Advertisement

गुडन्यूज! म्हाडाची सर्व गटातील घरं होणार स्वस्त!!

म्हाडानं घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी किंमतीच्या धोरणात बदल करण्यात येणार असून अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च अशा सर्वच गटातील घरांच्या किंमती शक्य तितक्या कमी करण्यात येणार असल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

गुडन्यूज! म्हाडाची सर्व गटातील घरं होणार स्वस्त!!
SHARES

म्हाडाची घरं म्हणजे गोरगरीबांना परवडणारी घरं. पण गेल्या काही वर्षांत म्हाडाची घरं आणि खासगी बिल्डरांची घरं यात किंमतींचा काहीच फरक राहिलेला नाही. म्हाडाच्या घरांच्या किंमती दिवसेंदिवस गगनाला भिडत असल्यानं म्हाडाच्या लाॅटरीकडे एक तर पाठ फिरवली जात आहे वा विजेत्यांकडून घरं परत केली जात आहेत. मात्र हे चित्र लवकरच बदलणार आहे. कारण म्हाडानं घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी किंमतीच्या धोरणात बदल करण्यात येणार असून अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च अशा सर्वच गटातील घरांच्या किंमती शक्य तितक्या कमी करण्यात येणार असल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


किंमतीत सातत्याने वाढ

परवडणाऱ्या घरांची निर्मिती करत गरीबांना लाॅटरीद्वारे ही घरं वितरीत करणं हे म्हाडाचं मुख्य उद्दीष्ट. पण गेल्या काही वर्षांत म्हाडाच्या घरांच्या किंमती वाढतच चालल्या आहेत. अगदी अत्यल्प गटापासून उच्च गटापर्यंतच्या घरांच्या किंमतींचा यात समावेश आहे. गेल्या वर्षीच्या सोडतीत तर म्हाडाच्या उच्च गटातील घरांच्या किंमतीने २ कोटीची झेप घेतली. अल्प-मध्यम-उच्च गटातील पवई, विरारची घर असो वा लोअर परळमधील दीड कोटी आणि २ कोटींची घरं या घरांच्या किंमतींनी विजेत्यांनाही भोवळ आणली आहे. त्यामुळे पवई, विरार आणि लोअर परळमधील घर मोठ्या संख्येनं विजेत्यांकडून परत केली जात आहेत.


किंमती शक्य तितक्या कमी

अखेर म्हाडा खडबडून जागी झाली असून म्हाडाने आपल्या किंमतींच्या धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. घरांच्या किंमती ठरवताना कोणत्या-कोणत्या घटकांचा समावेश करायचा, घरांच्या किंमतींचा भार कसा करायचा? याचं धोरण नव्यानं ठरवण्यात येणार आहे. यात सर्वात मोठा दिलासा म्हणजे अत्यल्पपासून उच्च गटापर्यंतच्या घरांच्या किंमती कमी होणार असल्याने गरीबांच्या घराचं स्वप्न आता स्वस्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे घरांच्या किंमती शक्य तितक्या कमी करण्याचा प्रयत्न असणार असल्याचं म्हैसकर यांनी मुंबई लाइव्हला सांगितलं आहे.


माजी म्हाडा अधिकाऱ्याला पाचारण

म्हाडाने घरांच्या किंमतीचं धोरण नव्यानं तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. असं असलं तरी म्हाडाची, लाॅटरीची आणि किंमतीच्या धोरणाची इत्यंभूत माहिती असलेल्या जुन्याजाणत्या अधिकाऱ्यांची गरज म्हाडाला भासत आहे. त्यानुसार म्हाडातून मुख्य अभियंता म्हणून काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या आणि सध्या 'महारेरा'त वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले डी. आर. हडदरे यांना बोलावण्यात येणार आहे. त्यासाठी म्हाडाकडून हडदरे यांना विचारणा करण्यात आली असून हडदरे यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. किंमतीचं धोरण ठरवण्यासाठी आवश्यक ती मदत हडदरे यांच्याकडून घेण्यात येणार आहे.



हेही वाचा-

'पीएमएवाय'मध्ये नोंदणी करायचीय? मग सकाळी ९ ते १ अशी वेळ काढा

म्हाडाचा रेकाॅर्ड! लॉटरीच्या दुसऱ्याच दिवशी दिलं विजेत्यांना 'ऑफर लेटर'



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा