Advertisement

अभ्यासक्रम पूर्ण नसतानाच वेळापत्रक जाहीर, एमएससीचा परीक्षेचा नवा गोंधळ


अभ्यासक्रम पूर्ण नसतानाच वेळापत्रक जाहीर, एमएससीचा परीक्षेचा नवा गोंधळ
SHARES

सध्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा सुरु आहेत. मात्र आधी ऑनलाईन असेसमेंट आणि नंतर पुनर्मूल्यांकनात झालेला विद्यापीठाचा गोंधळ या परीक्षेतही कायम असून विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एमएसस्सी प्रवेशाचे अभ्यासक्रम पूर्ण झालेले नसतानाच परीक्षा विभागाने सेमीस्टर एकच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. बहुतांश महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवण्याचे 90 दिवस भरले नसतानाच आता परीक्षेचे वेळापत्रक माथी मारल्याचा प्रकार विद्यापीठाने केला आहे.


अभ्यासक्रमच पूर्ण झाला नाही, इतक्यात परीक्षा!

मुंबई विद्यापीठाच्या उशिरा लागलेल्या निकालांचा मोठा फटका विद्यार्थ्यांना अजूनही बसत आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेशच उशिरा झाल्यामुळे अद्याप अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. एमएसस्सीचे प्रवेशही उशिरा झाले आहेत. त्यामुळे बहुतांश महाविद्यालयातील एमएसस्सीचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला नाही. त्यातच मुंबई विद्यापीठाने 27 डिसेंबरपासून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे. यापैकी अनेक महाविद्यालयांनी एकूण शिकवणी वर्गाची 90 दिवसांची अट देखील पूर्ण केली नसल्याचे प्राध्यापकांकडून सांगण्यात आले आहे.


विद्यार्थी सेनेची वेळापत्रकात बदल करण्याची मागणी

प्रवेश कधी झाले हे न पाहता अचानकपणे परीक्षा विभागाने परीक्षा जाहीर केल्या आहेत. यातूनच परीक्षा विभागाचा ढिसाळ कारभार समोर येत असल्याची टीका मनविसेचे माजी सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी केली आहे. तर, याप्रश्नी सायन्स विभागाच्या समन्वयकांकडे याची तक्रार केली आहे. विद्यार्थ्यांचा हा गंभीर प्रश्‍न लक्षात घेऊन परीक्षा विभागाने वेळापत्रकात बदल करावा अशी मागणीही केली असल्याचे तांबोळी यांनी सांगितले.



हेही वाचा

मुंबई विद्यापीठाचे 'दिवस फिरले'! इंजिनीअरींगच्या परीक्षेसाठी 'जून २०१७' चं वेळापत्रक केलं तयार

सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठ घसरले


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा