Advertisement

आश्रमातील मुलांना मिळाली मायेची उब


आश्रमातील मुलांना मिळाली मायेची उब
SHARES

मातेचे छत्र डोक्यावरून हरपलेल्या आश्रमातील मुलांना मायेची उब अनुभवता यावी, या उद्देशाने मागील तीन वर्षांपासून 'मदर्स रेसिपी' या संस्थेच्या वतीने मातृदिनानिमित्त ठिकठिकाणच्या अनाथाश्रमात विविध मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही रविवारी वरळी येथील डॉ. मोझेस रोडवरील 'आनंद निकेतन' या आश्रमातील आवारात 'टेस्ट ऑफ मदर्स लव्ह' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाद्वारे शंभर मातांनी आश्रमातील मुलांसोबत बहुमूल्य वेळ व्यतीत केला.

देशभरात सर्वत्र मातृदिन साजरा होत असताना आईच्या प्रेमापासून वंचित अनाथ आश्रमातील मुले हा दिवस एकाकीपणे घालवतात. जन्मापासून अनाथालयात वाढलेल्या या मुलांना आईच्या मातृत्वाची माहिती केवळ ऐकून, पुस्तके वाचून आणि चित्रपटांच्या माध्यमातूनच मिळते. त्यामुळे अशा मुलांनाही आईच्या प्रेमाची अनुभूती करून देण्यासाठी 'मदर्स रेसिपी' या संस्थेने अनाथालयात वाढलेल्या मुलांसाठी मातृ दिनाच्या दिवशी 'टेस्ट ऑफ मदर्स लव्ह' हा उपक्रम आयोजित करण्यास सुरूवात केली.

यंदाच्या कार्यक्रमात 300 अनाथ मुलांना मायेची उब देण्यासाठी विविध ठिकाणच्या 100 माता सहभागी झाल्या होत्या. त्यांनी मुलांसोबत विविध खेळ तर खेळलेच, पण त्याचबरोबर मुलांना आवडतील अशा रेसिपीही तयार केल्या. मुलांचा रविवार गमतीशीर जावा यासाठी कार्ड बनविणारी कार्यशाळा, छायाचित्रांचे प्रदर्शन, केक कापणे, संगीत, आणि नृत्य स्पर्धा अशा मनोरंजनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा मनमोकळा आनंद या मुलांनी मातांबरोबर लुटला.

मागील तीन वर्षांपासून 'मदर्स रेसिपी'च्या वतीने मातृदिनी कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येते. ज्या मातांना या कार्यक्रम सहभागी व्हायचे असते, त्या स्वतःहून या कार्यक्रमास हजेरी लावतात. मुलांबरोबर खेळतात यातून मुलांना एक वेगळा आंनद मिळतो. त्यामुळे मुलेही आनंदाने सहभागी होतात, अशा भावना 'मदर्स रेसिपी' देसाई ब्रदर्सच्या व्यवसाय प्रमुख संजना देसाई यांनी व्यक्त केल्या.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा