Advertisement

वांद्र्यातील मंडळानं साकारली टिळकांच्या चिखलीतल्या वाड्याची प्रतिकृती

परिस्थिती गंभीर असली तरी अनेक मंडळांनी आकर्षक देखावे केले आहेत.

वांद्र्यातील मंडळानं साकारली टिळकांच्या चिखलीतल्या वाड्याची प्रतिकृती
SHARES

मुंबईतील गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध असून, अनेक ठिकाणाहून पर्यटक बाप्पाच्या दर्शनासाठी आणि देखावे पाहण्यासाठी मुंबईत येत असतात. मुंबईतील अनेक सार्वजनिक मंडळं आकर्षक देखावे सादर करतात. हे देखावे पाहण्यासाठी गणेशभक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. परंतु, यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं गणेशोत्सव साधेपणानं साजरा केला जात आहे. गणपती बाप्पाच्या मूर्तीची उंची कमी करण्यात आली आहे. मात्र, परिस्थिती गंभीर असली तरी अनेक मंडळांनी आकर्षक देखावे केले आहेत.

वांद्र्यातील वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षानिमित्त टिळकांचं जन्मगाव असलेल्या रत्नागिरीतील चिखली येथील वाड्याची हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणानं तसंच, उत्सवाची परंपरा अखंडित ठेवून हा उत्सव १२ दिवस साजरा करण्यात येत आहे.

या मंडळाचं यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष असून, गेल्या २४ वर्षांत पश्चिम उपनगरातील अग्रगण्य मंडळ म्हणून नावलौकिक मिळवला आहे. या मंडळातर्फे दरवर्षी एका प्रसिद्ध मंदिराची प्रतिकृती करण्यात येत असून, ही आरास पाहण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून, प्रत्यक्ष दर्शन घेणाऱ्यांसाठी आरोग्याचं सर्व नियम पाळण्यात येणार आहेत.

या मंडळातर्फे आरोग्य शिबीर, मास्क वाटप असे कार्यक्रमही राबवण्यात येत आहे. या मंडळानं आतापर्यंत पंढरपूरचं विठ्ठल मंदिर, मुंबईचे सिद्धिविनायक, जेजुरीचे खंडोबा, शिर्डीचे साईबाबा समाधी मंदिरासह, गोव्याची शांतादुर्गा, नाशिकचे काळाराम मंदिर, तुळजापूरचे भवानी माता मंदिर, ज्योतीबाचे मंदिर, गणपतीपुळे मंदिर, देवगडमधील कुणकेश्वर, औरंगाबाद येथील घृष्णेश्वर आणि कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत.



हेही वाचा -

वसईत विसर्जनासाठी 'तलाव आपल्या घरी' संकल्पना

दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा