Advertisement

घराचं बुकिंग करताना विचार करूनच पैसे भरा, नाहीतर...


घराचं बुकिंग करताना विचार करूनच पैसे भरा, नाहीतर...
SHARES

आयुष्याची जमापुंजी लावून एखाद्या प्रकल्पात घराचं बुकिंग करत असाल सावधान. कारण मोठी रक्कम भरत तुम्ही घराचं बुकिंग केलं आणि पुढं जर काही कारणानं घरखरेदीचा निर्णय रद्द करावा लागला, तर तुमचं तेलही गेलं नि तुपही गेलं अशी गत होऊ शकते. ग्राहक कोणतंही ठोस कारण न देता घर रद्द करत असेल आणि त्यातही बिल्डरकडून कोणत्याही नियमांचं उल्लंघन झालेलं नसेल तर ग्राहकाला बुकिंगसाठी भरलेली रक्कम परत मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच महारेरानं दिला आहे.


काय आहे प्रकरण?

शत्रुंजय सिंग या ग्राहकानं मिरा रोडमधील आर्केड आर्ट-फेज-२ या प्रकल्पात ९५ हजार ८२७ रुपये भरत घर बुक केलं. पण त्यानंतर घराची पूर्ण रक्कम भरणं त्यांना शक्य न झाल्यानं त्यांनी घर घेण्याचा निर्णय रद्द केला. त्यानुसार बिल्डरकडं आपण भरलेली घराची रक्कम परत मिळावी अशी मागणी केली. पण नियमानुसार घराचं बुकिंग रद्द करायचं असेल, तर घराच्या एकूण रक्कमेच्या ५ टक्के रक्कम बिल्डरकडून कापून घेतली जाते. हे घर ४८ लाख रुपये किमतीचं असल्यानं बिल्डरनं ही रक्कम परत देण्यास स्पष्ट नकार दिला.


बिल्डरच्या बाजूने निकाल

बिल्डर बुकिंगची रक्कम परत देत नसल्याने सिंग यांनी काही दिवसांपूर्वी महारेराकडं तक्रार नोंदवली आणि बुकिंगची रक्कम परत देण्याची मागणीही महारेराकडं केली. या तक्रारीवर नुकतीच महारेरात सुनावणी पार पडली. त्यात महारेरानं सिंग यांची तक्रार फेटाळून लावत बिल्डरच्या बाजूनं निकाल दिला.


नियमांचं उल्लंघन नाही

मुळात महारेराच्या नियमानुसार जर बिल्डरनं घराचं बांधकाम सांगितल्याप्रमाणं केलं नाही, निश्चित क्षेत्रफळापेक्षा कमी क्षेत्रफळ दिलं, ताबा देण्यास विलंब केला, प्रकल्प रखडवला तरच ग्राहकाला बुकिंगची रक्कम परत मिळते. पण या प्रकरणात बिल्डरकडून अशा कोणत्याही नियमांचं उल्लंघन झालेलं नाही.


रक्कम कापण्याचा अधिकार

घर खरेदीची उर्वरीत रक्कम भरू शकत नसल्यानं ग्राहक घराचं बुकिंग रद्द करत असेल, तर बिल्डरकडून त्याला बुकिंगची रक्कम परत मिळणार नाही, असा निर्वाळा महारेरानं दिला. नियमानुसार बिल्डरला बुकींग रद्द करण्यासाठी आवश्यक ती रक्कम कापून घेण्याचा, ठराविक रक्कम परत न करण्याचा अधिकार असल्याचं या निर्णयावरून शिक्कामोर्तब झालं आहे.


नोटाबंदीचं कारण पटलं नाही

दरम्यान, याआधीच्या तक्रारीत काही ग्राहकांना घराच्या बुकिंगसाठीची रक्कम परत मिळाल्यानं घराचं बुकिंग रद्द करणाऱ्या ग्राहकांकडून बुकिंगची रक्कम परत मिळावी यासंबंधीच्या तक्रारी येत आहेत. मात्र या आधीच्या प्रकरणात बिल्डरकडून काही तरी चूक झाल्यानं, नियमांचं उल्लंघन झाल्यानं ग्राहकांना घराची रक्कम परत मिळाली. पण सिंग यांच्या प्रकरणात तसं काही नसल्यानं महारेरानं त्यांची तक्रार फेटाळून लावली. त्यामुळे त्यांना ९५ हजार रुपयांवर पाणी सोडावं लागलं. मुळात सिंग यांनी दिलेलं नोटबंदीचं कारणही महारेराला पटलेलं नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं घर बुकिंग करताना विचार करा आणि मगच पैसे भरा.



हेही वाचा-

तुरूंगातील बिल्डरला महारेराचा दणका, आठवड्याभरात घराची नोंदणी करून घेण्याचे आदेश

'महारेरा'त तक्रार दाखल झाली नि 'लोढा' बिल्डर नरमले!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा