Advertisement

तुम्हाला माहितेय का? वरळीत वाढलंय भारतातलं सर्वात उंच 'ख्रिसमस ट्री'


तुम्हाला माहितेय का? वरळीत वाढलंय भारतातलं सर्वात उंच 'ख्रिसमस ट्री'
SHARES

सरप्राईज गिफ्ट देणाऱ्या सांताक्लाॅजसोबतच ख्रिसमसचं सर्वात मोठं आकर्षण असतं ते ख्रिसमस ट्री. ख्रिसमससाठी सजावट करताना पेपर आणि प्लास्टीकपासून बनवलेल्या ख्रिसमस ट्रीला फारच महत्त्व असतं. सध्या बाजारात काही इंचापासून फुटापर्यंत सजावटीचे ख्रिसमस ट्री उपलब्ध असले, तरी वरळीत असं एक कुटुंब आहे, जे खऱ्याखुऱ्या ख्रिसमस ट्रीसोबत सण साजरा करतं. एवढंच नव्हे, तर हे ख्रिसमस ट्री भारतातलं सर्वात उंचीचं ख्रिसमस ट्री असून त्याची नुकतीच 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे.४५ वर्ष जुनं झाड

वरळीतील आदर्श नगर सोसायटीमधील सलडाना कुटुंबीयांच्या मालकीचं हे ख्रिसमस ट्री आहे. या झाडाची उंची ६० ते ६५ फूट एवढी आहे. ४५ वर्षांपूर्वी डग्लस सलडाना यांनी हे झाड आपल्या घराबाहेर लावलं होतं. तेव्हापासून आजपर्यंत ते या झाडाची निगा राखत आहेत. दरवर्षी ख्रिसमसमध्ये हे झाड ते रोषणाईने सजवतात. या डेकोरेशनसाठी किमान २० दिवसांचा कालवाधी लागतो. यंदा त्यांनी १० हजार ट्विंकल्स लाईट्स, छोटे छोटे सांताक्लॉज, बेल, स्नोमॅन अशा विविध वस्तूंनी हे ख्रिसमस ट्री सजवलं आहे.
असं मिळालं झाड

डग्लस सलडाना आणि त्यांची बहिण ट्विला सलडाना या दोघांनी १९७० साली हे झाड २५० रुपयात खरेदी केलं होतं. त्यांच्या समोरच्या कॉलनीतील एका मित्राकडे हे झाड होतं. त्या झाडाची उंची ६-७ फूट झाल्यामुळे ते घराच्या ग्रीलमध्ये ठेवणं कठीण झालं होतं. यामुळे हे झाड सलडाना यांनी विकत घेतलं आणि आपल्या घराबाहेरील जागेत लावलं. कालांतराने या झाडाची उंची सरळ वाढत राहिली आणि आज या झाडाची उंची ६० ते ६५ फुटांपर्यंत गेल्याचं सलडाना यांनी सांगितलं.रेकाॅर्डब्रेक उंची

सलडाना यांचं ख्रिसमस ट्री हे फक्त मुंबईतील सर्वात उंच ख्रिसमस ट्री नसून भारतातील सर्वात उंच ख्रिसमस ट्री बनलं आहे. हे झाड पाहण्यासाठी दरवर्षी येथे लोकांची एकच गर्दी होते. या ख्रिसमस ट्रीची २०१३ साली 'लिम्का बुक ऑफ रेकाॅर्ड'मध्ये देखील नोंद झाली आहे. तर यावर्षी 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये या ट्रीची नोंंद झाली आहे.


(सर्व फोटो- मणिकंदन)

https://www.instagram.com/mani__94/


हेही वाचा-

फिरायला बाहेर निघालेले मुंबईकर वाहतूककोंडीने 'जाम'

संबंधित विषय
Advertisement