Advertisement

सर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, राज्य सरकारकडून रेल्वेला पत्र

सध्या महिला, वकिल यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणी केली जात आहे.

सर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, राज्य सरकारकडून रेल्वेला पत्र
SHARES

कोरोनामुळे बंद असलेली मुंबईतील लोकल ट्रेन पुन्हा सुरु करण्यासाठी राज्य सरकारनं रेल्वे प्रशासनाला पत्र लिहिलं आहे. सर्वसामान्य नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी, असं या पत्रात राज्य सरकारने म्हटलं आहे. अद्याप रेल्वे प्रशासनाकडून या पत्रावर उत्तर देण्यात आलं नाही.

सध्या महिला, वकिल यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणी केली जात आहे. सरकार कोरोना नियमांचं पालन करत लोकल सेवा पुन्हा एकदा सुरु करण्याचा विचार करत असल्याचं या पत्रात सांगण्यात आलं आहे. पत्रात ठराविक वेळेनुसार लोकल प्रवेश देण्याची मागणी केली आहे. तसंच, गर्दीच्या वेळी अधिक लोकल सोडण्यात याव्या, असंही नमूद केलं आहे.

पत्रामध्ये लोकल सेवा एकाच वेळी सुरु न करता टप्प्याटप्प्याने सुरु कऱण्याचा उल्लेख आहे. तसंच यासाठी ठराविक वेळाही निर्धारित करण्यात आल्या आहेत. यानुसार अधिकृत तिकीट किंवा मासिक पास असणारी व्यक्ती सकाळी पहिल्या ७.३० ची पहिली लोकल, तसंच ११ ते ४.३० आणि रात्री ८ ते शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करु शकते.

अत्यावश्यक सेवेतील प्रवासी ज्यांच्याकडे अधिकृत क्यूआर कोड आहे.  तसंच ओळखपत्रासोबत अधिकृत तिकीट किंवा मासिक पास असणारे सकाळी ८ ते १०.३० तसंच संध्याकाळी ५ ते ७.३० च्या दरम्यान प्रवास करु शकतात. याशिवाय प्रत्येक एका तासाने महिला विशेष लोकल धावणार आहे.

राज्य सरकारने लोकल बाबतचा प्रस्ताव मांडताना प्रवाशांची गर्दी होणार नाही व कोरोनाबाबतच्या नियमांचं पालन करत लोकल सेवा सुरू करावी, असं म्हटलं आहे. तसंच, लवकरात लवकर या प्रस्तावावर उत्तर देण्याची विनंती राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.



हेही वाचा - 

नवी मुंबईत महिन्यात रुग्ण दुपटीचा कालावधी १८६ दिवसांवर

कोरोना इफेक्ट : रुग्णांमध्ये आढळतोय मल्टीसिस्टम प्रक्षोभक सिंड्रोम



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा