचं शिवसेनेला आव्हान?

दरम्यानच्या काळात प्रमिला पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील आणि सून जागृती पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आणि आता या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकांसाठी प्रमिला पाटील यांच्या सून जागृती पाटील निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महापालिकेतील शिवसेना आणि भाजपाचे 84-82 जागांचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. आणि हीच संधी साधून आशिष शेलार यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष आव्हान दिलं आहे.

भांडुपमधील वॉर्ड क्रमांक 116 मधून भाजपा पोटनिवडणूक लढवणार आहे. यातून आम्ही मुंबई महापालिकेतील 84-82 चे समीकरण बदलणार आहोत.

आशिष शेलार, मुंबई अध्यक्ष, भाजपा


नव्या समीकरणांच्या चर्चेला ऊत

पालिका निकालांनंतर भाजपने कोणत्याच पदावर दावा न करता माघार घेतल्याने मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर विराजमान झाले. मात्र 116 वॉर्डमधल्या पोटनिवडणुकीमुळे पालिकेतली गणितं बदलतात का? जर बदलली तर ते कुणाला भारी पडेल? शिवसेनेला की भाजपाला? आणि भाजप वरचढ ठरला, तर महापौर बदलतील का? अशा अनेक प्रश्नांच्या भोवती चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र राजकारणात कशाचा काही नेम नाही, कधीही काहीही होऊ शकतं, अशा पूर्वापार चालत आलेल्या उक्तीनुसार प्रत्यक्ष निवडणूक झाल्यानंतरच याबद्दलचं अधिक चित्र स्पष्ट होऊ शकेल.



हेही वाचा - 

शिवसेना-भाजपामधलं अंडरस्टँडिंग

शिवसेना-भाजपाचं उल्लू बनाविंग !


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा