Advertisement

मातृदिन...आईचा फक्त एकच दिवस!


मातृदिन...आईचा फक्त एकच दिवस!
SHARES

अगं मी काय म्हणते, उद्या तुला आणि बंटी दोघांना सुट्टी आहे. मग आपण उद्या एखादा मूव्ही पाहुया आणि बाहेरच काही तरी खाऊया. कसा आहे प्लॅन?

अगं आई, प्लॅन चांगला आहे. पण माझा प्लॅन आधीच झाला आहे गं. तू बंटीसोबत जा ना.

अगं पण मागच्या सुट्टीला पण तुझा प्लॅन होताच. या सुट्टीला पण प्लॅन आहेच का? तरी मी बोलले होते की, पुढच्या सुट्टीला काही प्लॅन करू नका.

अगं हो ना...पण सुट्टी असली, तरी माझी काही कामं आहेत गं. तू बंटीसोबत जा ना...

बरं ठीक आहे. बंटी आला की त्याला विचारते.

अरे हा बघ आला बंटी. अरे बंटी उद्या आपण दोघे मूव्हीला जाऊया. बाहेरच जेवू. चिंगीला मी तोच प्लॅन सांगत होते. पण ती नाही म्हणते. चल रे, खूप दिवस मूव्ही नाही पाहिला मी.

अगं आई. जाऊ ना आपण, पण पुढच्या आठवड्यात जाऊ की. अगं उद्या माझा मित्रांसोबत प्लॅन ठरला आहे. तो कसा कॅन्सल करू? नेक्स्ट वीक पक्का...

ठीक आहे...

सौजन्य

आता बंटीनं देखील नकार दिल्यानंतर थोडसं वाईट वाटलं. पण नेहमीप्रमाणे मी माझ्या मनाला तयार केलं. आणि तसंही या गोष्टींची आता सवय झाली आहे. मुलांचं आपलं आज-उद्या, आज-उद्या करत वर्ष गेली. पण दोघांनी माझ्यासोबत काही वेळ घालवला असेल, असा एक दिवसही आठवत नाही. अर्थात लहानपण सोडलं तर. हेच विचार डोक्यात फिरत होते. विचारापायी काही झोपच येत नव्हती. बछड्यांचं लहानपण डोळ्यासमोर उभं रहात होतं. लहान असताना त्यांना सगळीकडे मीच लागायचे. बंटीला तर आठवीत असेपर्यंत मी हवी असायचे. चिंगीची मीच सर्वात चांगली मैत्रिण होते. शाळेतून आली की दिवसभराचं पुराण सांगायची. 'आज असं झालं, त्या काकू मला ओरडल्या', असं काही ना काही सांगायची. पण आता ती एवढी बिझी असते की विचारू नका. आज मी 'कुठेतरी फिरायला जाऊ' असं बोलतेय. पण एकवेळ अशी होती की तीच म्हणायची, 'उद्या रविवार, फिरायला जाऊया ना आई' आणि मी सुद्धा या पोरांच्या डिमांड पूर्ण करायचे. माझ्या लेकरांचं मन कसं दुखवेन? दोघं लहान असताना कुठेही गेली, तरी माझा हात कधी सोडायची नाहीत. आता नकळत त्यांनी तो हात सोडला आणि माझ्या आणि यांच्यापासून दुरावत गेली. चिंगी लहान असताना मला बोलायची, 'आई मी मोठी झाले ना की तुला लांब कुठे तरी फिरायला नेईन'. कुठे विचारलं म्हटलं तर म्हणायची 'अगं ती थंड थंड जागा, जिकडे बर्फ पडतो ना'. आणि मी हसत म्हणायचे, 'हो गं माझ्या बछड्या जाऊ आपण'. ती लहानाची मोठी झाली. कमवायलाही लागली. पण लहानपणीचं प्रॉमिस मात्र विसरली.

आज त्यांचं स्वत:चं एक विश्व आहे. त्या विश्वात ते रमले आहेत. त्या विश्वात आम्हा दोघा म्हाताऱ्यांसाठी जागा नाही का? कधी तरी एकत्र जेवायचं म्हटलं, तरी ते शक्य होत नाही. कारण दोघं आपापल्या फ्रेंड सर्कलसोबत बाहेरूनच खाऊन येतात. मग मी आणि हे असे दोघेच जेवतो आणि झोपून जातो. मला आजही आठवतं गेल्या वर्षी 'मदर्स डे'ला काय तो आम्ही एकत्र वेळ घालवला होता. त्याच दिवशी आम्ही मूव्ही पाहिला आणि बाहेरही जेवलो होतो. ते काय ते शेवटचं आम्ही एकत्र बाहेर गेलो असू. पण दोघं विसरले वाटतं उद्या मदर्स डे आहे. म्हटलं एक दिवस काय तो आपला येतो. तेवढंच मुलांसोबत एकत्र राहता येतं. पण मुलं त्यांच्या विश्वात एवढी रमली आहेत, की मदर्स डे देखील विसरली. तसं मला हे मदर्स डे वैगरे फार आवडत नाही. आईवर आपलं किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी काय तो एक दिवस आणि बाकीच्या दिवशी ठणठण गोपाळ. पण माझ्यासाठी तो एक दिवस देखील खूप आहे. आता हा माझा स्वार्थीपणा म्हणालात तरी चालेल. हेच बघा ना, हे डे वैगरे काही आवडत नाहीत, पण एक दिवस मुलांसोबत घालवायला मिळतो हेच माझ्यासाठी खूप आहे.





आजचा माझा दिवस..म्हणे 'मदर्स डे'...कुणास ठाऊक मला असं वाटतंय की, मुलं सकाळी काही तरी सरप्राईज देतील. विचारांची जागा पुन्हा एकदा नव्या उमेदीनं घेतली. सरप्राईज वगैरे असेल काही तरी? उशीर नको असं म्हणत मी उठले. सगळं आवरून बसले होते. सरप्राईज मिळणार या आशेने मी पुन्हा उत्साहीत झाले. नाष्टा देखील करून झाला. आता तरी सरप्राईज कळेल. दोघा पोरांनी आवाज दिला. मात्र, जवळ जाताच त्यांच्या तोंडून बाहेर पडलं, 'आई आम्ही जातोय. रात्री जेवायला येऊ घरी.’ सगळा उत्साह नाहीसा झाला. एक दिवस माझी मुलं मला थोड्या वेळासाठी का होईना, पण मिळणार होती. पण ती आशाही आता फोल ठरली. दिवसभर काही मूड चांगला नव्हता. तरी पण म्हटलं पोरांच्या आवडीचं जेवण करूया. एका मागोमाग एक करून रात्री दोघंही आले. म्हटलं घरात का होईना, पण एकत्र जेऊ.

जेवण वाढायला घेणार तेवढ्यात चिंगू आली आणि म्हणाली की, आई तुझ्यासोबत एक फोटो काढायचाय. बंटीसुद्धा तेच म्हणत आला.

अरे हो, पण झालं काय एवढं फोटो काढायला?

आगं काही नाही, आज मदर्स डे आहे ना. सर्व मित्र-मैत्रिणी आपल्या आईसोबतचे फोटो टाकत आहेत सोशल मीडियावरमग आम्ही पण टाकणार तुझ्यासोबतचा फोटो. सर्वांना कळायला नको का आमचं किती प्रेम आहे आमच्या आईवर ते?

आता काय म्हणायचं? मी फक्त हसले आणि दोघांसोबत फोटो काय ते काढून घेतले आणि सगळे जेवायला बसलो. नाही बोलून शेवटी माझ्या छकुल्यांचं मन कसं दुखावेन. फक्त एक फोटोच मागितला आहे ना? तेवढीच काय ती माझी आठवण त्यांच्या मोबाईलमध्ये जिवंत राहील.    

कव्हर फोटो सौजन्य



हेही वाचा

हो...मी लग्नाआधीच आई झाले!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा