Advertisement

गिरणगावकरांची दिवाळी स्पेशल टेस्ट!


गिरणगावकरांची दिवाळी स्पेशल टेस्ट!
SHARES

गिरणगावात काही दशकांपूर्वी कापड गिरण्या होत्या. या ठिकाणी अगदी सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांचे वास्तव्य असायचे. त्यावेळी येथे फार गरीबी किंवा फार श्रीमंतीही नव्हती. मुंबई शहर असले तरी त्यावेळी तंत्रज्ञानाचा समाज जीवनावर फारसा पगडा नव्हता. गरज होती तितकाच वापर देखील असायचा. उंच टॉवर मोजकेच होते. त्यामुळे लिफ्ट, एसी, ओव्हन पासून ते फ्रिज वॉशिंग मशीनपर्यंतच्या सुख-सोयीच्या वस्तू देखील मोजक्याच असायच्या.

ज्यांच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही किंवा टेलिफोन असला, तर तो अख्या चाळीत फेमस व्यक्ती असायचा. रविवारच्या दिवशी आठवड्यातून लागणारा एक चित्रपट पहायला देखील लोक त्याच्या घरी चक्क गर्दी करायचे. अगदी त्याच्या घरातली कामे देखील करू लागायचे. कारण चाळीतल्या त्या घरात बसून टीव्ही पहाता यावा म्हणून लोक त्या व्यक्तीची पडेल ती कामे करायचे. या साऱ्या आठवणी आहेत 40 वर्षांपूर्वीच्या!


तंत्रज्ञानाने घेतला वेग

हल्ली मुलं 7 वर्षांची झाली, तरी आय फोनचा हट्ट करतात. काळाच्या ओघात सारे काही बदलले. गिरण्या बंद झाल्या, चाळी रिडेव्हलप झाल्या, इमारतींना लिफ्ट आल्या, घरात टीव्हीपासून सर्व काही सुख सोयी आल्या. मात्र या सर्वात एक गोष्ट मात्र कॉमन आहे, ती म्हणजे गिरणगावात असलेला विजयलक्ष्मी चिवडा आणि या चिवड्यामुळे फेमस असलेली चिवडा गल्ली.


40 वर्षांपूर्वी चिवड्याचे दुकान केले सुरू

आज लालबागमध्ये चिवडा गल्ली म्हणून फेमस असलेल्या या गल्लीचा आपला असा एक वेगळा इतिहास आहे. या ठिकाणी 40 वर्षांपूर्वी पुण्यातील एका तरुणाने मुंबईत नोकरीच्या शोधार्थ आल्यानंतर एक चिवड्याचे दुकान सुरू केले. त्यावेळी स्वस्ताई फारच होती. त्यामुळे वस्तूंचे दर देखील अगदी कमी असायचे. सुरुवातीला या ठिकाणी पोह्यांचा चिवडा 8 रुपये किलो याप्रमाणे होता. 

आज पिझ्झा बर्गरसारखे पदार्थ सर्वत्र पहायला मिळतात. पण तेव्हा फास्ट फूडचा एवढा पसारा नव्हता. असलाच तर भजी वडापाव तत्सम पदार्थ विक्रीसाठी ठेवलेले दिसून यायचे. त्यामुळे मुलांना खाण्यासाठी, पूजा, दिवाळी, वाढदिवसाला विजयलक्ष्मी चिवडावाल्यांकडून लोक आवर्जून चिवडा खरेदी करत असत. त्यावेळी गिरण्या सुरू होत्या. त्यामुळे गिरणी कामगारांमधला ग्राहक वर्ग मोठा होता. कालांतराने गिरण्या बंद झाल्या. तेव्हा या धंद्यांवर देखील काहीसा परिणाम झाला. परंतु, खाद्य संस्कृती उत्तम जपलेल्या गिरणगावात विजयलक्ष्मी चिवडा गेल्या 40 वर्षांपासून आपले अस्तित्व टिकवून आहे. चिवड्याची क्वालिटी उत्तम असल्यामुळे लोक आजही गिरणगावातल्या या चिवड्याला तितकीच पसंती देताना दिसतात.

पूर्वी या ठिकाणी एवढी दुकानं नव्हती. आज आपण ओळखतो ती चिवडा गल्ली देखील इतर गल्यांपैकी एक होती. कालांतराने या गल्लीत दुकानांची संख्या वाढली आणि ही चिवडा गल्ली म्हणून फेमस झाली. चिवड्याच्या चवीमुळे आजही चिवडा गल्लीत दुकानाचे वेगळेपण कायम आहे. एका दुकानाने 15 लोकांना रोजगार निर्माण करून दिला आहे.
शंकर काळे, चिवडा विक्रेते

काळे सांगतात, मराठी मुलांनी व्यवसाय करणे गरजेचे आहे. त्यामध्ये व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो. कष्ट केले, तर फळ नक्की मिळते. परप्रांतीय लोक येऊन या ठिकाणी धंदा करतात. त्यापेक्षा मराठी तरुणांनी पुढे येऊन धंदा करणे ही सध्या काळाची गरज आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.


कोणकोणते खाद्यपदार्थ मिळतात?

सध्या या दुकानात फरसाण, मक्याचा चिवडा, कचोरी, बटाट्याचे वेफर, मिठाई हे पदार्थ मिळतात. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईदेखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. प्रामुख्याने येथील पोह्यांचा आणि मक्याचा चिवडा विशेष प्रसिद्ध आहे. सध्या बाजारात असलेल्या चिवड्यापेक्षा अगदी स्वस्त 160 रुपये किलो चिवडा या ठिकाणी उपलब्ध आहे. जीएसटीचा यंदा बाजारपेठेवर परिणाम झाला असला, तरी चिवडा गल्लीतला चिवडा मात्र सर्वसामान्य लोकांना परवडेल, अशाच किंमतीमध्ये उपलब्ध आहे.हेही वाचा - 

दिवाळीत यंदा साहित्याचा फराळ

'इथे' प्रत्येक घरात बनतात कंदील! पहा मुंबईतलं कुठलं आहे हे ठिकाण...


संबंधित विषय
Advertisement