पावसाळ्यात रानभाज्या म्हणजे वरदान!


  • पावसाळ्यात रानभाज्या म्हणजे वरदान!
  • पावसाळ्यात रानभाज्या म्हणजे वरदान!
  • पावसाळ्यात रानभाज्या म्हणजे वरदान!
  • पावसाळ्यात रानभाज्या म्हणजे वरदान!
  • पावसाळ्यात रानभाज्या म्हणजे वरदान!
  • पावसाळ्यात रानभाज्या म्हणजे वरदान!
  • पावसाळ्यात रानभाज्या म्हणजे वरदान!
  • पावसाळ्यात रानभाज्या म्हणजे वरदान!
  • पावसाळ्यात रानभाज्या म्हणजे वरदान!
  • पावसाळ्यात रानभाज्या म्हणजे वरदान!
SHARE

मुंबई-ठाण्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रानभाज्या दिसून येतात. वर्षभर मेथी, शेपू, पालक, लाल माठ यांसारख्या अनेक पालेभाज्या आपल्या रोजच्या जेवणाचा भाग होतात. पण पावसाळ्यात या रानभाज्यांची बातच काही और असते. पूर्वी या भाज्या शहरातही लावल्या जायच्या. वाढते शहरीकरण आणि जंगलांचा होणार ऱ्हास, यामुळे या भाज्या शहरांमध्ये दिसणं हे दुर्मीळच झालं आहे. पण जंगलांवर उपजीविका करणाऱ्या आदिवासींना या पावसाळी भाज्यांची चांगली ओळख असते. यावर त्यांची घरं चालतात. वसई, विरार, पनवेल, कर्जत, नेरळ आणि अलिबाग या भागांमधून मुंबईच्या बाजारात या भाज्या येतात. आमच्या घरात या भाज्या गावाकडून यायच्या. आजीनं घरी भाजी केली की सर्वच ताव मारायचे. रानभाज्या या चवीला रुचकर तर असतातच, शिवाय त्या पौष्टिक आणि औषधीसुद्धा असतात. अशाच काही रानभाज्या आपण पाहूयात.

टाकळा

टाकळा या भाजीला तखटा या नावानंही ओळखलं जातं. या भाजीची पाने लांबट गोल असतात. भाजी पचायला हलकी, उष्ण, तिखट आणि तुरट असते. ती पित्तकारक आणि मलसारक आहे. या वनस्पतीला उग्र वास जरी येत असला तरी टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. फक्त कोवळ्या पानांचीच नाही तर शेंगांचीही भाजी केली जाते. टाकळ्याच्या पानांची भाजी सर्व प्रकारच्या त्वचारोगांवर फायदेशीर असते. तर त्याच्या बिया वाटून त्याचा लेप त्वचेवर लावला जातो.

टाकळ्याच्या पानांमध्ये विरेचन द्रव्य आणि लाल रंग असतो. या वनस्पतीत एमोडिन ग्लुकोसाइड आहे. कधी तरी ही भाजी खाल्यानं अंगातील अतिरिक्त मेद कमी होण्यास याचा उपयोग होतो. अॅलर्जी, सोरायसिस, खरुज यासारखे त्वचाविकारही यामुळे कमी होतात.

आंबुशी

आंबुशी या वनस्पतीला आंबुटी, आंबोती, चांगोरी अशी स्थानिक नावं आहेत. तर आंबुशीला इंग्रजीमध्ये इंडियन सॉरेल असं म्हणतात. पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला आंबुशी ही नाजूक वनस्पती उगवलेली तुम्हाला दिसेल. ही भाजी रुक्ष आणि उष्ण आहे.

ही वनस्पती पचनास हलकी आणि भूकवर्धक आहे. कफ, वात आणि मुळव्याध या आजरावर ही भाजी गुणकारी आहे. आंबुशीच्या रसानं धमन्यांचे संकुचन होऊन रक्तस्त्राव बंद होतो. अतिसार, त्वचारोग आणि चौघारे तापात ही वनस्पती उपयुक्त आहे. ताज्या पानाची कढी अपचनाच्या रोग्यांना पाचक आहे. कोकणात आंबुशी पाण्यात वाटून डोके दुखण्यावर डोक्याला लावतात.

मायाळू

मायाळू या वनस्पतीची लागवड बागेत, अंगणात किंवा कुंडीत करता येते. याची पानं एका आड एक, जाड, अंडाकृती आणि हिरव्या किंवा तांबूस रंगाची असतात. कोकणात ही वेल आढळते. तर, आशिया आणि आफ्रिका या खंडातील उष्ण कटिबंधीय प्रदेशात ही वेल जास्त आढळते. या वनस्पतीला काही ठिकाणी वेलबोंडी असेही म्हणतात. तर इंग्रजीत मायाळूला इंडियन स्पिनॅच आणि मलबार नाईट शेड अशी नावं आहेत.

मायाळू तुरट, गोडसर, भूकवर्धक असून गुणधर्मानं ही भाजी थंड स्वरुपाची आहे. त्यामुळे पित्ताचा किंवा उष्णतेचा त्रास वाढल्यावर ही भाजी लाभदायी ठरू शकते. पालक भाजीप्रमाणे ही भाजी सुद्धा पचण्यास हलकी असते. सांधेदुखीसाठी ही भाजी फायदेशीर ठरू शकते. या भाजीमुळे रक्तशुद्धी होऊन त्वचाविकारही कमी होतात. मायाळूचा रस पित्त उठल्यावर अंगावर चोळतात.

करटोली

करटोलीची वेल ही कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम घाट आणि पश्चिम महाराष्ट्र् येथे आढळते. कंटोळा या नावानं सुद्धा ही भाजी ओळखली जाते. डोंगराळ भागात ही वनस्पती आढळते. या वनस्पतीची फळं कारल्यासारखी दिसणारी पण आकारानं लहान अशी आहेत. याची भाजी करुन खातात.

करटोली ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. करटोली हे डोकेदुखीवर उत्तम औषध आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते.

कपाळफोडी

कपाळफोडी ही वेलवर्गीय वनस्पती असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळते. कपाळफोडी ही वनस्पती कानफुटी, कर्णस्फोटा या नावानंही ओळखली जातात. तर काही ठिकाणी तिला तेजोवती या नावानंही ओळखले जाते. याच्या बियांचा आकार हृदयासारखा असल्यानं इंग्रजीत याला हार्ट पी असे म्हणतात. याची फळे फुग्यांसारखी दिसत असल्यानं त्याला बलून वाईन असेही म्हणतात. ही वनस्पती जंगल, शेत आणि ग्रामीण भागात आढळते. कपाळफोडीची पानं कडूलिंबाच्या पानांसारखी दिसतात.

कपाळफोडीच्या पानांची भाजी करतात. ही भाजी वात आणि संधिवातात खाणे फायदेशीर ठरते. पोटांच्या विकारात ही भाजी गुणकारी ठरते. स्त्रियांची मासिक पाळी नियमित होत नसेल किंवा अंगावरुन कमी प्रमाणात जात असेल तर या भाजीचा चांगला गुण येतो. गुप्तरोगात या भाजीचा चांगला उपयोग होतो. कपाळफोडीच्या पानात अँटिबायोटिक आणि अँटिपॅरासायटिक तत्वे असतात. खोकल्यावर कपाळफोडीची भाजी गुणकारी आहे. कान दुखत असल्यास या वनस्पतीचा रस कानात घालतात. त्यामुळे या वनस्पतीला कानफुटी असे म्हणतात.

शेवळा

ही एक कंदवर्गीय वनस्पती आहे. ही वनस्पती महाराष्ट्रात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि अकोला जंगलात आढळते. राणसुरण, जंगली सुरण, मोगरी कंद या नावानं ही वनस्पती ओळखली जाते. तर इंग्रजीत ही वनस्पती एलिफंट फूट याम, ड्रॅगन स्टॉक याम या नावानं ओळखली जाते. पावसाळ्यात जमिनीत असणाऱ्या कंदापासून एक पान तयार होते. पानाचा देठ रुंद आणि देठाचा वरील भाग निमुळता असतो.

शेवळ्याचा कंद आणि कोवळ्या पानांची भाजी करता येते. ही भाजी पौष्टिक असते. शेवळ्याच्या कंदाचा औषधात वापर होतो. कंदाची पाने दूध आणि साखरेसोबत देतात. शेवळा थोडा खाजरा असतो. त्यामुळे त्याच्यासोबत काकड या वनस्पतीची आंबट फळे घालतात.

मोरशेंड

महाराष्ट्रात ही वनस्पती कोकण, पश्चिम घाट, खानदेश, मराठवाडा, विदर्भ इथल्या शेतात किंवा जंगल परिसरात आढळते. ही रोपवर्गीय वनस्पती पावसाळ्यात आढळते.

मोरशेंड वनस्पतीच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. संधिवाताच्या विकारात या भाजीचा उपयोग होतो. या भाजीचा जेवणात समावेश केल्यानं रक्तातील युरिक अॅसिडचे प्रमाण कमी होऊन सांध्यांची सूज कमी होते. गुप्तरोग या विकारात मोरशेंड भाजीमुळे चांगला फायदा होतो.

नळीची भाजी

नळीची भाजी ही वेलवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीची वेल जमिनीवर पसरत वाढते. नाळ, नाळी, नाडिका अशी याची स्थानिक नावं आहेत. तर वॉटर स्पिनॅच हे त्याचं इंग्रजी नाव आहे. ही वनस्पती भारतात सर्वत्र आढळू शकते. तलावांच्या शेजारी, काठांवर, ओलसर जमिनीवर, दलदलीच्या ठिकाणी ही वनस्पती आढळते.

ही वनस्पती दुग्धवर्धक आणि कृमीनाशक असते. पांढरे डाग, कुष्ठरोग, पित्तप्रकोप आणि तापात ही वनस्पती उपयुक्त आहे. शिवाय ही भाजी कफ आणि वातवर्धक आहे. कावीळ आणि यकृतविकारात या वनस्पतीचा वापर करतात. या वनस्पतींची पाने आणि टोकांकडील खोडे भाजी करण्यासाठी वापरतात. नळीच्या भाजीच्या सेवनामुळे शरीरास सुमारे १९ कॅलरीज इतकी उर्जा मिळते. त्यामुळे याची भाजी शरीरासाठी पौष्टिक आहे.

आघाडा

आघाडा ही रोपवर्गीय वनस्पती आहे. ही वनस्पती जंगलात, ओसाड, शेतात सर्वत्र आढळते. अपामार्ग असं या वनस्पतीचं स्थानिक नाव आहे. तर प्रिकली चॅफ फ्लॉवर या भाजीचं इंग्रजी नावं आहे. या वनस्पतीची मुळे, पाने, फळे ही औषधात वापरली जातात.

आघाड्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. ही भाजी पाचक असून यामुळे लघवीस साफ होण्यास मदत होते. या भाजीच्या सेवनामुळे हाडे मजबूत होतात. आघाडा कडू, तिखट, उष्ण, रक्तवर्धक गुणधर्माचा आहे. ही वनस्पती वात, हृदयरोग, मूळव्याध, मुतखडा, पोटदुखी या विकारांमध्ये फायदेशीर आहे. अंगातील जास्तीची चरबी कमी करण्यासाठी आघाड्याच्या बिया उपयुक्त आहेत. जेवणापूर्वी आघाड्याच्या काढ्यामुळे पचनशक्ती सुधारेल. जेवणानंतर या काढ्याचे सेवन केल्यास आम्लपित्ताचा त्रास कमी होईल.

गोखरू

गोखरू या वनस्पतीला सराटा, काटे गोखरु, गोक्षुर अशी स्थानिक नावं आहेत. तर इंग्रजीत या वनस्पतीला स्मॉल कॅलट्रोप्स असं नाव आहे. उष्ण, कोरड्या आणि कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात गोखरु ही जमिनीवर पसरत वाढणारी रोपवर्गीय वनस्पती आहे.

गोखरुची पाने आणि कोवळी खोडे भाजीसाठी वापरतात. मुतखडा या विकारावर ही भाजी फायदेशीर ठरेल. मुतखडा होऊ नये म्हणून गोखरुची भाजी उपयोगी ठरते. कंबरदुखी, अंगदुखीवर गोखरुची भाजी उपयोगी आहे. गोखरुची मुळं, फळे औषधात वापरतात. गोखरू हे शीतल आहे. आमवातात गोखरू आणि सुंठ यांचा काढा उपयुक्त आहे. पंडुरोगावर गोखरुचा काढा मध घालून देतात.

संबंधित विषय
ताज्या बातम्या