25 वर्षांपूर्वीचे जन्म-मृत्यू दाखले मिळणार ऑनलाईन

 Pali Hill
25 वर्षांपूर्वीचे जन्म-मृत्यू दाखले मिळणार ऑनलाईन

मुंबई - सन 1988 पासून मुंबईत झालेले मृत्यू आणि 1990 पासूनचे मुंबईतील जन्म यासंबंधीची प्रमाणपत्रे आता 'ऑनलाईन' स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे सुमारे 80 लाख जन्म-मृत्यू दाखले ऑनलाईन पद्धतीने सहजपणे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आता घर बसल्या जन्म-मृत्यू दाखले मिळणे सोपे झाले असून, देश-विदेशातील मुंबईकरांना देखील तिथूनच जन्म-मृत्यू दाखला सहजपणे मिळणार आहे. विशेष म्हणजे या सर्व ऑनलाईन प्रमाणपत्रांवर 'क्यूआर कोड' असल्याने प्रमाणपत्रांची अधिकृतता व विश्वासार्हता सहजपणे तपासता येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली आहे.

सन 1988 पासून 31 डिसेंबर 2015 पर्यंतच्या म्हणजेच गेल्या सुमारे 27 वर्षांतील मृत्यू विषयक नोंदी महापालिकेच्या 'इआरपी' (Enterprise Resource Planning) अर्थात 'सॅप' संगणकीय प्रणालीवर यापूर्वीच अद्ययावत करण्यात आल्या आहेत. तर 1990 पासून 2015 पर्यंतच्या गेल्या 25 वर्षांतील जन्म नोंदी देखील सदर संगणकीय प्रणालीवर नोंदविण्यात आल्या आहेत. यानुसार सुमारे 80 लाख नोंदी महापालिकेने यापूर्वीच डिजिटलाईज केल्या आहेत. या सर्व नोंदींशी संबंधित जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे केंद्र शासनाच्या नागरी नोंदणी यंत्रणेच्या  www.crsorgi.gov.in या संकेत स्थळावर लवकरच उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याचे केसकर यांनी सांगितले.

Loading Comments