Advertisement

परळच्या राजाची मूर्ती यंदा २३ फुटांची नाही, तर...

कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर परळ सार्वजनिक मंडळानं देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

परळच्या राजाची मूर्ती यंदा २३ फुटांची नाही, तर...
SHARES

दरवर्षी महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. पण यावर्षी महाराष्ट्रावर कोरोनाव्हायरसचं सावट आहे. अशा परिस्थितीत गणेशोत्सव कसा साजरा करायचा याची सर्वांनाच चिंता आहे. काही दिवसांपूर्वी वडाळ्याच्या जीएसबी मंडळानं यावर्षीचा गणेशोत्सव रद्द केला. आता कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर परळ सार्वजनिक मंडळानं देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

मुंबईतील गणेशमूर्ती या अतिशय भव्य स्वरूपातील असतात. त्यापैकीच एक आहे परळच्या राजाची मूर्ती. परळच्या राजाची मूर्ती २३ फुटाची असते. पण यंदा मंडळानं २३ फुटी भव्य गणेशमुर्ती न साकरता फक्त ३ फुटाची छोटी मुर्ती घडवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरवर्षी परळच्या राजाचा भव्य आगमन सोहळा आणि विसर्जन मिरवणूक काढली जाते. पण यंदा परळच्या राजाचे विसर्जन गिरगाव चौपाटीऐवजी साध्या कृत्रिम तलावात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुठलीही विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार नाही असं मंडळानं जाहीर केलं आहे. त्याशिवाय यंदा वर्गणी देखील न काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नेरपार्कचा गणपती परळचा राजा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी २३ फुटापर्यंत भव्य आकर्षक गणेशमुर्ती मंडळाकडून साकारण्यात येते. पण करोना संकट, आर्थिक मंदी या पार्श्वभूमीवर मंडळाने गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

वडाळा राम मंदिर जीएसबी सार्वजनिक मंडळानं यावर्षी भाद्रपदातील गणेश चतुर्थीला गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी गणेशोत्सव माघ महिन्यातील २०२१ मधील गणेश चतुर्थीला साजरा करण्यात येणार आहे.

जीएसएबी वडाळा इथं ११ दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. या दरम्यान लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे गर्दी असते. पण कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हीच गर्दी टाळणं गरजेचं आहे. कारण गर्दी सोबतच कोरोनाव्हायरसचा संसर्ग वेगानं पसरू शकतो.

परळ, लालबाग पाठोपाठ गिरगाव खेतवाडीत गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी अखिल खेतवाडीतील गणेश मंडळे सुद्धा साध्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करणार आहेत. दोन फुटापासून ते पाच फुटापर्यंत छोटया मुर्ती यंदा घडवण्यात येणार आहेत.

कोरोनाचं सावट असल्यानं यावर्षी गणेशोत्सव साजरा करण्याबाबत राज्य सरकारकडून अनेक बंधनं येण्याची शक्यता आहे. मास्क लावणं, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग राखणं या नियमांचं पालन बंधनकारक असू शकतं. त्यामुळे यावर्षी अनेक मंडळांसाठी या सर्व नियमांचं पालन करत गणेशोत्सव साजरा करणं डोकेदुखी ठरू शकतं. आता इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ काय निर्णय घेतात किंवा ते सर्व नियमांचं पालन कशाप्रकारे करणार आहेत ते येणाऱ्या काही दिवसात कळेलच.



हेही वाचा

कोरोनामुळे वडाळ्यातील जीएसबी मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव रद्द!

यंदाच्या गणेशोत्सवात शाडूच्या मूर्तींना प्राधान्य

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा