Advertisement

रविवारच्या सुट्टीमागचं 'हे' गुपीत माहितेय का?

रविवारच्या सुट्टीसाठीच्या लढ्याला सुरुवात झाली ती मुंबईतूनच. रविवारच्या सुट्टीसाठी मुंबईत मोर्चा काढण्यात आला. भारतीयांना ही हक्काची सुट्टी मिळावी यासाठी हा लढा होता. कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी यासाठी तब्बल ६ वर्षे लढा दिला. त्यामुळेच आज आपल्याला रविवारची सुट्टी अनुभवता येतेय.

रविवारच्या सुट्टीमागचं 'हे' गुपीत माहितेय का?
SHARES

शाळेतले विद्यार्थी असोत किंवा आॅफिसगोअर्स सगळ्यांच्याच आवडीचा दिवस म्हणजे रविवार... शाळा, कॉलेज आणि जॉबच्या ठिकाणी रविवारची सुट्टी ठरलेली. ठरलेली म्हणजे अगदी हक्काची सुट्टी. आठवड्याचे ६ दिवस धावपळ केल्यानंतर मिळणारा निवांत दिवस म्हणजे रविवार.


ही संकल्पना कुणाची?

रविवार म्हणजे सुट्टीचा, कुटुंबासोबत वेळ घालवायचा आणि खास करून आरामाचा दिवस. पण ही रविवारची सुट्टी कधी आणि कुणामुळे सुरू झाली याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? रविवारची सुट्टी कुणामुळे मिळाली? ही कुणाची संकल्पना आहे? यामागे कुणाची मेहनत आहे? यापैकी एकही साधा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला नसेल. त्यामुळे ही माहिती वाचून तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल.


कुणी दिला लढा?

रविवारच्या सुट्टीसाठीच्या लढ्याला सुरुवात झाली ती मुंबईतूनच. रविवारच्या सुट्टीसाठी मुंबईत मोर्चा काढण्यात आला. भारतीयांना ही हक्काची सुट्टी मिळावी यासाठी हा लढा होता. कामगार नेते  नारायण मेघाजी लोखंडे यांनी यासाठी तब्बल ६ वर्षे लढा दिला. त्यामुळेच आज आपल्याला रविवारची सुट्टी अनुभवता येतेय.


रविवारच्या सुट्टीचे जनक

भारतीयांसाठी सुट्टीचे शिल्पकार ठरले ते नारायण मेघाजी लोखंडे. भारतीय कामगार चळवळीचे अग्रणी नेते अशी त्यांची ओळख. १८५४ साली मुंबईत पहिली गिरणी सुरू झाली. १८७० पर्यंत अनेक ठिकाणी गिरण्या सुरू झाला. पण अपुरे वेतन, कामाचे अनियमीत तास, सुट्टी नाही अशी त्यावेळची परिस्थिती होती.


फॅक्टरी अॅक्टने प्रेरणा

१८८१ मध्ये भारतात फॅक्टरी अॅक्ट लागू झाला. या कायद्या अंतर्गत बालकामगारांचं किमान वय ७ आणि कामाचे किमान तास ९ ठरवण्यात आले. आठवड्याच्या सुट्टीचीही तरतूद करण्यात आली. मात्र त्यात महिला आणि प्रौढ कामागारांसाठी स्वतंत्र तरतूद नव्हती. याविरोधात नारायण मेघाजी लोखंडे यांनी आवाज उठवला. १८८४ साली मुंबईत त्यांनी 'बॉम्बे मिल हॅण्ड्स असोसिएशन'ची स्थापना केली. ती भारतातील पहिली कामगार संघटना मानली जाते. याच वर्षी लोखंडे यांनी ५ प्रमुख मागण्या सरकार पुढे ठेवल्या. फॅक्टीरी कमिशनला लोखंडे यांनी ५३०० कामगारांच्या सह्यांचं निवेदन दिलं. 


कुठल्या होत्या ५ मागण्या?

  1. कामगारांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी मिळावी 
  2. कामाचे तास कमी करावेत 
  3. जेवणासाठी किमान अर्ध्या तासाची सुट्टी मिळावी 
  4. कामगारांचा पगार वेळेत व्हावा. गेल्या महिन्याचा पगार या महिन्याच्या १५ तारखेपर्यंत व्हावा 
  5. अपघातात सापडलेल्या कामगाराला नुकसान भरपाई देण्यात यावी. तर त्याच्या कुटुंबाला पेंशन सुरू व्हावं


ब्रिटीशांनी नमतं घेतलं

२४ एप्रिल १८९० साली मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सवर लोखंडे यांची मोठी सभा झाली. लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली मिल कामगारांनी मोठा मोर्चा काढला. या मोर्च्याची दखल अखेर मिल मालकांना आणि ब्रिटिशांना घ्यावीच लागली. त्यानंतर रविवारी सार्वजनिक सुट्टीची मागणी मान्य झाली. तेव्हापासून आजतागायत आपण सर्व रविवारच्या सुट्टीचा मनमुराद आनंद लुटतो. हे केवळ शक्य झालं नारायण लोखंडे यांच्यामुळेच.


ब्रिटीशांचा 'होली डे'

बायबलमध्ये असं म्हटलं आहे की, ६ दिवसांत सृष्टी निर्माण केल्यावर देवानं सातव्या दिवशी विश्रांती घेतली. त्यामुळे पाश्चिमात्य देशांतील संस्कृतीनुसार सोमवार ते शनिवार ६ दिवस काम केल्यानंतर सातव्या दिवशी सुट्टी घेतली जाते. त्यानुसार ब्रिटीश राजवटीतल्या भारतातही रविवारी सुट्टी देण्याचा निर्णय ब्रिटीश अधिकाऱ्यांनी घेतला.

त्यानुसार १८४४ साली भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांनी भारतातील सरकारी कार्यालयांमध्ये रविवारी हा सुट्टीचा दिवस घोषित केला. त्याचा फायदा ब्रिटिशांनाच झाला. कारण सरकारमध्ये बहुतांश ब्रिटिश अधिकारीच कार्यरत होते. प्रश्न होता तो भारतीयांचा.


सुरुवातीला शुक्रवारी सुट्टी

मोगल काळात भारतात शुक्रवारी सुट्टी असायची. सत्तेत ज्या धर्माचे प्राबल्य त्या धर्माच्या पवित्र दिवशी सुट्टी असायची. या पवित्र दिवसाला होली डे असे संबोधले जायचं. पुढे जाऊन होली डेचं हॉलिडे असं झालं. पाकिस्तानातही शुक्रवारी सुट्टीचा दिवस मानला जातो.



हेही वाचा-

लग्नाच्या हुंड्यात मिळाली होती मुंबई!

'क्वीन्स नेकलेस'चा 'हा' इतिहास तुम्हाला माहित आहे का?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा