विकासकाने 'एसआरएला'च लावला चुना! गुन्हा दाखल


विकासकाने 'एसआरएला'च लावला चुना! गुन्हा दाखल
SHARES

एसआरए प्राधिकरणाची तब्बल आठ कोटींची फसवणूक करणे वांद्र्यातील विकासकाला चांगलेच महागात पडले असून त्याच्या विरोधात मुंबईच्या खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०११ साली वांद्र्यातील भूखंडावर जादा एफएसआय मिळवण्यासाठी विकासकाने एसआरएशी करार करून ११६ सदनिका बांधण्याचे मान्य केले होते. मात्र, जादा एफएसआय मिळवून देखील एकही सदनिका न बांधल्याने एसआरएची फसवणूक केल्याप्रकरणी विकासकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कोण आहे विकासक?

यावेळी खार पोलिस ठाण्यात विकासक कुमार मोरदानी, कन्हैय्यालाल मोरदानी, महेश जगवासी, अमित जगवासी, सुनील दौलतानी आणि पुष्कर सुतार यांच्याविरोधात ७ कोटी ९३ लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


एफएसआय वाढवून मिळण्यासाठी अर्ज

वांद्र्याच्या १६व्या रस्त्यावर एक खाजगी भूखंड होता. या ठिकाणी टोलेजंग इमारत उभारण्याचं विकासकाचं स्वप्न होतं. मात्र, त्यासाठी जादा एफएसआयची गरज होती. त्यासाठी विकासकाने एसआरएच्या नियम ३३(१४)(डी) नुसार अर्ज केला असता
विकासकाला २. ५ एफएसआय वाढवून मिळाला.

वाढीव एफएसआय मिळाल्यानंतर विकासकाला २. ७५ एफएसआय मंजूर झाला. नियमानुसार २.७५ पैकी १.७५ चा एफएसआय विकासक स्वतःच्या इमारतीकरता वापर करू शकणार होता, तर उर्वरित ०.७५ एफएसआयचे पर्मनंट ट्रान्झिट कॅम्प बांधून देणे विकासकावर बंधनकारक होते. या करारानुसार सदर विकासक जोगेश्वरीमध्ये २२५ चौरस फुटांच्या ११६ सदनिका बांधून देणार होता.


पर्मनंट ट्रान्झिट कॅम्प बांधलेच नाहीत!

मात्र, २०११ साली हा करारनामा झाल्यानंतर कित्येक वर्ष लोटली, तरी पर्मनंट ट्रान्झिट कॅम्प बांधून देण्याबाबत मात्र विकासकाने कोणत्याच हालचाली केल्या नाहीत. त्याउलट ठरलेल्या भूखंडावर मात्र त्याने बुकिंग सुरु केल्याचं लक्षात येताच एसआरएने विकासक आणि त्याच्या अन्य पाच भागीदारांवर शासनाची ७ कोटी ९३ लाख ३९ हजार ४७५ रूपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी याआधी देखील विकासकावर एमआरटीपी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती.



हेही वाचा

'एसआरए' झालं डिजिटल, झोपडपट्टीवासीयांच्या फेऱ्या आता बंद!

बिल्डरांनो, एसपीपीएलकडून कर्ज घ्याल, तर एसआरए प्रकल्प मार्गी लावाच


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा