Advertisement

...अन् महापौरांना 'तुंबापुरी' दिसलीच नाही!


...अन् महापौरांना 'तुंबापुरी' दिसलीच नाही!
SHARES

मागील तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतोय. या पावसात अपुरी नालेसफाई, पाणी उपसा करणारी निष्क्रिय यंत्रणा यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबून मुंबईकरांचे अक्षरश: हाल झाले.

मुंबापुरीची 'तुंबापुरी' झाली. मात्र 'मुंबईत पाणी तुंबले, आम्ही नाही पाहिले', अशीच अडेलतट्टू भूमिका महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घेतलेली दिसतेय. त्यामुळेच 'मुंबईत पाणी तुंबले नाही, हे आमचेच यश' असल्याची मुक्ताफळे महापौरांनी उधळली आहेत.


म्हणे, पावसाने मुंबईकर खूश

रविवारी आणि मंगळवारी मुसळधार पावसामुळे हिंदमाता, परळ, शिवडी, शीव, प्रतीक्षानगरसह अनेक भागांमध्ये पाणी तुंबले. मंगळवारी सकाळीही शीव, अॅन्टॉप हिलसह अनेक वस्त्यांमधील घरांमध्ये पाणी शिरले.

पाणी साचल्यामुळे वाहतूक व्यवस्थाही कोलमडली होती. परंतु महापौरांनी 'पावसामुळे मुंबईकर खूश आहेत. पाणी भरल्यामुळे नागरिकांना त्रास झाल्याचा प्रकार कुठेही घडला नाही', असे पत्रकारांशी बोलतांना सांगितले.


'हेच आमच्या कामाचे यश'

पाऊस पडल्यानंतर साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास जेवढा वेळ लागतो, तेवढा वेळ तर लागणारच आहे. परंतु पाणी तुंबले, असे प्रकार घडले नाही.

मुंबईतील नालेसफाई योग्यप्रकारे व्हावी म्हणून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासह आम्ही सगळे लक्ष ठेऊन होतो आणि आहोत. सत्ताधारी पक्ष आणि आयुक्तांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांचे हे श्रेय असल्याचे महापौरांनी सांगितले.


श्रेय शिवसेनेला नाही, इंद्रदेवाला

मुंबईत सध्या पाऊस थांबून थांबून लागत आहे. पावसाने मेहरबानी केलेली आहे. त्यामुळे सध्या पाणी साचत नाही, याचे श्रेय नालेसफाईला किंबहुना त्यावर लक्ष ठेवून असलेल्या शिवसेनेला जात नाही. तर याचे श्रेय आम्ही इंद्र देवाला देऊ, अशा शब्दांत भाजपाचे मनोज कोटक यांनी शिवसेनेचा समाचार घेतला.

गेल्या वर्षीही मुंबईत पाणी तुंबले होते आणि याही वर्षी पाणी तुंबत आहे. त्यामुळे शिवसेनेने श्रेय घेण्याची एवढी घाई करू नये, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला.


महापौरांना पाण्याच्या जागा दाखवू

मुंबईत पाणी साचण्याचे प्रमाण कमी झाले, असा दावा महापौर करत असतील तर त्यांना तुंबलेल्या जागा दाखवून देऊ! महापौरांना आम्ही शीवमध्ये येण्याचे आमंत्रण देणार असून त्यांनी पाऊस पडल्यानंतर याठिकाणी यावे.

म्हणजे किती पाणी तुंबते आणि किती लोकांच्या घरात पाणी शिरून त्यांच्या सामानांचे नुकसान होते हे आम्ही दाखवू, असे आव्हान विरोधीपक्षनेते रवी राजा यांनी दिले आहे.


माहिती लपवण्याचा आयुक्तांचा डाव

रविवारी मुसळधार पावसामुळे तब्बल 46 ठिकाणी पाणी तुंबले होते. परंतु त्यानंतर तुंबलेल्या ठिकाणांची माहिती न देण्याचे आदेशच महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागाला व आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला दिले.

त्यामुळे महापालिकेने पावसाची माहिती देताना तुंबलेल्या पाण्याच्या ठिकाणांची यादीच वगळली आहे. परंतु ज्याठिकाणी पाणी साचते त्याठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी बसवलेले पंप सुरु करण्यात येतात. त्यामुळे मंगळवारी सकाळी पाणी साचल्यानंतर तब्बल 79 ठिकाणी पंप सुरु करण्यात आले होते.


मंगळवारी पाणी तुंबलेल्या ठिकाणांची संख्या

शहर : 38
पश्चिम उपनगरे : 15
पूर्व उपनगरे : 26हे देखील वाचा -

'खड्डे दर्शना'ला सुरुवात!डाऊनलोड करा Mumbai live APP  आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा