Advertisement

सरकारची असंवेदनशीलता, आचरेकर सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार नाहीत

आचरेकर यांनी क्रिकेटपटूंची एक दोन नव्हे, तर तीन पिढ्या घडवल्या होत्या. त्यांच्या प्रशिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव म्हणून भारत सरकारने आचरेकर यांना 'द्रोणाचार्य' आणि पद्म पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. त्यानुसार आचरेकर सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणं अपेक्षित होतं. पण तसं न झाल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली.

सरकारची असंवेदनशीलता, आचरेकर सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार नाहीत
SHARES

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यासहित क्रिकेटविश्वाला असंख्य नावाजलेले खेळाडू देणारे क्रिकेटचे 'द्रोणाचार्य' रमाकांत आचरेकर यांच्यावर गुरूवारी सकाळी दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. द्रोणाचार्य आणि पद्म पुरस्कारप्राप्त आचरेकर सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात न आल्याने उपस्थितांनी यावेळी चांगलीच नाराजी व्यक्त केली.


राहत्या घरी निधन

दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील त्रिमूर्ती इमारतीत आचरेकर सर रहात होते. बुधवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास राहत्या घरीच हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. गुरूवारी सकाळी आचरेकर सरांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या राहत्या घराजवळच ठेवण्यात आलं होतं. यावेळी त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक दिग्गजांनी गर्दी केली होती. यावेळी शिवाजी पार्क मैदानात सराव करणाऱ्या लहान क्रिकेटपटूंनी बॅट उंचावत त्यांना अखेरचं अभिवादन केलं.


सचिनला अश्रू अनावर

सकाळी १० वाजेच्या सुमारास सचिन तेंडुलकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडीत, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, भाजपा मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांसह अनेक दिग्गज क्रिकेटर, आचरेकर सरांचे शेकडो शिष्य, क्रिकेट विश्वातील मान्यवर आणि स्थानिक नेते आचरेकर सरांच्या घरी अंत्यदर्शनासाठी पोहोचले.


अंत्यदर्शनानंतर दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत हिंदू पद्धतीने त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला. या प्रसंगी सचिनसह, विनोद कांबळी, चंद्रकांत पंडीत यांना अश्रू अनावर झाले.


उपस्थितांकडून नाराजी

आचरेकर यांनी क्रिकेटपटूंची एक दोन नव्हे, तर तीन पिढ्या घडवल्या होत्या. त्यांच्या प्रशिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव म्हणून भारत सरकारने आचरेकर यांना 'द्रोणाचार्य' आणि पद्म पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. त्यानुसार आचरेकर सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणं अपेक्षित होतं. परंतु राज्याच्या क्रीडा विभागातील अधिकारी शेवटच्या क्षणी अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहिल्याने तसंच सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न झाल्यामुळे उपस्थितांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. सरकारला आचरेकर सरांच्या कार्याचा विसर पडल्याची प्रतिक्रियाही अनेकांनी दिली.



हेही वाचा-

जाणून घेऊया रमाकांत आचरेकरांचा प्रवास..

क्रिकेटचे भीष्माचार्य रमाकांत आचरेकर यांचं मुंबईत निधन



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा