मुंबई विमानतळावरील स्वच्छतागृहात आयसिसच्या नावाने बॉम्बस्फोटाची धमकी देऊन एकच खळबळ उडवणाऱ्या इसमाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय गायकर (२४) असं या तरुणाचं नाव असून तो विमानतळावरील खाजगी सुरक्षा कंपनीत सुपरवायजर असल्याची माहिती सहार पोलिसांनी दिली आहे. एक व्हिडियो क्लिप पाहून अक्षयने हा उपद्व्याप केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे ही धमकी देण्यामागे आपला कोणताही उद्देश नसल्याचा दावा अक्षयने केला आहे.
२९ नाव्हेंबरला आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर कार्गोमधील स्वच्छतागृहात धमकीची चिठ्ठी सापडली होती. यात '२६ जानेवारी २०१८ला विमानतळावर हल्ला होणार, त्याचबरोबर इसिस हा हल्ला करू शकतं' अशा आशयाचा संदेश सापडताच विमानतळावर एकाच खळबळ उडाली. तात्काळ संपूर्ण परिसरातील लोकांना बाहेर काढण्यात आलं आणि सीआयएसएफ, स्थानिक पोलीस आणि श्वान पथकाच्या मदतीने संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात आली. त्यांनतर ही धमकी केवळ अफवा असल्याचं समोर आलं.
दरम्यान, या प्रकरणी सहार पोलिस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याचा तपास करत असताना सहार पोलिसांनी कित्येक तासांचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं. अक्षय गायकरवर पोलिसांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आलं. चौकशी दरम्यान अक्षयने आपला गुन्हा कबूल केल्याची माहिती सहार पोलिसांनी दिली आहे.
अक्षय हा एसआयएस नावाच्या खाजगी सुरक्षा एजन्सीमध्ये सुरक्षा सुपरवायजर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितानुसार, अक्षयने एक व्हिडियो क्लिप बघितली होती. त्यामध्ये अशा प्रकारे धमकी दिल्यानंतर उडणाऱ्या खळबळीचं चित्रण होतं. ते बघूनच अक्षयने हे कृत्य केल्याची माहिती सहार पोलिसांनी दिली आहे. अद्याप अक्षयने अशी धमकी देण्यामागचं कारण स्पष्ट झालं नसून, सध्या पोलिस त्याचा तपास करत आहेत.
हेही वाचा