Advertisement

200 च्या नोटेला एटीएमबंदी?


200 च्या नोटेला एटीएमबंदी?
SHARES

2000 आणि 500 रुपयांच्या नोटांनंतर आता चर्चा आहे ती रिझर्व्ह बँकेकडून लवकरच जारी करण्यात येणाऱ्या 200च्या नव्या नोटेची! ही नोट कशी दिसणार? ती कधी येणार? तिची बनावट नोट शक्य आहे का? अशा अनेक चर्चा या अनुषंगाने सुरु झाल्या आहेत. मात्र त्याचबरोबर 200 च्या नोटेविषयी एक नवी आणि महत्त्वपूर्ण माहिती 'मुंबई लाइव्ह'च्या हाती लागली आहे. जी अर्थात सामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरु शकते.



एटीएममध्ये नोट मिळणार नाही?

200ची नवी नोट बाजारात लवकरच दाखल होणार असून ती कशी असेल? याची उत्सुकता लोकांमध्ये आहे. मात्र ही नोट सामान्यांना एटीएममध्ये मिळणार नाही. ती फक्त बँकांमध्ये आणि बाजारात उपलब्ध असेल.

सूत्रांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिलेल्या माहितीनुसार, ज्या प्रकारे 2000 आणि 500 च्या नव्या नोटा जारी केल्यानंतर देशभरातल्या सर्व एटीएममध्ये मशिन आणि त्यांचे सॉफ्टवेअर अपडेट करावे लागले होते, त्याचप्रकारे आता येणाऱ्या नव्या 200च्या नोटांसाठी एटीएममधली यंत्रणा आणि सॉफ्टवेअर अपडेट करावे लागणार आहेत. 

मात्र, यासाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च येणार असून ही प्रचंड वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यामुळे 200 ची नोट जरी आरबीआय अर्थात रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून जारी झाली, तरी ती लागलीच एटीएममध्ये उपलब्ध होणार नाही. किमान काही महिने तरी ही नोट फक्त बँकेतच उपलब्ध असेल.



निळ्या रंगाची नोटच खरी?

200 रुपयांची नवी नोट कशी असेल, याविषयी अनेक प्रकारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र निळ्या रंगाची नोटच खरी असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच लोकांच्या हातात निळ्या रंगाची नोट दिसण्याची शक्यता आहे.



200च्या नोटेचा फायदा काय?

साठेबाजी आणि काळ्या पैशाला आवर घालण्यासाठी मोठ्या नोटा बंद करण्याचा मागील वर्षी निर्णय मोदी सरकारने घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर 200 च्या नोटेचा फायदा होणार असल्याचं मत अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.


2000ची नोट चलनात कमी असून ती पैसे साठवण्यासाठी जास्त वापरली जाते. त्यामुळे 50, 100, 200 अशा छोट्या किंमतीच्या चलनाची आवश्यकता आहे. शिवाय महागाईमुळे हळूहळू कमी किंमतीच्या नोटांची बाईंग कॅपॅसिटी अर्थात खरेदी मूल्य कमी होत चाललं आहे. काही वर्षांनंतर कदाचित 500 रुपयाच्या नोटेचंही खरेदी मूल्य कमी होईल. तेव्हा 2000चीच नोट घेऊन घराबाहेर पडावं लागेल.

अनिल गचके, अर्थतज्ज्ञ


100 टक्के कॅशलेस अशक्य!

एकीकडे कॅशलेस व्यवहारासाठी सरकार पाठपुरावा करत असताना दुसरीकडे रिझर्व्ह बँक नव्या नोटा जारी करत आहे. त्यामुळे कॅशलेस व्यवहार कसे होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र 100 टक्के कॅशलेस शक्यच नसल्याचं अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे.


चलनी व्यवहारांवरचं अवलंबित्व कमी व्हावं हा कॅशलेस व्यवहाराचा हेतू असतो. कॅशलेस व्यवहार मोठ्या शहरांमध्ये जास्त प्रमाणात होतात. मात्र छोटी शहरं किंवा ग्रामीण भागामध्ये पूर्णपणे कॅशलेस किंवा ऑनलाईन व्यवहार होणं अवघड आहे. शिवाय हल्ली ऑनलाईन व्यवहारांमध्ये लूट किंवा फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे कॅशलेस आणि हार्ड कॅश अशा दोन्ही प्रकारचे व्यवहार अस्तित्वात असायला हवेत.

अनिल गचके, अर्थतज्ज्ञ


नव्या नोटांसाठी दसरा उजाडणार...

200च्या नव्या नोटांचे आदेश केंद्र सरकारकडून रिझर्व्ह बँकेला प्राप्त झाले आहेत. रिझर्व्ह बँकेकडे या नोटा छापण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाले आहे. मात्र देशभरात त्या नोटा पाठवण्यासाठी अजून काही आठवड्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या नोटा बाजारात दाखल होण्यासाठी दसरा उजाडण्याची शक्यता आहे.



दरम्यान, नवीन 200 रुपयांच्या सुमारे 50 कोटी नोटा छापल्या जाणार असून त्यामुळे बाजारात नोटांचा तुटवडा भासू नये यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्न करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नव्या नोटांसाठी रिझर्व्ह बँकेसोबतच सामान्य नागरिकही उत्सुक आहेत. मात्र या नोटांमुळे खरंच फायदा होणार आहे का? 100 आणि 500 च्या नोटा असताना 200 च्या नोटेमुळे काय फरक पडणार? काळा पैसा साठवण्याच्या वृत्तीला यामुळे आळा घालता येणार का? 1000ची नोट आल्यानंतर 2000च्या नोटेचं काय होणार? असे अनेक प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरितच आहेत.



हेही वाचा

हॉटेलात बिलासाठी एटीएम कार्ड द्याल तर खबरदार! तुमचाही असाच घात होईल!

जिल्हा बँकांना मोठा दिलासा, RBI स्वीकारणार जुन्या नोटा


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा