Advertisement

मुंबईत अक्षय्य सोनेखरेदीला झळाळी!

यंदाची अक्षय्य तृतीया समाधानकारक ठरली. दिवसभर ग्राहकांची सोने खरेदीसाठी वर्दळ होती. सोन्याच्या किंमती वधारल्याचा कोणताही प्रतिकूल परिणाम ग्राहकांच्या मागणीवर झाला नाही, यावरुनच या बाजाराचा कल तेजीकडे आहे, हे दिसून आलं. विशेषतः दुपारी ३ नंतर ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडले. सध्या लग्न सराईचा हंगाम असल्याने ग्राहकांनी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर दागिने खरेदीला प्राधान्य दिलं.

मुंबईत अक्षय्य सोनेखरेदीला झळाळी!
SHARES

वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया हा सण साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी सोनेखरेदीचा मोठा उत्साह दिसून येतो. त्यामुळेच या दिवशी दागिने खरेदीचा टक्का वाढण्यासाठी दागिने विक्रेत्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने बुधवारी सोन्याच्या किमतीत चांगलीच तेजी पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत अंदाजे अर्धा टक्क्यांची घट झाली असली, तरी देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याने प्रति तोळा १२५ रुपयांहून अधिक वाढ नोंदवली. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोनेखरेदीत ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने ज्वेलर्स आणि दागिने विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होतं.



मुंबईत किती दर?

मुंबईत २२ कॅरेट (९१६) सोन्याचे दर मंगळवारी प्रति तोळा २८,६७५ एवढे होते. त्यात मंगळवार संध्याकाळपर्यंत १२४ रुपयांची वाढ होऊन हे दर प्रति तोळा २८,७९९ वर पोहोचले. तर २३ कॅरेट (९९५) सोन्याचे दर प्रति तोळा १३५ रुपयांनी वाढून ३१,१५५ रुपयांवरून ३१,२९० रुपयांवर पोहोचले. तरीही ग्राहकांनी सकाळपासूनच सोने खरेदीला ज्वेलर्स दुकानांमध्ये गर्दी केली होती. दुपारी खरेदीचा ओघ थोडासा नरमला असला, तरी संध्याकाळी सुरू झालेली गर्दी उशीरापर्यंत वाढतच होती.



आॅफर्सचा अपेक्षित परिणाम

अक्षय्य तृतीयेचा दिवस इन्कॅश करण्यासाठी ज्वेलर्सनीही खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या आॅफर्सचा भडीमार केला होता. या आॅफर्सचा अपेक्षित परिणाम होऊन गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला.

'फोन पे' या डिजिटल पेमेंट कंपनीने अक्षय्य तृतीयेसाठी ग्राहकांसाठी विशेष ऑफर आणली होती. त्यात सोन्याच्या खरेदीवर ५ हजार रुपयांपर्यंतची कॅशबॅक मिळवण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली. सोबतच १०० ग्राहकांना सोन्याची चेन आणि २० ग्राहकांना कल्याण ज्वेलरीची ५ हजार रुपयांचं गिफ्ट व्हाउचर जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.



आम्ही ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदी केल्यास मोफत सोन्याच्या नाण्यापासून ते २५ मर्सिडीज बेन्झ कार जिंकण्याची संधी जगभरातील ग्राहकांना उपलब्ध करून दिली होती. या आॅफर्सचा फायदा होऊन गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी सोने विक्रीत २५ टक्क्यांनी वाढ झाली.
- टी. एस. कल्याणरामन, चेअरमन अॅण्ड मॅनेजिंग डायरेक्टर, कल्याण ज्वेलर्स


पांढऱ्या धातूलाही प्राधान्य

पांढऱ्या रंगाला पवित्र मानण्यात येत असल्याने प्लॅटिनम गिल्ड इंडिया प्रा. लि. कडून अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्लॅटिनमच्या खरेदीलाही प्रोत्साहन देण्यात आलं. दागिन्यांसोबतच देवतांची पेंडंट्स, चेन्स, कानातले, नेकपिसेसपासून ते पुरुषांसाठी चेन्स आणि ब्रेसलेट्स यांचा त्यात समावेश होता.



लग्नाच्या दागिन्यांची खरेदी

'तनिष्क'च्या मेट्रो अॅण्ड नाॅन मेट्रो सिटीजमधील सर्वच आऊटलेट्समध्ये ग्राहकांची दिवसभर गर्दी होती. हा मुहूर्त साधण्यासोबतच लग्नाचे दागिने खरेदी करण्याला ग्राहक पसंती देत होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोने खरेदीत आश्वासक वाढ झाल्याचा आमचा अंदाज आहे.
- संदीप कुल्हाली, सिनियर व्हाइस प्रेसिडंट (मार्केटींग अॅण्ड रिटेल ज्वेलरी डिव्हिजन), टायटन कंपनी प्रा.लि.



बाजाराचा कल तेजीकडे

सोने खरेदीच्या प्रतिसादाबद्दल पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आणि इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले, ''यंदाची अक्षय्य तृतीया समाधानकारक ठरली. दिवसभर ग्राहकांची सोने खरेदीसाठी वर्दळ होती. सोन्याच्या किंमती वधारल्याचा कोणताही प्रतिकूल परिणाम ग्राहकांच्या मागणीवर झाला नाही, यावरुनच या बाजाराचा कल तेजीकडे आहे, हे दिसून आलं. 

विशेषतः दुपारी ३ नंतर ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडले. सध्या लग्न सराईचा हंगाम असल्याने ग्राहकांनी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर दागिने खरेदीला प्राधान्य दिलं. तर काहींनी आधी मागणी नोंदवून बनवून घेतलेले दागिने नेणं पसंत केलं. सोने-चांदीच्या मागणीत अंदाजे ३० ते ३५ टक्के वाढीची आम्हाला अपेक्षा आहे.''

जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय व आर्थिक स्थिती लक्षात घेता नजिकच्या काळात सोन्याच्या किंमतीत स्थिर व सातत्यपूर्ण वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटकांचे प्रतिबिंबच अक्षय्य तृतीयेत पडलेलं दिसलं.



हेही वाचा-

आयटीआर-१ फाॅर्म ई-फायलींगसाठी तयार

'फॅमिली फी' भरा, एकत्रित विमान प्रवास करा!



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा