Advertisement

महिला प्रवाशांसाठी ‘तेजस्विनी’ लवकरच धावणार

रेल्वेप्रमाणं आता बेस्ट प्रशासनही महिलांसाठी 'महिला विशेष बससेवा' सुरू करणार आहे.

महिला प्रवाशांसाठी ‘तेजस्विनी’ लवकरच धावणार
SHARES

बेस्टनं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेप्रमाणं आता बेस्ट प्रशासनही महिलांसाठी 'महिला विशेष बससेवा' सुरू करणार आहे. त्यामुळं अनेक वर्षांपासून प्रवाशांची असलेली विशेष बससेवेची प्रतिक्षा संपणार आहे. मुंबईत गर्दीच्या वेळी बसमध्ये चढताना महिलांचा मोठी गैरसोय होते. धक्काबुक्की, अनपेक्षित स्पर्श, आसनावरून होणारे वाद यांसारख्या अनेक समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं. तसंच बस थांब्यावर होणाऱ्या गर्दीमुळं गरोदर महिला प्रवाशांची देखील गैरसोय होते. त्यामुळं गर्दीच्या वेळी फक्त महिला प्रवाशांना बसगाड्या उपलब्ध होण्यासाठी बेस्ट प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.

बस दाखल

तेजस्विनीअसं या महिला विशेष बसचं नाव असून, लवकरच ही बससेवा सुरू करण्यात येणार आहे. मुंबईत अशा एकूण ३७ ‘तेजस्विनी’ बसगाड्यांपैकी ३ बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. बेस्ट उपक्रमामार्फत सध्या छत्रपती शिवाजी टर्मिनस ते नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) अशी महिला विशेष डबलडेकर बससेवा सुरू आहे.


३५ आसनव्यवस्था

सध्या बेस्टच्या ताफ्यात आलेल्या तेजस्विनी बसमध्ये ३५ आसनव्यवस्था असून, विना वातानुकूलित आहेत. जयपूरमध्ये तयार करण्यात आलेल्या अशा एका बसची किंमत २९.५ लाख रुपये आहे. या तीन बसगाड्या सध्या धारावी बस आगारात उभ्या करण्यात आल्या आहेत. उर्वरित ३४ बसगाड्या पुढील महिन्याभरात बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

हेही वाचा - एकदम 'बेस्ट', ही बस केवळ महिलांसाठीच!


११ कोटींचं अनुदान

तेजस्विनी योजनेंतर्गत बेस्ट उपक्रमाला केंद्र सरकारकडून ११ कोटींचे अनुदान मिळणार आहे. सकाळी ७ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत ही बस धावणार आहे. मागणी वाढल्यास या बससेवेची संख्याही वाढविण्यात येणार आहे. मागील काही काळात महिला प्रवाशांची संख्या अधिक वाढली आहे. दररोज बसगाडीतून प्रवास करणाऱ्या ३३ लाख प्रवाशांमध्ये सात लाख महिला प्रवासी आहेत. या प्रवाशांना तेजस्विनीमुळं दिलासा मिळणार आहे.



हेही वाचा -

लोकलवर फेकलेल्या वस्तूमुळं प्रवासी जखमी

‘असं’ आहे मुंबईच्या पोटातून धावणाऱ्या मेट्रोचं रुप



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा