Advertisement

म्हाडाची विरार फास्ट! विरार-बोळींजमधील ३३०० घरांची लाॅटरी लवकरच

कोकण मंडळही विरार-बोळींजमधील घरांच्या लाॅटरीच्या तयारीत असल्याची खात्रीलायक माहिती म्हाडातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. विरार-बोळींजमधील ३३०० घरं नुकतीच कोकण मंडळाच्या ताब्यात आली असून या घरांसाठी लाॅटरी काढण्याची तयारी मंडळाकडून सुरू आहे.

म्हाडाची विरार फास्ट! विरार-बोळींजमधील ३३०० घरांची लाॅटरी लवकरच
SHARES

मुंबईकरांसह कोकणातील इच्छुकांसाठी एक खुशखबर आहे. मुंबई मंडळाची लाॅटरीसाठी तयारी सुरू असतानाच कोकण मंडळही विरार-बोळींजमधील घरांच्या लाॅटरीच्या तयारीत असल्याची खात्रीलायक माहिती म्हाडातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. विरार-बोळींजमधील ३३०० घरं नुकतीच कोकण मंडळाच्या ताब्यात आली असून या घरांसाठी लाॅटरी काढण्याची तयारी मंडळाकडून सुरू आहे.


किती घरांचा प्रकल्प?

विरार-बोळींजमध्ये कोकण मंडळाकडून अंदाजे १० हजार घरांचा प्रकल्प राबवला जात आहे. एकाच वेळेस काम सुरू असलेला म्हाडाच्या इतिहासातला हा सर्वात मोठा प्रकल्प मानला जातो. या प्रकल्पात केवळ अल्प आणि मध्यम गटासाठीच घरे बांधण्यात येत आहेत. यातील अंदाजे ६ घरांची लाॅटरी या आधीच पार पडली आहे. जून २०१४ मध्ये १ हजार ७१६ घरांची, तर फेब्रुवारी २०१६ मध्ये ४ हजार २७५ घरांची लाॅटरी झाली असून या घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया कोकण मंडळाकडून सुरू आहे.


सर्व घरं अल्प गटातील

आता याच प्रकल्पातील आणखी ३३०० घरांचं काम पूर्ण झाल्यानं या घरांच्या लाॅटरीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळेच कोकण मंडळाने ३३०० घरांची लाॅटरी काढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती असून लवकरच ही लाॅटरी काढण्यात येणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. सर्वसामान्य मुंबईकर आणि इतर इच्छुकांसाठी आनंदाची बाब म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही सर्वच्या सर्व घरं अल्प गटातील आहेत.



किंमत केली कमी

विरार-बोळींजमधील अल्प गटातील घरांची विक्री २०१४ च्या लाॅटरीत २६ लाख १९ हजार ९०९ रुपयांमध्ये, तर मध्यम गटातील घराची विक्री ५० लाख २१ हजार ६१४ रुपयांमध्ये करण्यात आली होती. पण ही घरं खूपच महागडी असल्याचं म्हणत कोकण मंडळावर टीका झाल्यानंतर मंडळाने या किंमती कमी करत अल्प गटातील घराची किंमत २४ लाख ७१ हजार ५८५, तर मध्यम गटातील घराची किंमत ४७ लाख ४२ हजार ६८६ रुपये केली.


आता किंमत किती?

त्यानंतरच्या फेब्रुवारी २०१६ च्या लाॅटरीत याच घरांच्या किंमती आणखी कमी करण्यात आल्या. त्यानुसार अल्प गटातील घर २२ लाख ६४ हजार ६९५ रुपयांत, तर मध्यम गटातील घर ४० लाख ९३ हजार ५२१ रुपयांमध्ये विकण्यात आले. या किंमती लक्षात घेता ३३०० घरांच्या लाॅटरीतील किंमती किती असतील हेच महत्त्वाचं ठरणार आहे.


अन्य घरांचाही शोध

याविषयी कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी विजय लहाने यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी विरार-बोळींजमधील ३३०० घर ताब्यात आल्याची कबुली दिली. मंडळाचा लाॅटरी काढण्याचा विचार आहे, पण नेमकी कधी लाॅटरी निघेल हे आताच सांगता येणार नाही असंही त्यांनी सांगितलं. त्याचवेळी कोकण मंडळाच्या लाॅटरीचा आकडा ३३०० वरून ४००० करण्याचा विचार असल्यानं विरारबरोबरच अन्य ठिकाणच्या घरांचाही शोध सुरू असल्याच त्यांनी सांगितलं. त्यामुळे २०१८ मध्ये कोकण मंडळाकडून विरारसह अन्य ठिकाणच्या ४००० घरांसाठी लाॅटरी फुटण्याची शक्यता आहे.



हेही वाचा-

गोरेगावमधील ७००० घरांचा प्रकल्प रेंगाळणार, म्हाडाला कंत्राटदार मिळेना



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा