थंडीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. हिवाळ्यात वातावरणात गारवा असल्यानं आहाराची अधिक काळजी घ्यायला लागते. हिवाळ्यात विकरांना दूर ठेवणारे, नैसर्गिकरीत्या सहज मिळणारे आणि शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ जरूर खावेत. आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांची नावं सांगणार आहोत.
१) सकाळी सुंठ-गूळ-तुपाची गोळी खाणे, रोज डिंकाचा लाडू, मेथीचा लाडू वा अळिवाचा लाडू खाणे. जेवणानंतर ओवा-तीळ वगैरे द्रव्यांपासून बनवलेली सुपारी खाणे.
२) ज्वारी-बाजरीच्या भाकरीबरोबर गूळ-तूप खाणे, जेवणात तिळाची चटणी, लसणाची चटणी, ओली हळद-आंबेहळद यांच्यापासून बनविलेले लोणचे यांचा समावेश असावा. तिळाची चिक्कीदेखील हिवाळ्यात खाल्ली पाहिजे.
३)
हिवाळ्यात प्यायचे पाणी गरम वा कोमट असणे उत्तम होय. जेवताना गरम पाणी पिण्यानं अन्नपचन व्यवस्थित होण्यास मदत मिळते.
तसंच एरव्हीसुद्धा गरम पाणी पिण्याने ऊब मिळण्यास मदत मिळते.
४) दूध, लोणी, ताक, तूप हे रोजच्या खाण्यात असावेत. असे पदार्थ हिवाळ्यातही खाण्यास उत्तम असतात. हिवाळ्यात ऊब मिळावी म्हणून दुधात सुंठ, केशर वगैरे घालता येते. लोण्यामध्ये काळी मिरी, आले, थोडासा लसूण, कोथिंबीर घातली तर ते अतिशय रुचकर लागते आणि शरीराला स्निग्धता आणि ऊब दोन्ही देऊ शकते.
५) हिवाळ्यात डाळिंब खाणं कायम फायदेशीर ठरू शकतं. शरिरातील बॅड कॉलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्याकरता डाळिंबाची मदत होते. इतर फळांच्या तुलनेत भरपूर अँटीऑक्सीडंट्स असतात. त्यामुळे याचा ज्यूस देखील अतिशय फायदेशीर आहे.
६) बदाम आदल्या रात्री भिजवून ठेवल्यास सकाळी त्याच्या साली सहज निघू शकतात. त्या साली पचनास कठीण असल्याने सालीशिवाय खाणे योग्य. रक्ताल्पता, हृदयाच्या विविध व्याधी, काही प्रकारचे कर्करोग, केसांच्या आणि त्वचेच्या विविध तक्रारी, कृशता, मधुमेह, स्थौल्य इत्यादी अनेक व्याधींमध्ये बदामाचा खूप चांगला उपयोग होतो.
७) मनुकांमध्ये तंतुमय पदार्थ जास्त असतात. रक्ताल्पता, मलबद्धता, शरीरातील अतिरिक्त उष्णता, हाडांचे विकार, स्थौल्य, डोळ्यांचे आजार इत्यादी अनेक व्याधींमध्ये याचा उपयोग होतो.
८) खजूरात तंतुमय पदार्थ, भरपूर प्रथिनेही यात असतात. मलबद्धता, आतडय़ांचे विकार, कृशता, हृद्रोग, रक्ताल्पता इत्यादींमध्ये उपयोगी आहे. सर्व सुका मेवा चांगल्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात. म्हणजे ताणतणावामुळे शरीरात तयार होणाऱ्या विषारी द्रव्यांचा निचरा त्याच्यामुळे चांगला होतो.
९) गाजर हे चांगले पोषण करणारे, उष्ण आणि मधुर रसात्मक आहे. त्यात ‘अ’ जीवनसत्त्वही उत्तम प्रमाणात आहे. त्यामुळे हिवाळ्यात गाजर कोशिंबिरीच्या स्वरूपात किंवा तसंच कच्चे खाता येईल.
१०) हिवाळ्यात बोरे मुबलक मिळतात. बोरे गुणांनी स्निग्ध, बृहण करणारी, पचायला जड (गुरू) आणि मधुर आहेत. हिवाळ्यात अनेकांना आव पडण्याचा किंवा आमांशाचा त्रास होतो. तो टाळण्यासाठीही बोरे चांगली. बोरे अग्निदीपन करणारी असून ती पित्त आणि कफ कमी करतात.
हिवाळ्यात अशी घ्या त्वचा आणि केसांची काळजी