सुनील शेट्टीला चोरीप्रकरणी अटक

  Ville Parle
  सुनील शेट्टीला चोरीप्रकरणी अटक
  मुंबई  -  

  विलेपार्लेमध्ये अनेक घरांमध्ये चोरी केल्याच्या आरोपाखाली सुनिल शेट्टीला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या चोऱ्यांसाठी सुनिल शेट्टी रिक्षाचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी सुनिल शेट्टीसह त्याच्या दोन साथीदारांनाही अटक केली आहे.

  तुम्ही म्हणाल की सुनिल शेट्टीकडे इतका पैसा असताना त्याला चोरी करण्याची काय गरज पडली? तर हा सुनिल शेट्टी म्हणजे अभिनेता सुनिल शेट्टी नसून एक भामटा सुनिल शेट्टी आहे. विलेपार्ले पोलिसांनी या भामट्यासह हिमांशू अय्यप्पा शेट्टीयार आणि दिनेश यादव यांना अटक केली आहे.


  कशी करायचे घरफोडी?

  ही टोळी दरोडे घालण्यासाठी रिक्षाचा उपयोग करत होते. आपली रिक्षा घेऊन ते आधी निर्जनस्थळी इमारतीत शिरत आणि काही मिनिटांत चोरी करून पसार होत असत. ही टोळी चोरीदेखील अगदी पद्धतशीरपणे करत. यामधील काहीजण इमारतीच्याबाहेर पहारा देत आणि तेवढ्या वेळात उर्वरित आरोपी घरफोड्या करत. विशेष म्हणजे अवघ्या काही मिनिटांत ही टोळी घरफोडी करून तिथून पसार होत असे, अशी माहिती विलेपार्ले पोलिस ठाण्याचे सहआयुक्त प्रकाश गव्हाणे यांनी दिली. विलेपार्ल्यातच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम उपनगरात या टोळीने हाहाकार माजवला होता.


  या सगळ्या आरोपींकडून आम्ही आमच्या गुन्ह्यातल्या मुद्देमालासह एकूण साडे सात लाख रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.

  प्रकाश गव्हाणे, सह पोलीस आयुक्त, विलेपार्ले

  मे महिन्यातही केली होती चोरी

  मे महिन्यातही या भामट्यांनी विलेपार्लेमध्ये अशाच प्रकारे चोरी केली होती. दुपारच्या वेळी घरातील सगळे सिनेमा बघायला बाहेर गेले असताना ही टोळी इमारतीत शिरली आणि अवघ्या काही मिनटांत घरातील सव्वा चार लाख रुपयांचे दागिने आणि रोकड घेऊन पसार झाले.

  या सराईत चोरट्यांनी आपल्यामागे कोणता पुरावा देखील सोडला नव्हता. शेवटी पोलिसांनी तब्बल 10 हजार मोबाईलची माहिती काढली. तेव्हा हळूहळू या चोरट्यांविषयीची माहिती खबऱ्यांमार्फत पोलिसांना मिळू लागली. त्यानंतर पोलिसांनी हिमांशूसह त्याच्या टोळक्याला एकएक करून पकडण्यास सुरुवात केली.  हेही वाचा -

  सुरक्षा रक्षकानंच केली घरात चोरी!

  पोलिसच झाले दरोडेखोर, चोरले २४ लाखांचे हिरे


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.