Advertisement

'चला तयारीला लागा', महापालिकेच्या १३८८ कामगार भरतीला मंजुरी

मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कामगारांच्या १३८८ जागांच्या भरतीला अखेर स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता सोमवारी जाहिरात प्रसिद्ध करून भरती प्रक्रियेला सुरूवात करण्यात येईल. तब्बल ८ वर्षांनी ही भरती होत आहे.

'चला तयारीला लागा', महापालिकेच्या १३८८ कामगार भरतीला मंजुरी
SHARES

मागील १५ दिवसांपासून रखडलेल्या मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कामगारांच्या १३८८ जागांच्या भरतीला अखेर स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता सोमवारी जाहिरात प्रसिद्ध करून भरती प्रक्रियेला सुरूवात करण्यात येईल. तब्बल ८ वर्षांनी ही भरती होत आहे.


कुठल्या खात्यात किती पदे? जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा


सरळ सेवेने भरती

मुंबई महापालिकेचे जलविभाग, आरोग्य खाते, रुग्णालये, मलनि:सारण आदी अत्यावश्यक विभागांमध्ये कामगारांची पदे रिक्त असून या सर्व विभागात कामगार, कक्षपरिचर, हमाल, आया, स्मशान कामगार आदी वर्गांतील १३८८ रिक्तपदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहे. राज्य शासन आणि टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसचा संयुक्त उपक्रम असलेल्या महाऑनलाईन लिमिटेड या कंपनीमार्फत ही संपूर्ण भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार अाहे.


प्रस्ताव का राखून ठेवला होता?

स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव आल्यानंतर न्यायालयात गेलेल्या २००९ मधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचं काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. निकाल प्रलंबित असताना ही भरती केल्यास नव्या भरतीवर विपरित परिणाम होईल. त्यामुळे महापालिकेने कायदेशीर विभागाच्या माध्यमातून यावर स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी करत हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला होता. त्यानंतर मागील स्थायी समितीची बैठक माहुल प्रकल्पबाधित वसाहतीच्या मुद्दयावरून तहकूब करण्यात आली होती.


प्रशिक्षणार्थी उमेदवारांसाठी राखीव कोटा

मात्र, बुधवारी हा प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी अध्यक्षांनी पुकारल्यावर शिवसेनेचे मंगेश सातमकर, राजुल पटेल, सभागृहनेते यशवंत जाधव यांनी पुन्हा याबाबतची विचारणा करत प्रतिक्षा यादीतील किमान काही उमेदवारांना घेण्यात यावं, अशी मागणी केली. मुंबई महापालिकेत जे प्रशिक्षणार्थी उमेदवार असतात, त्याच्यासाठी या भरतीत राखीव कोटा ठेवण्याची मागणी संजय घाडी यांनी केली.

त्यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी २००९ च्या प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांनी केलेली याचिका अद्यापही बोर्डवर आलेली नसल्याचं सांगत, यापुढे जेव्हा याचिकेवर निर्णय होईल, तेव्हा महापालिका त्या आदेशाचं पालन करेल. न्यायालयाचा आदेश महापालिकेला बंधनकारक असेल. सध्या ही भरती अत्यावश्यक सेवेसाठी असून ही भरती करण्यास कोणतीही अडचण नसल्याचं सिंघल यांनी सांगितलं.


४ लाख अर्ज येण्याची शक्यता

या भरतीसाठी सुमारे ४ लाख अर्ज प्राप्त होतील, असा प्राथमिक अंदाज असून यामध्ये खुला प्रवर्ग व मागास तसेच इतर मागास प्रवर्गातून प्रत्येकी २ लाख उमेदवारांचे अर्ज येऊ शकतात. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी ८०० रुपये व मागास व इतर मागास प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी ४०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. स्थायी समितीची मान्यता मिळाल्याने येत्या सोमवारी याबाबतची जाहिरात प्रकाशित केली जाणार आहे. या जाहिरातीत ऑनलाईन अर्ज कसे करायचे, त्यासाठीची प्रक्रिया आदींची माहिती दिली जाणार आहे. यापुढे महाऑनलाईन संस्थेच्या माध्यमातूनच ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबवणार असल्याचं सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी स्पष्ट केलं.हेही वाचा-

अशी असेल मुंबई पालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया

गुडन्यूज...सिडकोत 57 जागांसाठी भरती!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा