Advertisement

Exclusive: सोसायट्यांनो सावधान! अग्निरोधक यंत्रणा नादुरूस्त असल्यास वीज-पाणी कापणार

अग्निशमन दलानं ६७ अधिकाऱ्यांचं एक विशेष पथक तयार केलं आहे. हे पथक तक्रारीनुसार वा मिळालेल्या माहितीनुसार इमारतींना अचानक भेट देत अग्निरोधक यंत्रणांची पाहणी करतील. या पाहणीत कायद्याचं उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आल्यास अधिकारी तिथल्या तिथे सोसायटी-बिल्डरविरोधात कारवाई करतील.

Exclusive: सोसायट्यांनो सावधान! अग्निरोधक यंत्रणा नादुरूस्त असल्यास वीज-पाणी कापणार
SHARES

मुंबईतील बिल्डर आणि सोसायट्यांनो सावधान! निवासी-अनिवासी इमारतीत अग्निरोधक यंत्रणा बसवली नसेल वा बसवलेली यंत्रणा बिनकामाची असेल तर तुम्हाला चांगलच महागात पडू शकतं. कारण अग्निरोधक यंत्रणा न बसवणाऱ्या बिल्डरांबरोबरच अग्निरोधक यंत्रणेची देखभाल-दुरूस्ती न करणाऱ्या, फायर सेफ्टी आॅडिट न करणाऱ्या सोसायट्यांच्या मुसक्या आवळण्याचा निर्णय आता अग्निशमन दलानं घेतला आहे.


विशेष पथक तयार

अग्निशमन दलाने ६७ अधिकाऱ्याचं एक विशेष पथक तयार केलं असून हे पथक मुंबईतील इमारतींची पाहणी करणार आहे. या पाहणीत नियमाचं उल्लंघन झाल्याचं सिद्ध झाल्यास बिल्डर-सोसायट्यांविरोधात तिथल्या तिथं कारवाई करण्यात येणार आहे. तर निश्चित वेळेत सोसायट्यांनी आवश्यक ते बदल न केल्यास सोसायट्यांचं पाणी आणि वीज कापली जाणार असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी 'मुंबई लाइव्ह' दिली.



अग्निरोधक यंत्रणा बिनकामाची

बुधवारी सकाळी परळ येथील क्रिस्टल टाॅवरला लागलेल्या आगीतून मुंबईतील निवासी-अनिवासी इमारतीतील अग्निरोधक यंत्रणा बिनकामाची ठरत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. त्याअऩुषगांनं मुंबईतील ९० टक्के इमारतीतील अग्निरोधक यंत्रणा बिनकामाच्या असल्याचं वृत्त बुधवारी 'मुंबई लाइव्ह'नं बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांच्या हवाल्यानं दिलं होतं.


ऐनवेळी धोका

या वृत्तानंतर चांगलीच खळबळ उडाली असून अखेर हे वृत्त खरं ठरलं आहे. कारण मुंबईतील बहुतांश इमारतीतील अग्निरोधक यंत्रणांची सोसायट्यांकडून देखभाल-दुरूस्ती होत नाही, परिणामी ही यंत्रणा एेन कामाच्यावेळी धोका देते, असं कबुली रहांगदळे यांनी दिली आहे. तर सोसायट्यांकडून दर ६ महिन्यांनी फायर सेफ्टी आॅडिट होत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.



कठोर उपाययोजना

इमारतीतील अग्निरोधक यंत्रणा बिनकामाची ठरत असल्यानं आगीवर नियंत्रण आणणं अडचणीचं ठरत आहे. त्यामुळेच आता अग्निशमन दलानं कठोर पाऊल उचललं आहे. त्यानुसार महिन्याभरापूर्वी महाराष्ट्र अग्निशमन प्रतिबंध आणि जीवन सुरक्षा उपाय कायदा २००६ मध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आल्याचं रहांगदळे यांनी मुंबई लाइव्हला सांगितलं.


काय तपासणार?

इमारतीत अग्निरोधक यंत्रणा आहे का? असेल तर त्या यंत्रणेची देखभाल-दुरूस्ती होते का? ती वापरात आहे का? सेफ्टी फायर आॅडिट होत का? या सर्व बाबींची तपासणी करण्यासाठी अग्निशमन दलानं ६७ अधिकाऱ्यांचं एक विशेष पथक तयार केलं आहे. हे पथक तक्रारीनुसार वा मिळालेल्या माहितीनुसार इमारतींना अचानक भेट देत अग्निरोधक यंत्रणांची पाहणी करतील. या पाहणीत कायद्याचं उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आल्यास अधिकारी तिथल्या तिथे सोसायटी-बिल्डरविरोधात कारवाई करतील.


'ही' कारवाई करणार

नव्या तरतुदीनुसार हे अधिकारी सोसायट्यांना नोटीस बजावत काही ठराविक वेळेत यंत्रणा दुरूस्त करण्यासाठी, फायर सेफ्टी आॅडिटसाठी मुदत देतील. त्यानंतरही सोसायटीनं या गोष्टी न केल्यास सोसायटीविरोधात कायदेशीर कारवाईसह इमारतीचं वीज आणि पाणी तोडण्यात येणार असल्याचंही रहांगदळे यांनी सांगितलं.

अग्निशमन दलाकडून या कार्यवाहीची कडक अंमलबजावणी झाली तर नक्कीच आगीच्या घटना रोखण्यात तसंच आगीवर शक्य तितक्या लवकर नियंत्रण मिळवत जिवित आणि वित्तहानी कमी करण्यास मदत होईल, असं म्हटलं जात आहे. या कार्यवाहीला अग्निशमन दलाच्या पथकाकडून सुरूवात करण्यात आली आहे.



हेही वाचा-

मुंबईतील ९० टक्के इमारतीतील अग्निरोधक यंत्रणा बिनकामाची?

क्रिस्टल टाॅवर आग: सुपारीवाला बिल्डरला २७ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा