मृत व्यक्ती पुन्हा झाली जिवंत!

  Mumbai
  मृत व्यक्ती पुन्हा झाली जिवंत!
  मुंबई  -  

  दोन वर्षांपूर्वी ज्या आरोपीचा मृत्यू झाल्याचे समजून पोलिसांनी त्याच्या विरोधातील तपास बंद केला होता, तीच व्यक्ती जिवंत असून गुन्हे शाखेने त्याला अहमदनगर येथून अटक केली आहे. त्या व्यक्तीचे नाव शिवाजी घोडके आहे. दोन वर्षापूर्वी त्याने एका व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.


  काय आहे हे प्रकरण?

  24 सेप्टेंबर 2015 रोजी दादर रेल्वे स्थानकाच्या पुलाखाली बळीराम रक्ते नावाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. तेव्हा सीसीटीव्ही फुटेज आणि रेल्वे स्थानकावरील सफाई कामगारांच्या सहाय्याने शिवाजी घोडकेनेच त्या व्यक्तीची हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हापासून पोलिस त्याच्या मागावर होते. पण तो सतत नाव बदलून राहात असल्याने पोलिसांना त्याचा ठाव ठिकाणा मिळत नव्हता.

  पोलिस त्याच्याच शोधात असताना एके दिवशी घोडकेसारख्याच व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना सापडला. पण हा मृतदेह शिवाजी घोडकेचाच आहे का? याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या अहमदनगरमध्ये राहणाऱ्या आई-वडिलांना बोलावून घेतले. तेव्हा हा मृतदेह आपल्याच मुलाचा असल्याचे त्याच्या आई-वडिलांनी सांगितले. त्यामुळे शिवाजी घोडकेचा मृत्यू झाल्याचे समजून त्याच्याविरोधातील तपासच पोलिसांनी बंद केला.


  गुन्हे शाखेने केली तपासाला सुरुवात

  शिवाजी घोडकेचा मृत्यू झाल्याचे समजून पोलिसांनी त्याचा तपास बंद केला. पण त्याचा मृत्यू झालाच नसल्याचा संशय गुन्हे शाखेला होता. त्यामुळे गुन्हे शाखेने पुन्हा तपासाला सुरुवात केली. तेव्हा त्याच्या विरोधात अनेक पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती उघड झाली.

  त्यानंतर पोलिसांनी तपास करुन त्याचे फोटो मिळवले. तसेच, तो चालत्या ट्रेनमध्ये बुट पॉलिश करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घोडकेची जाहीरात देत जो कुणी त्याची माहिती देईल त्याला 10 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे जाहीर केले होते.


  ...आणि घोडकेला अटक

  त्यानंतर काही दिवसांपूर्वी घोडके अहमदनगरच्या श्रीरामपुरमध्ये बुट पोलिश करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. हे समजताच गुन्हे शाखेचे पथक अहमदनगरच्या दिशेने रवाना झाले आणि अखेर त्याला अटक झाली. त्यावेळी आपली ओळख लपवण्यासठी या घोडकेने त्याचा पेहराव आणि वेशभूषा दोन्ही पूर्ण बदलल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांने संगितले.  हे देखील वाचा - 

  युपीतला आरोपी नाला सोपाऱ्यामध्ये बनला साखळी चोर

  दादरमध्ये तरूणावर हल्ला, आरोपी फरार


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.