Advertisement

फेरीवाल्यांवरील कारवाईची पकड होतेय सैल

फेरीवाल्यांविरोधात कडक कारवाई करणाऱ्या महापालिकेची पाठ वळल्यानंतर पोलिसांच्या डोळ्यांदेखतच फेरीवाल्यांनी धंदे थाटायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे आता या फेरीवाल्यांपुढे पोलिसांबरोबरच महापालिकेनंही हात टेकले असून त्यामुळे कारवाईची ही पकड दिवसेंदिवस सैल होत असल्याचं दिसून येत आहे.

फेरीवाल्यांवरील कारवाईची पकड होतेय सैल
SHARES

मुंबईतील रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास पूर्णपणे बंदी आहे. पण असं असतानाही फेरीवाल्यांनी पुन्हा एकदा नियम धाब्यावर बसवून रेल्वे स्थानक परिसरात पथरी पसरवण्यास सुरुवात केली आहे.

फेरीवाल्यांविरोधात कडक कारवाई करणाऱ्या महापालिकेची पाठ वळल्यानंतर पोलिसांच्या डोळ्यांदेखतच फेरीवाल्यांनी धंदे थाटायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे आता या फेरीवाल्यांपुढे पोलिसांबरोबरच महापालिकेनंही हात टेकले असून त्यामुळे कारवाईची ही पकड दिवसेंदिवस सैल होत असल्याचं दिसून येत आहे.


बंदी असतानाही बसतात फेरीवाले

एल्फिन्स्टन पूल चेंगराचेंगरीच्या दुघर्टनेनंतर मनसेने रेल्वे स्थानकाच्या परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास बंदी घालण्याची मागणी केली. त्यानंतर फेरीवाल्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली. दरम्यान, न्यायालयानेही रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिसरात तसेच मंडई, रुग्णालय, शाळा, कॉलेज आणि धार्मिक स्थळे यांच्यापासून १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसवण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. त्यामुळे महापालिकेने शहर विक्रेता समिती गठित करून फेरीवाला आणि ना फेरीवाला क्षेत्र याबाबत यापूर्वी तयार केलेल्या यादीत आता सुधारणा करण्याचं काम सुरू केलं आहे.


यांना कोण हटवणार?

रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास बंदी असतानाही दादर पश्चिम भागातच मोठ्या प्रमाणात फेरीवाले बसलेले दिसून येतात. पूर्वी कारवाई कडक असल्यामुळे रात्री १० नंतर बसण्याची हिंमत करणारे फेरीवाले आता संध्याकाळी ६ नंतरच स्थानक परिसरात गर्दी करायला सुरुवात करताना दिसत आहेत.


तरीही यांच्यावर कारवाई होत नाही!

विशेष म्हणजे या फेरीवाल्यांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं काहीही भय राहिलेलं नसून कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांनाही हे फेरीवाले घाबरत नसल्याचं दिसून येत आहे. पोलिसांच्या समोरच वडापाव विक्रेते गॅस पेटवून वडे तळत असतात. तरीही त्यांना हटकले जात नसून उलट पोलिस कर्मचारीच या फेरीवाल्यांकडून खरेदी करत असल्यामुळे फेरीवाल्यांना अप्रत्यक्षपणे पोलिसांचा पाठिंबा असल्याचं दिसून येत आहे. दादरसह मालाड, कांदिवली, घाटकोपर, कुर्ला, भांडुप, विक्रोळी, ग्रँट रोड, मुलुंड, मस्जिद, भायखळा आदी भागांमध्ये फेरीवाले पुन्हा जागा अडवून बसू लागल्यामुळे या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची हिंमत महापालिकेचे अधिकारी तसंच पोलिसांमध्ये नसल्याचंच दिसून येत आहे.



हेही वाचा

फेरीवाला धोरणात ८० टक्के परवाने मराठी तरूणांनाच हवे - संदीप देशपांडे

फेरीवाल्यांनो हद्दीत राहा! महापालिकेने दादरमध्ये आखली १५० मीटरची सीमारेषा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा