आता हार्बर मार्गावरही वन रुपी क्लिनिक!

 Mumbai
आता हार्बर मार्गावरही वन रुपी क्लिनिक!

मुंबईच्या मध्य रेल्वे स्थानकांवर सुरू झालेल्या वन रुपी क्लिनिक या सेवेचा लवकरच महाराष्ट्रभर विस्तार होणार आहे. मुंबईतील मध्य रेल्वेच्या काही महत्त्वाच्या स्थानकांवर वन रुपी क्लिनिकची सेवा दिली जाते. पण, आता ही सेवा हार्बर मार्गावरील मानखुर्द आणि पनवेल स्थानकांवरही उपलब्ध होणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ ऑगस्ट महिन्यापासून होणार आहे. सप्टेंबर महिन्यात बिहारमध्येही ‘वन रुपी क्लिनिक’ प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार असल्याचे वन रुपी क्लिनिकचे संस्थापक डॉ. राहुल घुले यांनी सांगितले आहे.


आतापर्यंत 25 लाख रुपये वाचल्याचा दावा

‘वन रुपी क्लिनिक’मधील बाह्य रुग्ण विभागातल्या रुग्णांचे जवळपास 25 लाख रुपये दोन महिन्यांत वाचल्याचा दावा डॉ. राहुल घुले यांनी केला आहे.

जास्तीत जास्त रुग्णांच्या रक्त चाचणी, सिटी स्कॅन, एमआरआय आणि यूएसजीसारख्या वैद्यकीय चाचण्या फक्त 2 महिन्यांत करण्यात आल्या आहेत.

- डॉ. राहुल घुले, संस्थापक

50 हून अधिक आपत्कालीन घटनांमध्ये क्लिनिकच्या डॉक्टरांनी सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले. या संकल्पनेमुळे मध्यमवर्गीय आणि गरीब वर्गातील सामान्यांच्या डोक्यावरील आरोग्यसेवेचा आर्थिक भार खूपच कमी झाला, असा दावा त्यांनी केला आहे.

या क्लिनिकविषयी मेट्रो व्यवस्थापनानेही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील प्रमुख एसटी स्टँडवरही या क्लिनिकचे काम सुरू आहे. पुण्यातील स्वारगेट येथे या क्लिनिकची सुरुवात होईल. ‘वन रुपी क्लिनिक’ बिहारमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार आहे. या क्लिनिकमध्ये दिवस-रात्र एमबीबीएस आणि एमडी डॉक्टर्स उपस्थित असतील.

या क्लिनिकमध्ये बाह्य रुग्ण विभाग, पूर्ण बॉडी चेकअप, रक्त तपासण्या, हृदय-रक्तदाब-मधुमेह-कर्करोग यांसाठी विशेष विभाग, इत्यादी सेवा रुग्णांना पुरवण्यात येतील. वैद्यकीय चाचण्याही निम्म्या किंमतीत करण्यात येतील.


हेही वाचा -

मुंबईतील एसटी स्टँडवर वन रुपी क्लिनिकची सेवा मिळणार पण...

कमिशन विरोधात ‘वन रुपी' क्लिनिकचाही पुढाकार


Loading Comments