Advertisement

बाप्पाच्या देखाव्यात अवयवांचं मनोगत


बाप्पाच्या देखाव्यात अवयवांचं मनोगत
SHARES

गणेशोत्सवाच्या निमित्ताने अवयवदानासाठी प्रबोधन करण्याची संधी सर्वसामान्य मुंबईकरांनीही घेतली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांबरोबरच घरगुती गणेशदर्शनासाठी येणाऱ्यांनाही अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्याचे महत्कार्य सामान्य मुंबईकर करतोय, हे कौतुकास्पद आहे.

सध्याच्या बदलत्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे वयोवृद्ध आणि तरुणांमध्ये अवयव निकामी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारही अवयवदान किंवा रक्तदान असे अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे. तरी देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण अवयवदात्यांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सरकारने सुरू केलेल्या अवयवदानाच्या मोहिमेत गणेशोत्सव मंडळांबरोबरच आता घरगुती बाप्पानींही पुढाकार घेतला आहे. परळच्या नरेपार्क येथे राहणाऱ्या विकास वराडकर यांनी घरगुती बाप्पासाठी एक देखावा उभारला आहे. ज्यात त्यांनी अवयवदान आणि अवयवांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

'मी अवयव बोलतोय', असा संदेश देणारा हा देखावा आपल्याला अवयवांचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करतोय. या देखाव्यात शरीरातील सर्व महत्त्वाचे अवयवांचे प्रात्यक्षिक ठेवण्यात आले आहे. त्या प्रत्येक अवयवाच्या बाजूला पोस्टर लावण्यात आले आहे. मनुष्याचे शरीर जोपर्यंत साथ देते तोपर्यंत शरीरातील अवयव साथ देतात. त्यामुळे अशा सर्व अवयवांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. जर मुनष्याने अवयवांची काळजी घेतली तर अवयव अधिक काळ साथ देऊ शकतील असा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे.

शिवाय, या देखाव्यातून माझ्या मेंदूमृत शरीरातील अवयव घ्या, इतरांना पूर्ण आयुष्य जगण्याची संधी मिळवून द्या...असा संदेशही देण्यात आला आहे.

आम्ही दरवर्षी काही ना काही देखावा करतो. पण, सामाजिक बांधिलकीतून लोकांना काहीतरी संदेश द्यावा म्हणून यावर्षी अवयवदानाचा देखावा आम्ही उभारला आहे. शरीरात मनुष्य जगेपर्यंत त्याचे अवयव त्याला साथ देतात म्हणून त्या अवयवांना सन्मानित करून आम्ही त्यांना प्रमाणपत्रही दिले आहे. अवयवांचा सन्मान करावा हाच या देखाव्यामागचा उद्देश आहे.
- विकास वराडकर

दर्शनाला येणाऱ्या भाविकांना अवयवदानाबाबतीत माहितीही दिली जातेय. त्यासाठी एक पुस्तिका छापण्यात आली आहे. या पुस्तिकेत अवयव प्रत्यारोपण म्हणजे काय? शरीरातील कुठले अवयव दान करता येतात?, ब्रेनडेड रुग्ण म्हणजे काय?, अवयव दान करण्यासाठी नेमकं काय करावे? अशी माहिती देण्यात आली असल्याचेही वराडकर यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना सांगितले.


हेही वाचा - 

बंधनात अडकले बाप्पा

बाप्पाचे ऐका, जलप्रदूषण रोखा!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा