चला मालवणी जत्रेक जावया

  मुंबई  -  

  अंधेरी -  डी. एन. नगर परिसरातल्या महात्मा फुले क्रीडांगणात मालवणी जत्रा भरलीय. शिवसेना शाखा क्रमांक 60, समर्थ जनसेवा मंडळ, भारतीय कामगार सेना यांच्या संयुक्त विद्यामानं ही जत्रा आयोजित केलीय. आकाश पाळणे, जाईन्ट व्हील, दशावतार नाटक, नृत्य स्पर्धा आणि चकाकणारा माहोल आणि बोचऱ्या थंडीतही जमलेली गर्दी मालवणी जत्रेच्या निमित्तानं पाहायला मिळतेय. आठ जानेवारीपर्यंत तुम्ही या जत्रेचा आनंद लुटू शकता.

  एवढेच नाही तर ही जत्रा खवय्यांसाठी पर्वणीच आहे. गरमागरम कोंबडी वडे, भाकरी, सुकट मच्छी, आणि असे अनेक पदार्थांची चव तुम्हाला चाखता येईल. बोचऱ्या थंडीत याचा आस्वाद घेण्याची मजा काही औरच. तसंच मालवणची खासियत असलेली पदार्थ म्हणजे झणझणीत मसाले, आंबट-गोड आणि चटपटीत लोणची, पापड, कोकम आणि आंबा सरबत, कैरी पन्हे अशा अनेक पदार्थांचे स्टॉल इथं मांडण्यात आलेत. तर मनोरंजनासाठी विविध खेळ आयोजित करण्यात आलेत. लहान मुलांचे नृत्य तर या जत्रेचे आकर्षण आहे. महिलांसाठी फक्त 10 रुपयात पाच पैठणी साड्या असा लकी ड्रॉ सुरू करण्यात आलाय. जत्रोत्सवात येणाऱ्यांसाठी खंडोबाच्या भव्य मंदिराची कलाकृती उभारण्यात आली आहे.

  खरच मुंबईसारख्या शहरात भरलेली ही जत्रा क्वचितच पाहायला मिळते. आपली संस्कृती जपणाऱ्या या जत्रा आजही अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहेत. मॉल संस्कृतीकडे हल्ली समाजाचा कल वाढत असला तरी जत्रेची क्रेझ कायम आहे.

  Loading Comments
  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.