Advertisement

पबजीचं फॅड, भावी पिढीला करतंय मॅड

शाळांमध्ये, इमारतीच्या कान्या-कोपऱ्यात जिथे बघावं तिथे ग्रुपकरून पबजी खेळणारी मुलं तुमच्या दृष्टीस पडतील. कधीकाळी ग्रुप करून मैदानी खेळ खेळणारी मुलं आज पबजीसारख्या आभासी विश्वात रमत आहेत. असे हिंसक गेम मुलांच्या मनावर आणि मानसिकतेवर आघात करत आहेत. तुमच्या मुलालाही पबजीसारख्या गेमचं व्यसन लागलं असेल तर वेळीच लक्ष द्या.

पबजीचं फॅड, भावी पिढीला करतंय मॅड
SHARES

शाळेतून आल्याबरोबर निकेशनं माधवीचा मोबाइल घेतला आणि व्हिडिओ गेम खेळू लागला. नाही हात-पाय धुतले, नाही शाळेचा गणवेश बदलला. घरात घुसताच बॅग टाकली आणि पहिला माधवीचा मोबाइल हातात घेतला. तितक्यात माधवीचा ओरडण्याचा आवाज आला, अरे मोबाइल ठेव. आधी हात-पाय धुऊ आणि काहीतरी खाऊन घे आणि अभ्यासाला बस.

जवळपास एक तास उलटून गेला तरी निकेश माधवीला एकच उत्तर देत होता ते म्हणजे, आई थांब गं... करतो मी सर्व... मला फक्त ही लेवल पार करू दे. दिवसेंदिवस व्हिडिओ गेमच्या नादी त्याचं अभ्यासाकडं, खाण्या-पिण्याकडं दुर्लक्ष होत होतं. खाली देखील खेळायला जाणं त्यानं बंदच केलं होतं. गेमच्या विश्वातच तो रममाण झाला होता. माधवीनं मोबाइल दिला नाही तर तो रडारड आणि चिडचिड करायचा. निकेशचं असं वागणं माधवीला चिंतेत टाकत होतं


पबजी गेम्सचं व्यसन 

बहुतांश घरात सध्या हीच परिस्थिती पाहायला मिळतेय. अगदी चोरीपर्यंत प्रकरण गेलं नसेल. पण नऊ-दहा वर्षांच्या मुलांना पबजी गेम्सचं अक्षरश: व्यसन लागलं आहे. दिवस असो वा रात्र मुलं गेममध्येच हरवलेली असतात. शाळांमध्ये, इमारतीच्या कोपऱ्यात जिथं बघावं तिथं ग्रुप करून पबजी खेळणारी मुलं तुमच्या दृष्टीस पडतील. कधीकाळी ग्रुप करून मैदानी खेळ खेळणारी मुलं आज पबजीसारख्या आभासी विश्वात रमत आहेत.  


हिंसक वृत्ती निर्माण

सध्या येणाऱ्या व्हिडिओ गेममध्ये हिंसा काही नवीन नाही. इतर गेमप्रमाणेच पबजीमध्ये देखील अधिक हिंसा आहे. त्यामुळे मुलांच्या मनावर आणि मानसिकतेवर याचा खोल परिणाम होत आहे. गेमचा गाभाच हिंसक असल्यानं मुलांमध्ये हिंसक वृत्ती अधिक प्रमाणात निर्माण होत असल्याचं देखील अनेक घटनांद्वारे समोर आलं आहे. कल्याणमध्ये नुकताच याचा प्रत्यय आला. रजनीश नावाच्या मुलानं मोबाइलची बॅटरी संपल्यानं रागाच्या भरात होणाऱ्या मेहुण्यावर चाकू हल्ला केला.


मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार

निकेशसारखी अशी अनेक मुलं आहेत जी दिवसेंदिवस अधिक हिंसक होत चालली आहेत. आई-वडिलांनी मोबाइल खेळायला दिला नाही तर आत्महत्या करणं, आई-वडिलांच्या अंगावर धावून जाणं, हिंसक होणं असे अनेक प्रकार पबजीच्या वेडापायी मुलांच्या हातून घडत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये तर चक्क एका मुलावर मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार घेण्याची वेळ आली. दिवस-रात्र फक्त तो पबजीच खेळायचा. पबजी खेळण्याची सवय मोडावी यासाठी त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.


ब्लॅकमेलच्या घटना 

पबजी खेळताना आणखी एक धोका म्हणजे अनोळखी लोकांशी होणारी ओळख. पबजी गेम हा ग्रुपमध्ये खेळला जातो. यामध्ये समोरच्या व्यक्तीचं युजरनेम दिसतं. त्यापैकी काही ओळखीचे असतात. त्यांच्याशी रोज भेटणं होत नसेलं तरी त्यांना ओळखत तरी असतो. पण गेम खेळणारे अनेक जण परिचयाचे नसतात. त्यामुळे ती व्यक्ती कोण असेल याची माहिती आपल्याला नसते. तरीही समोरच्या व्यक्तीसोबत वारंवार खेळल्यानंतर युजरनेमच्या मदतीनं ऑनलाईन भेटी सुरू होतात. यातूनच अनेक मुलं-मुली जाळ्यात अडकल्याचं देखील निदर्शनास आलं आहे. या गेमच्या माध्यमातून अनोळख्या व्यक्तीकडून खाजगी माहिती चोरीला जाण्याचे, धमकावण्याचे प्रकार किंवा ब्लॅकमेल करण्याच्या घटना उघड झाल्या आहेत


पालक-विद्यार्थी संघर्ष 

पबजीमुळे पालक-विद्यार्थी यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे. पण खरं सागायचं तर यासाठी कुठे ना कुठे पालकही तितकेच जबाबदार आहेत. आमचा मुलगा मोबाइलमध्ये हुशार आहे हो, दिवसभर काहीतरी सर्फिंग करत असतो. आमचा मुलगा लहान आहे पण त्याला मोबाइलमधलं सगळं कळतं, चांगल्या प्रकारे तो मोबाइल हाताळतो, अशा प्रकारे मुलांचं कौतुक करत लहान वयातच त्यांच्या हातात मोबाइल टेकवला जातो. हल्ली काय तर एक वर्षांच्या चिमुकल्यांच्या हातात मोबाइल दिला जातो. मुलांना जेवण भरवायचं असेल, झोपवायचं असेल किंवा आगदी मुलं रडायला लागली की त्यांना मोबाइलवर गाणी लावून द्यायची की काम झालं.



खरंतर अशा प्रकारे आपण त्यांना मोबाइलच्या अधीन करत असतो हे पालकांना कळतच नसतं. पाल्य मुलांच्या हातात मोबाईल देतात. पण त्याचा नेमका आणि योग्य वापर कसा करायचा हे मात्र सांगायचं विसरतात.


पालकांनी घ्यावयाची काळजी

  • सर्वात पहिलं मुलांच्या हातात मोबाइल देताना विचार करा. त्याला मोबाइलची खरच आवश्यकता आहे का? याचा विचार करा
  • मोबाइल दिला तरी त्याचा गैरवापर तर होत नाही ना? याकडे लक्ष द्या. आपली मुलं मोबाईलवर काय पाहतात? कुठला गेम खेळतात? त्या गेमचं स्वरूप काय आहे? आणि ते किती वेळ मोबाइल हाताळतात? याकडं तुमचं लक्ष पाहिजे
  • अनेकदा जाणवतं की मुलं आणि पालकांमध्ये संवाद कमी असतो. त्यामुळे मुलांमध्ये एकलकोंडेपणा निर्माण होतो. या एकटेपणातून मार्ग काढण्यासाठी मुलं मोबाइलच्या म्हणा किंवा या गेम्सच्या विश्वात रंगतात. त्यामुळे पालकांनी मुलांशी संवाद ठेवणं फारच गरजेचं आहे
  • मुलांना मैदानी खेळ खेळण्यास अधिक प्रवृत्त करा. त्यांच्यासोबत तुम्ही देखील एखाद-दुसरे खेळ खेळा. त्यांच्या मनात वाचनाची आवड निर्माण करा. बुद्धीला चालना देणारे गेम्स त्यांच्यासोबत खेळा. यातून तुमचं नातं अधिक खुलेल आणि मुलांचा देखील सर्वांगीण विकास होईल
  • मुलं ही नेहमी आपल्या आई-वडिलांचं अनुकरण करत असतात. त्यामुळे पालक जर मोबाइल किंवा गेम्सच्या आहारी गेली असतील तर मुलांना अडवणं फारच कठीण आहे. यासाठी पालकांनी देखील मोबाइलचा वापर जास्त करू नये
  • मुलांना नकार सहन करायला लहानपणापासून शिकवणं गरजेचं आहे. लहानपणापासून त्यांना मोबाइलची सवय लावली जाते. मग एकदम अचानक जाणीव झाल्यावर त्यांच्याकडून मोबाइल घेतला जातो. एखाद्या वस्तूसाठी अचानक नकार मिळाल्यानं मुलं घर सोडण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे नकार पचवण्याची सवय देखील मुलांमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे.   
  • तुमची मुलं एखाद्या गेम्सच्या विळख्यात अडकली असतील तर त्या जाळ्यातून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. गरज असल्यास मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्या
  • व्हिडिओ गेम खेळण्यात काही चुकीचं नाही. पण त्याचा अतिरेक झाला नाही पाहिजे. यासाठीच मुलांच्या गेम खेळण्यावर पालकांचं लक्ष पाहिजे. असे गेम बनण्यापासून आपण कुणाला रोखू शकत नाही. पण मुलांना तर आपण समजवू शकतो. त्यांच्या गेम खेळण्याचा कुठे अतिरेक तर होत नाही ना? याची जबाबदारी पालकांचीच आहे. भावी पिढीला पबजीसारख्या गेमच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी हाच एक उपाय आहे.  

गेममध्ये काय आहे?

पबजी हा शब्द ‘पब्लिक अननोन बॅटल फिल्ड’ या टर्मचा शॉर्टकट आहे. अर्थात गेमच्या नावावरूनच अनोळखी लोकांशी मारामारी करणे हा या गेमचा मूळ उद्देश असतो हे समजते. आकर्षक व्हिज्युअल्स आणि सतत होत राहणाऱ्या अ‍ॅक्शनमुळे या गेमची क्रेझ अधिक आहे. वाळवंट, शहर आणि जंगल अशा तीन थीममध्ये एकट्यानं किंवा दोघांची अथवा चौघांची टीम बनवून हा गेम खेळला जातो. एका बॅटल फिल्डमध्ये १०० अनोळखी गेमर्स एका वेळेस हा गेम खेळतात. गेम खेळण्यासाठी दिलेली जागा हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे एकमेकांना ठार करून शेवटी जिवंत राहणारा या गेममध्ये जिंकतो. या गेममध्ये हॉकी स्टिक्स, एके ४७, मशीनगन्स, तलवारीच्या साहाय्यानं समोरच्या गेमरला ठार मारले जाते


लाइव्ह चॅटिंगही

फेसबुक लॉग इनच्या मदतीने गेम खेळल्यास आपल्या फेसबुक मित्रांबरोबर टीम करून हा गेम खेळता येतो. म्हणूनच अनेक जण वेळ ठरवून भेटतात ते या गेमच्या प्लॅटफॉर्मवर. या गेमचं वैशिष्टय म्हणजे हा गेम खेळताना आपल्या पार्टनरशी लाइव्ह चॅटिंगही करता येतं. आता यात हिंसा असल्यानं हा गेम केवळ १८ वर्षांवरील मुलांसाठीच आहे. मात्र आता स्मार्टफोन वापरणारी सर्वच वयोगटातील मुलं हा गेम स्वत:च्या किंवा आईबाबांच्या मोबाइलवरून खेळताना दिसतात



हेही वाचा

अल्पवयीन मुला-मुलींसाठी इन्स्टाग्रामचं नवं फिचर

तुमचा स्मार्टफोन तुमच्यावर नजर तर नाही ठेवत?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा