खासगी रुग्णालयातील रक्तपेढ्यांमधूनही आता रुग्णांना सहज रक्त उपलब्ध होऊ शकेल. यामुळे रक्त मिळवण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांची वणवण थांबण्यासही मदत होईल. राज्य रक्त संक्रमण परिषदेने नुकत्याच काढलेल्या परिपत्रकानुसार खासगी रुग्णालयातील रक्तपेढ्यांतून रुग्णांना रक्त उपलब्ध करुन देणे बंधनकारक असेल. तसे न केल्यास अशा रक्तपेढ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
गेल्या महिन्यात केंद्र सरकारने सर्व खासगी रुग्णालयांनारक्तदान शिबिरे आयोजित करण्याबाबतचा अध्यादेश काढला होता. पण, परवानगी असूनही विश्वस्त संस्थाच्या बहुतांश रुग्णालयात रक्ताच्या गरजेनुसार रक्तदान शिबिरे आयोजित होत नसल्याचे राज्य रक्त संक्रमण शिबिराच्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले.
त्यानंतर, राज्य आरोग्य विभागाने राज्यभरातील सर्व खासगी आणि सरकारी रक्तपेढ्यांना ऐच्छिक रक्तदानाला प्राधान्य देण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यभरात एकूण 362 रक्तपेढ्या आहेत. त्या सर्व रक्तपेढ्यांना हा नियम बंधनकारक आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेने काढलेल्या परिपत्रकात येत्या तीन महिन्यांत ऐच्छिक रक्तदानाचे प्रमाण 90 टक्क्यांपर्यंत पोहोचवण्याची सूचनाही देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर, 90 टक्क्यांपर्यंत ऐच्छिक रक्तदान न करणाऱ्या रक्तपेढ्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, असेही परिपत्रात नमूद करण्यात आले आहे.
नव्या परिपत्रकानुसार आतापर्यंत रुग्णांकडून रक्तदात्याची मागणी करणाऱ्या रक्तपेढ्यांवर कारवाई करता येईल. राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून रक्तपेढ्यांना ऐच्छिक रक्तदान करण्याची सूचना दिली जात आहे. गेल्या काही वर्षांत त्यात सुधारणाही झाली आहे.
डॉ. अरुण थोरात, सहाय्यक संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद
राष्ट्रीय रक्त धोरण, 2002, नुसार विश्वस्त संस्थांच्या रुग्णालयांनी रुग्णांच्या आवश्यकतेनुसार रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन त्याच रक्तपेढ्यांतून रुग्णांची गरज पूर्ण करावी, असे म्हटले आहे. परंतु मुंबईतील बहुतेक नामांकित रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना रक्ताची गरज भासल्यास त्यांच्या नातेवाईकांकडून रक्तदात्याची मागणी केली जाते.
त्यामुळे आधीच रुग्णांच्या काळजीत असणारे नातेवाईक रक्तासाठी किंवा रक्तदाता शोधण्यासाठी आणखी धावपळ करतात. त्यामुळे व्यावसायिक रक्तदाते निर्माण होण्याच्या व्यवसायालाही हातभार लागतो.
राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकातील नियमांचे सर्व रुग्णालयातील रक्तपेढ्यांनी पालन केले, तर रुग्णांची आणि नातेवाईकांची वणवण थांबेल, असे थिंक फाऊंडेशनचे विनय शेट्टी यांनी सांगितले.
हे देखील वाचा -
'अंतरा’ गर्भनिरोधक योग्य की अयोग्य? महिलांमध्ये संभ्रम...
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)