Advertisement

येत्या १५ दिवसांत सुरूवात होणार 'रो रो' प्रवासी सेवा

भाऊचा धक्का ते मांडवा मार्गावरील रो रो प्रवासी वाहतुकीला येत्या १५ दिवासांत सुरूवात होणार आहे.

येत्या १५ दिवसांत सुरूवात होणार 'रो रो' प्रवासी सेवा
SHARES

भाऊचा धक्का ते मांडवा मार्गावरील रो रो प्रवासी वाहतुकीला येत्या १५ दिवासांत सुरूवात होणार आहे. मागील २ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली सेवा सुरू होणार असल्यानं अनेकांना दिलासा मिळाला आहे. त्याशिवाय, ही वाहतूक सेवा पावसाळ्यातही सुरू राहणार आहे. रो रो सेवेचं दरपत्रक महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डानं मंजूर केलं असून, हे दर चढे असल्याचं प्रवाशांचं मत आहे.

'प्रोटोपोरोस' ही रो रो बोट गेल्या आठवड्यात १४ तारखेस मुंबईच्या समुद्रात दाखल झाली. बोटीच्या सीमा शुल्क संबंधित कागदपत्रांची पूर्तता शुक्रवापर्यंत होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर जलयान म्हणून बोटीची नोंदणी संबधित यंत्रणेकडं करावी लागणार आहे. त्यानंतर बोटीच्या चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतरच रो रो सेवेचे उद्घाटन केले जाणार आहे.

उद्घाटनासाठी उच्चपदस्थांची उपलब्धता कशी आहे, त्यावर तारीख ठरणार असली तरी ही सेवा फेब्रुवारीअखेपर्यंत सुरू करण्याचा मेरिटाईम बोर्डाचा मानस आहे. सध्या मुंबई ते मांडवा दरम्यान उपलब्ध असलेली प्रवासी जलवाहतूक पावसाळ्यात बंद ठेवली जाते. पण रो रो सेवेची क्षमता पावसाळ्यातदेखील वाहतूक करण्याची आहे. त्यामुळं ‘प्रोटोपोरोस’ पावसाळ्यात सुरू असणार असल्याची माहिती मिळते. त्या काळात प्रवासी वहन मर्यादा अध्र्यावर (५०० प्रवासी) आणली जाणार आहे.

पावसाळ्यात उधाणाच्या भरतीवेळी, मोठ्या लाटा उसळत असताना मात्र रो रो सेवा बंद राहणार आहे. या काळात समुद्र शांत असताना वाहतूक सुरू ठेवली जाणार आहे. पावसाळावगळता या बोटीची क्षमता १ हजार प्रवासी आणि १८० वाहनं असल्याचं समजतं. तसंच, यामधून बसगाडीची वाहतूक करण्याचीदेखील सुविधा आहे.

प्रवासी वाहतुकीचं दरपत्रक महाराष्ट्र मेरिटाईमनं मंजूर केलं आहे. मात्र, वाहनासहित प्रवास करताना हे दर चढे असल्याचं समजतं. मिळालेल्या माहितीनुसार, सेवा सुरू झाल्यानंतर ३ महिन्यांच्या काळात या दरपत्रकाची चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर त्यात काही बदल करायचे असल्यास, त्यावर स्वतंत्रपणे, नियमानुसार विचार केला जाणार आहे.

अलिबाग ते मुंबई हे अंतर रस्ता मार्गानं ९६ किलोमीटर इतकं आहे. हे अंतर पार करण्यासाठी साधारणपणे ३ ते ३.३० तासाचा कालावधी लागतो. पेट्रोलवर चालणाऱ्या खासगी वाहनानं जाऊन येऊन साधारणपणे दीड हजार रुपये खर्च येतो, डिझेलवर चालणाऱ्या वाहनानं एक हजार ते १२०० रुपये लागतात.

रो रो सेवेसाठी माडंव्याहून मुंबईत जाण्यासाठी एका वेळेला सुमारे ११०० ते १५४० रुपये मोजावे लागणार आहेत. दोन्ही बाजूनं प्रवास केल्यास हा खर्च २२०० ते ३०८० रुपये होणार आहे. म्हणजेच रो रो सेवा वापरण्यासाठी जवळपास दुप्पट खर्च वाहनचालकांना सोसावा लागणार आहे. त्यामुळं नियमित मुंबईत जाणाऱ्या वाहनचालकांना हा वाहतूक खर्च परवडणार नाही.

मांडवा ते गेट वे दरम्यान चालणाऱ्या जलवाहतुकीसाठी सध्या १२५ ते १९० रुपये तिकीट दर आकारला जातो, तर रो रो सेवेसाठी २२० ते ५५० असा दर आकारला जाणार आहे. त्यामुळे इतर जलवाहतूक कंपन्यांच्या तुलनेत रो रो सेवेचे दर हे जास्त असणार आहेत.



हेही वाचा -

लोकप्रतिनिधींच्या दारी बेस्ट कर्मचारी; मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं अनोख आंदोलन

वर्सोवा-विरार सागरी सेतूला एमएसआरडीसीची मान्यता



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा