Advertisement

मेट्रो-3 साठी सहकार्य करा, एमएमआरसीचे जाहीर निवेदन


मेट्रो-3 साठी सहकार्य करा, एमएमआरसीचे जाहीर निवेदन
SHARES

मेट्रो-3 प्रकल्पातील झाडांच्या कत्तलीवरून सुरू असलेले वादळ शमवण्यासाठी 'मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन' (एमएमआरसी) ने आता जनतेलाच जाहीर निवेदन केले आहे. मेट्रो-3 प्रकल्पाचे, झाडांच्या कत्तलीचे काम कायदेशीररीत्याच सुरू असून, जनतेने या कामासाठी सहकार्य करावे असे जाहीर निवेदन नुकतेच एमएमआरसीकडून वर्तमान पत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मेट्रो-3 प्रकल्पात 5000 झाडे तोडली जाणार असून, यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे म्हणत काही पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयात त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात एमएमआरसीच्या बाजूने निर्णय लागला आहे. मात्र त्यानंतरही झाडांच्या कत्तलीवरून वाद सुरूच आहे. न्यायालयीन लढाई सुरूच असून, दुसरीकडे पर्यावरण प्रेमी 'सेव्ह ट्री'च्या माध्यमातून रस्त्यावर उतरून 'चिपको' आंदोलन करत आहेत. या आंदोलनामुळे झाडांच्या कत्तलीच्या कामात अडथळा तर निर्माण होतच आहे, पण मेट्रो-3 च्या कामावरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे एमएमआरसीने या प्रकल्पात किती झाडे कापणार, किती झाडांचे पुनर्रोपन करणार आणि किती झाडे नवी लावणार यासह हे काम कसे कायद्याच्या चौकटीतच केले जात आहे, याची मांडणी या जाहीर निवेदनात केली आहे.

संपूर्ण प्रकल्पात 1074 झाडे कापली जाणार असून, 17,727 झाडे पुनर्रोपीत केली जाणार आहेत. तर कापण्यात येणाऱ्या झाडांच्या मोबदल्यात 3,222 झाडे लावण्यात येणार असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तर उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाने कामाला हिरवा कंदिल दिल्याचेही नमूद करत याचिका निकाली काढल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी या कामासाठी सहकार्य करावे असे आवाहन एमएमआरसीने केले आहे. 'सेव्ह ट्री' ने मात्र या निवेदनावर आक्षेप घेतला आहे. कायद्याच्या चौकटीत काम होत असल्याचा दावा खोटा असून, सर्वोच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली नसून, आम्हाला उच्च न्यायालयाच्या समितीकडे दाद मागण्यास सांगितले आहे. त्यामुळे अशी दिशाभूल करू नये असे म्हणत 'सेव्ह ट्री'चे सदस्य झोरू बाथेना यांनी यावर आक्षेप घेतला आहे. तर यासंबंधी लवकरच एमएमआरसीला नोटीस पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.


हेही वाचा -

मेट्रो-3 चा वाद पुन्हा न्यायालयाच्या दारात

मेट्रो-३ साठी झाडांची कत्तल सुरु; पर्यावरणवादी पुन्हा आक्रमक

'मेट्रो ३'मुळे झाले धंद्याचे वांदे!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा