Advertisement

वरळीतून आदित्य लढवणार निवडणूक?

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे वरळीतून विधानसभा लढवण्याचा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

वरळीतून आदित्य लढवणार निवडणूक?
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे वरळीतून विधानसभा लढवण्याचा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. सद्यस्थितीत वरळीची जागा शिवसेनेकडेच असून ही जागा आदित्य यांना विधानसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने भरवशाची म्हटली जात आहे. 

मुख्यमंत्रीपदासाठी नाव

लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीला राज्यात मोठं यश मिळाल्यानंतर शिवसेनेने आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. भाजपाने ऐन वेळी दगा दिलाच तर ‘एकला चालो रे’ चा नारा देत शिवसेनेने विधानसभेच्या सर्व जागा लढवण्यासाठी कंबर कसली आहे. आदित्य यांची ‘जन आशीर्वाद यात्रा’ त्याचाच भाग असल्याचं म्हटलं जातं. त्यातच मागील काही दिवसांपासून आदित्य विधानसभा निवडणूक लढवतील, अशा अटकळी बांधल्या जात आहेत. मुख्यमंत्री कुणाचा? यावरून भाजपासोबत काथ्याकूट करणाऱ्या शिवसेनेकडून आदित्य यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढं केलं जात असल्याचंही दिसून येत आहे.  

नवा पायंडा

आजवर ठाकरे कुटुंब महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलं तरी कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीने प्रत्यक्ष निवडणूक लढलेली नाही. पण राजकारणातील सक्रिय सहभागाबाबत आदित्य यांनी अनेकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पदाधिकाऱ्यांचा आग्रह मान्य करून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास ठाकरे कुटुंबासाठी नवा पायंडा ठरू शकतो.  

सुरक्षित वरळी

आदित्य यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघाची चाचपणीही शिवसेनेकडून केली जात असल्याचं म्हटलं जात आहे.  त्यांच्यासाठी वरळी, माहीम, शिवडी किंवा वांद्रे पूर्व हा मतदार संघ सुरक्षित असल्याचं मानलं जातं. काही दिवसांपूर्वी आदित्य यांनी वरळी आणि माहीम विधानसभा मतदारसंघातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची दादर येथील शिवसेना भवनात बैठक घेतली होती. तर शिवसेनेचा बाल्लेकिल्ला असलेल्या वरळी मतदारसंघातील आमदार सुनील शिंदे यांनी आपल्याकडील जागा सोडण्याची स्वतःहून तयारी दर्शवली होती. 

सुरक्षीत मतदारसंघ

गेल्या निवडणुकीत वरळी विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी सचिन अहिर यांचा पराभव केला असला, तरी या क्षेत्रात अजूनही अहिर यांची पकड असल्याचं मानलं जातं. त्यामुळे अहिर यांना आपल्या गोटात सामील करून शिवसेना नेतृत्वाने हा विरोधच एकप्रकारे मोडीत काढला आहे. त्याऐवजी अहिर यांना भायखळ्याची जागा देण्याचा किंवा विधानपरिषदेवर पाठवण्याचा शिवसेनेचा विचार आहे.   आदित्य यांनी वरळीतून विधानसभा निवडणूक लढवल्यास वरळीतील प्रेम नगर, सिद्धार्थ नगर, जिजामाता नगर, गांधी नगर आणि बीडीडी चाळीतील एकगठ्ठा मतं आदित्य यांच्या पाठिशी उभी राहतील. त्यामुळे वरळीतून विधानसभा निवडणूक लढवण्याचा आदित्य यांचा मार्ग मोकळा झाल्याचं म्हटलं जात आहे.



हेही वाचा-

प्रवाहाविरोधात लढण्याची हिंमत नव्हती म्हणून अहिर गेले- नवाब मलिक

सचिन अहीर शिवसेनेत, हाती बांधलं शिवबंधन



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा