Advertisement

कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या सोसायट्यांना प्रशस्तीपत्र


कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या सोसायट्यांना प्रशस्तीपत्र
SHARES

मुंबईत येत्या २ ऑक्टोबरपासून मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांसह इतर भागांमधील कचऱ्याची विल्हेवाट न लावण्याचा फतवा महापालिका प्रशासनाने काढला आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्यांची विल्हेवाट स्वत:च लावणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना महापालिकेच्यावतीने प्रशस्तीपत्र दिले जाणार असून चांगल्याप्रकारे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची योजना राबवणाऱ्या संस्थांना प्रशिक्षक म्हणून नेमण्याचा विचार महापालिकेच्यावतीने केला जात आहे.

मुंबईतील २ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवरील जमिनीवर तसेच ज्या ठिकाणी १५० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होतो. त्यासर्व ठिकाणचा कचरा २ ऑक्टोबरपासून उचलला जाणार नसल्याची ताकीद महापालिकेच्या आयुक्तांनी सर्व सोसायटींना फर्मान सोडत दिली आहे. त्यामुळे २ ऑक्टोंबरपासून सर्व सोसायटींमध्ये ओल्या कचऱ्याची विल्हेवाट योग्यप्रकारे लावली जावी म्हणून महापालिकेच्या विभाग कार्यालयांच्यावतीने पुढाकार घेतला आहे.


महापालिकेच्या के-पूर्व विभागाचे सहायक आयुक्त देवेंद्र कुमार जैन यांनी विलेपार्ले-अंधेरी-जोगेश्वरी पूर्व भागातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून कचरा वर्गीकरणाची माहिती दिली. यामध्ये बहुतांशी सोसायट्यांनी महापालिकेच्या उपक्रमांची माहिती जाणून घेतल्यानंतर स्वत: या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची तयारी दर्शवली आहे. सुरुवातीला लोकांकडून विरोध होत असला तरी या कचऱ्याचे महत्त्व लक्षात आल्यानंतर ते सोसायट्या तयार होत असल्याची माहिती देवेंद्र कुमार जैन यांनी दिली आहे.


अंधेरी-विलेपार्ले पूर्व भागांमध्ये अनेक सोसायट्यांनी कचरा वर्गीकरण आणि विल्हेवाटीची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे शून्य कचरा मोहीम राबवणाऱ्या सोसायट्यांना महापालिकेच्यावतीने प्रशस्तीपत्रक दिले जाणार आहे, असे जैन यांनी सांगितले. के-पूर्व विभागाच्यावतीने आम्ही ही संकल्पना मांडत असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हेतर याच सोसायट्यांना प्रमुख मार्गदर्शक तथा प्रशिक्षक म्हणून नेमणूक करून इतर सोसायट्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपवली जाणार असल्याचे जैन यांनी सांगितले.


दादरमधील जी-उत्तर विभाग कार्यालयांमध्ये सहायक आयुक्त रमाकांत बिरादर यांनी पुढाकार घेऊन गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना कचऱ्याबाबत मार्गदर्शन केले. महापालिका घनकचरा विभागाचे अधिकारी तानाजी घाग हे सर्व रहिवाशांना कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे महत्त्व पटवून देत आहेत.


  • मुंबईतील एकूण गृहनिर्माण संस्था, कंपन्या : ५ हजार ३०४
  • आतापर्यंत कचरा प्रक्रिया करणाऱ्या सोसायट्या : २३४




हेही वाचा - 

वडाच्या तुटलेल्या फांद्यांना जीवनदान, 'ग्रीन अंब्रेला'चा अनोखा उपक्रम


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा