Advertisement

अबब... मुंबईहून लंडन गाठायला ७२ दिवस


SHARES

मुंबई ते लंडन बाय रोड... काय? बाय रोड म्हणताय. ते कसे शक्य आहे? मुंबईहून विमानात बसले की १० तासांत लंडन. मग बाय रोड कशाला? आणि मुंबईहून थेट लंडनला जायला रस्ता पण आहे का? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. पण आम्ही तुम्हाला आज अशाच एक अवलियाची ओळख करून देणार आहोत ज्याने मुंबई ते लंडन बाय रोड प्रवास केला आहे. मुंबईत राहणारे बद्री बलदावा यांनी पत्नी पुष्पा आणि ९ वर्षांच्या नातीसोबत ७२ दिवसांमध्ये, १९ देशांमधून जात लंडनचा प्रवास पूर्ण केला आहे. त्यांच्या या विक्रमाची नोंद 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये झाली आहे


२३ मार्चला मुंबईतून सुरू झालेला त्यांचा प्रवास २ जूनला संपला. काही दिवसांपूर्वीच ते मुंबईत परतले. ७३ वर्षांचे बद्री बलदावा आणि ६४ वर्षांच्या पुष्पा हे मुंबई-लंडन रस्त्यामार्गे प्रवास करणारे पहिले दांम्पत्य ठरले आहेत.



कशी सुचली ही कल्पना?

२०११ साली लंडनहून मुंबईला परतत असताना बलदावा यांना या प्रवासाची कल्पना सुचली. विमानातून त्यांना दिसणारे देखणे पर्वत खुणावत होते. आतापर्यंत अनेक आव्हाने झेलली आहेत. मग अजून एक आव्हान स्वीकारूया, असा निश्चयच त्यांनी केला होता. त्यानुसार त्यांनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली

त्यांच्या या प्रवासात पत्नी आणि नाथ यांची साथ तर होतीच. पण त्यांचा आणखी एक साथीदार होता तो म्हणजे बीएमडब्ल्यू एक्स-. बद्री आणि त्यांच्या पत्नीने २२ हजार किलोमीटर गाडी चालवली. ७२ दिवसांच्या प्रवासात १२ दिवस त्यांनी विश्रांती पर्यटन यासाठी राखून ठेवले होते. या प्रवासात त्यांनी भारत आणि इतर देशांमधील संस्कृती आणि निसर्गाचा अनुभव घेतला.

  

मुंबई-लंडन प्रवास सोपा नव्हता. प्रवासाला जाण्यापूर्वी माझे आंतरराष्ट्रीय ड्राइव्हिंग लायसन्स हरवले होते. ट्रिपला जाण्याच्या काही तास आधी माझे ड्रायव्हिंग लायसन्स आले. विसा, रजिस्टर पेपर याची तयारी करावी लागते. ही ट्रिप पुढे ढकलावी की काय असा विचार माझ्या मनात आला. पण मी तसे केले नाही आणि प्रवासाला सुरुवात केली. या ट्रिपमध्ये आमच्यासोबत एक घटना घडली. मी गाडी चालवत होतो. अचानक समोरून येणारा एक पक्षी कारच्या पुढच्या काचेवर आपटला.त्यामुळे काचेला तडा गेला. हळूहळू तडा वाढत गेला. काचेचे तुकडे गाडीत पसरले. मी गॉगल घातले होते त्यामुळे मला काही झाले नाही. रस्त्यात एक बीएमडब्ल्यू सेंटर होते. त्या सेंटरला जाऊन मी गाडीची काच बदलून घेतली.  

- बद्री बलदावा


भारताची सीमा ओलांडल्यानंतर त्यांनी म्यानमार, थायलंड, लाओस, चीन, किरगिस्तान, उजबेकिस्तान, कझाकस्तान, रशिया, लातिव्हिया, पोलंड, झेकोस्लोव्हाकिया, जर्मनी, नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स आणि यूके असा प्रवास केला. बदलावा हे शाकाहारी आहेत. त्यामुळे खाण्या-पिण्याचा त्यांना थोडा त्रास सहन करावा लागला. पण ७२ दिवसांचा त्यांचा अनुभव अस्मरणीय होता.

बदलावा यांनी यापूर्वी माऊंट एव्हरेस्ट सर केला आहे. तसेच पत्नीसोबत उत्तर ध्रुव, नॉर्वे, हिमालयातील विविध शिखर गाठली आहेत. बद्रीनाथपर्यंतचा सहा हजार किलोमीटर प्रवास त्यांनी गाडी चालवून केला आहे. आजपर्यंत केलेल्या इतर ट्रिपपेक्षा ही ट्रिप खास ठरली. त्यामुळे ही ट्रिप कधीही विसरू शकत नाही, असा आनंद त्यांनी व्यक्त केला.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा