ठरलं...मेट्रोचं कारशेड आरेमध्येच होणार!

Aarey Colony
ठरलं...मेट्रोचं कारशेड आरेमध्येच होणार!
ठरलं...मेट्रोचं कारशेड आरेमध्येच होणार!
See all
मुंबई  -  

मेट्रो 3 प्रकल्पांतर्गत होणाऱ्या झाडांच्या कत्तलीवरुन सध्या वातावरण तापलेले असतानाच मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी)ने आरे कारडेपोच्या कामाला सप्टेंबरपासून सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. 'एमएमआरसी'च्या या घोषणेमुळे मेट्रो 3 चा कारडेपो आरेतच होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

एका अर्थाने स्थानिक आरेवासीयांचा आणि झाडांच्या कत्तलीविरोधात लढा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा विरोध झुगारुन मेट्रो 3 चे कारशेड आरेत उभारणारच असा हटवादी संदेशच जणू एमएमआरसीने यातून दिलेला आहे.


कामाची निविदा अंतिम

आरे कारडेपोच्या कामाची निविदा अंतिम करत मे. सॅम बिल्टवेल प्रा. लि. या कंपनीला कामाचे कंत्राटही 'एमएमआरसीने' दिले आहे. त्यानुसार दोन महिन्यांत अर्थात सप्टेंबरपासून आरे कारडेपोच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात होईल, असे गुरूवारी 'एमएमआरसी'चे संचालक (प्रकल्प) एस. के. गुप्ता यांनी जाहीर केले आहे.


पर्यावरणवाद्यांचा विरोध

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या 33.5 किमी लांबीच्या मेट्रो मार्गातील कारडेपो आरेत प्रस्तावित असून 27 पैकी एक मेट्रो स्थानक आरेत जेव्हीएलआरलगत असणार आहे. पण आरेत कारडेपो करण्यास पर्यावरणवाद्यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे.

हे प्रकरण हरित लवादापर्यंतही गेले आहे. तर राजकीय स्तरावरही आरे कारडेपोला विरोध होत आहे. आरेला पर्याय म्हणून कांजुरमार्गसह इतर जागाही सुचवण्यात आल्या होत्या. मात्र 'एमएमआरसी'ने आरेच्याच जागेचा हट्ट धरला आणि अखेर हा हट्ट पूर्ण केला आहे.


25 हेक्टर जागेत कारडेपो

मार्चमध्ये कारडेपोच्या बांधकामासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यानुसार मे. सॅम बिल्टवेल कंपनीला बांधकामाचे कंत्राट देण्यात आले आहे. या कंपनीने दिल्ली मेट्रो आणि लखनऊ मेट्रोसाठी कारडेपो बांधण्याचे काम केले आहे.

एकूण 33 हेक्टर जागा मेट्रो-3 साठी सरकारकडून 'एमएमआरसी'ला देण्यात आली आहे. त्यातील 25 हेक्टर जागेवर कारडेपो बांधण्यात येणार आहे, तर 3 हेक्टर जागेतून मेट्रो मार्ग जाणार आहे. उर्वरित 5 हेक्टर जागा ग्रीन झोन म्हणून विकसित करण्यात येणार आहे.

शक्य तितक्या कमी जागेत कारडेपो बांधत जितकी जागा ग्रीन झोन म्हणून वाचवता येईल तितकी जागा वाचवण्याचा प्रयत्न करत 5 हेक्टर जागा वाचविल्याचा दावा गुप्ता यांनी केला आहे.आरेत बांधकामाला स्थगिती नाही

वनशक्ती या पर्यावरणवादी संघटनेने कारडेपोविरोधात राष्ट्रीय हरित लवादात धाव घेतली आहे. लवादात गेल्या कित्येक महिन्यांपासून सुनावणी सुरु असून लवादाने 33 हेक्टरपैकी 3 हेक्टर जागा वगळता इतर जागेत कोणतेही बांधकाम करण्यास स्थगिती दिली आहे.

असे असताना काम कसे सुरू करणार? या 'मुंबई लाइव्ह'च्या प्रश्नावर गुप्ता यांनी अशी लवादाची कोणतीही स्थगिती नसल्याचा दावा केला आहे. पर्यावरणवादी संघटना चुकीची माहिती सांगत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.


'एमएमआरसी' खोटे बोलतेय?

हरित लवादाची स्थगिती नसल्याचा 'एमएमआरसी'चा दावा वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी फेटाळला आहे. स्थगितीसंबंधीच्या लवादाच्या आदेशाची प्रत आपल्याकडे असून ही प्रत प्रसारमाध्यमांनाही देण्यात आली आहे. त्यामुळे 'एमएमआरसी'ने इतके खोटे बोलू नये, अशा शब्दात स्टॅलिन यांनी एमएमआरसीवर टीका केली आहे. तर, कारडेपोत काम करण्यासाठी 'एमएमआरसी'ने यावे, त्यांचे स्वागत वनशक्ती करेल, असे म्हणत 'एमएमआरसी'ला आव्हानही दिले आहे.


3130 झाडांवर कुऱ्हाड, हरित लवादाची दिशाभूल

कारडेपोसाठी आरेतील 3130 झाडे विस्थापित करावी लागतील, तर 5 हेक्टरवरील 1037 झाडे वाचवण्यात 'एमएमआरसी'ला यश आल्याचे 'एमएमआरसी'चे संचालक (प्रकल्प) एस. के. गुप्ता म्हणाले.

ही झाडे कापण्यासाठी लवकरच वृक्ष प्राधिकरणासमोर प्रस्ताव ठेवण्यात येणार असून त्यावेळीच नेमकी किती झाडांची कत्तल करायची आणि किती झाडांचे पुनर्रोपन करायचे हे स्पष्ट होईल, असेही त्यांनी नमूद केले.

'एमएमआरसी'ने कारडेपोच्या कामाच्या निविदेतही साधारणत: इतकीच झाडांची संख्या नमूद केली आहे. मात्र त्याचवेळी राष्ट्रीय लवादात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात कारडेपोसाठी आरेतील अंदाजे 700 झाडे बाधित होणार असल्याची माहिती देत 'एमएमआरसी'ने हरित लवादाची दिशाभूल केल्याचे वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी सांगितले.


असा असेल आरे कारडेपो

 • 33 हेक्टर जागेपैकी 25 हेक्टरवर बांधकाम
 • सॅम (इंडिया) बिल्टवेलला कंत्राट
 • सप्टेंबरपासून कामाला सुरुवात
 • 30 महिन्यांत काम पूर्ण करण्याचा मानस
 • कामाचा एकूण खर्च 328 कोटी
 • कारडेपोसह वर्कशाॅप बिल्डिंग
 • मेट्रो स्थानक बिल्डिंग, सबवे
 • इन्स्पेक्शन्स, मेन्टनन्स वर्कशाॅप
 • ट्रेन धुण्यासाठीची व्यवस्थाही येथेच
 • ट्रेनिंग सेंटर, आॅपरेशन कंट्रोल सेंटर
 • सौर ऊर्जा प्रकल्प, एलईडी लाईटसह पर्यावरणपूरक कारडेपोहे देखील वाचा -

मेट्रो 3 : आणखी 35 झाडांचा बळी?

अरे देवा! हिला मेट्रो म्हणायचं की लोकल!डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.