• व्यायामाला वय नसतं !
  • व्यायामाला वय नसतं !
  • व्यायामाला वय नसतं !
  • व्यायामाला वय नसतं !
  • व्यायामाला वय नसतं !
SHARE

व्यायाम आणि या वयात? नाही जमणार बाबा. या वयात चालणं जमत नाही मग कुठे व्यायामाचं घेऊन बसली आहेस?  या बहुतांश ज्येष्ठ नागरिकांच्या ठरलेल्या ओळी असतात. वयाचं कारण म्हणा किंवा आळस, पण अनेक वयोवृद्ध आहेत जे व्यायाम करणं टाळतात. पण मुंबईत राहणाऱ्या एका आजींनी मात्र या विचाराला फाटा दिला आहे. उषा सोमण... वय वर्ष ७८... पण उत्साह ऐवढा की तरूणांनाही लाजवेल. बायोकेमिस्ट आणि माजी शिक्षीका उषा सोमण या मॅरेथॉन रनर आणि मॉडेल मिलिंद सोमण यांच्या आई आहेत. या वयातही फिटनेससाठी त्यांची क्रेझ खरच कौतुकास्पद आहे. मिलिंद सोमणनं उषा सोमण यांचा एक व्हीडिओ नुकताच इनस्टाग्रामवर शेअर केला आहे.

उषा सोमण यांनी जे केलं त्यावर विश्वासच बसत नव्हता. चक्क 'अॅब्डोमिनल प्लँक पोझिशन'मध्ये त्या १ मिनिट २० सेकंद राहिल्या. अॅब्डोमिनल प्लँक पोझिशन १ मिनिट केला तरी खूप आहे. १ मिनिट २० सेकंद हा वेळ उषा सोमण यांच्या वयोमानानुसार खूपच चांगला आहे. उतरत्या वयात व्यायामाची आवश्यक्ता नसल्याचा समज असणाऱ्यांसाठी हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. यापूर्वी उषा यांनी ग्रेट इंडिया रनच्या शेवटच्या टप्प्यात भाग घेतला होता. ५७० किलोमीटर एवढा टप्पा उषा यांनी पार केला. त्यावेळी त्यांच्यासोबत मिलिंद सोमणही होते.

फक्त त्याच नाही तर यावर्षी जानेवारीमध्ये मुंबईत झालेल्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या आजोबांचा उत्साह कमालीचा होता.

या आजोबांचं वय ऐकून तर तुम्ही थक्कच व्हाल. चक्क १०३ वर्षांचे आजोबा मॅरेथॉनमध्ये धावत होते. वय ऐकून बसल ना धक्का. पण त्यांच्या वयावर जाऊ नका. दगडू भांबरे असं आजोबांचं नाव. थोडंथोडकं नव्हं तर ते तब्बल ४ किलोमीटर धावले. या वयातही हा उत्साह वाखाणण्याजोगा आहे.

वृद्धापकाळ म्हणजे दुसरं बालपणच. वयोमानानुसार शरीर साथ देत नाही. त्यात अनेक व्याधींनाही सामोरे जावं लागतं. ब्लडप्रेशर, मधुमेह तसंच गुडघेदुखी, कमी ऐकू येणं अशा अनेक समस्यांचा सामना वृद्धांना करावा लागतो. वय वाढते तसतशी शारिरीक शक्तीही कमी होणे स्वाभाविक असते. पण याचा अर्थ असा नाही की आरोग्यासाठी आवश्यक असणारे व्यायाम देखील करायचे नाहीत. उतारवयात शारीरिक पातळीवर कार्यक्षम राहणं गरजेचं आहे. त्यासाठी स्वत: पुढाकारा घेणंही तितकच आवश्यक आहे.

"रोजच्या दैंनंदिन जीवनात तुम्ही सक्रिय असणे गरजेचे आहे. नियमितपणे चालायला जाणे किंवा घरातल्या घरात योग करणे हे उत्तम उपाय आहेत. योगासनं करायची असतील तर तुम्ही त्यासाठी एक प्रशिक्षक नेमू शकता. प्रशिक्षक तुम्हाला कशी आणि कोणती योगासनं करावीत हे योग्यारित्या सांगू शकेल. शिवाय रोज अर्धा तास चाल्लात तरी खूप आहे. वेट लिफ्टिंग किंवा शरिरासाठी जास्त त्रासदायक असे व्यायाम वयोवृद्धांनी टाळावेत. जर तुम्ही शरिरानं धडधाकट असाल तर स्विमिंगही करू शकता. सायकलिंग करणं धोकादायक असू शकतं. जर सायकलवरूंन पडलात तर दुखापत होण्याची शक्यता असते आणि दुखापत झालेली या वयात घातकच. तुमच्या शरीराला जे व्यायाम पेलवू शकतात असेच व्यायाम करावेत. जर तुम्हाला बाहेर जायला जमत नसेल तर घरातल्या घरात तुम्ही व्यायाम करू शकता. उदाहरणार्थ घरातल्या घरात चालणं किंवा सुर्यनमस्कार घालणं, घरातील अगदी छोठी-मोठी कामं करणं. घरातील कामं जरी तुम्ही केलीत तरी त्यातून तुमचा चांगला व्यायाम होईल. शरीराची कोणत्याही प्रकारे झालेली हालचाल हा एक प्रकारचा व्यायामच असतो.” 

डॉ. अरुण नार्वेकर, चिकित्सक ( फिजीशियन )

उतरत्या वयात व्यायामासोबतच योग्य आहार घेणंही तितकच गरजेचं आहे. म्हातारपणात कमी खायचं असा एक समज असतो. पण हा समज चुकिचा आहे. तुम्ही सर्व खाणं आवश्यक आहे. शरीराला स्निग्धता मिळणंही आवश्यक आहे. सकाळी ८ वाजता नाष्टा किंवा एक फळ, दुपारी १ वाजता जेवण, संध्याकाळी ५ वाजता कुरमुरे किंवा हलका नाष्टा आणि रात्री ८ वाजता हलकं आणि कमी जेवण, असा दिवसभरातील तुमचा आहार पाहिजे. भाज्या, कडधान्य, फळं, दुध, नाचणीचे सूप, सत्व, आठवड्यातून चिकन आणि फिश या संर्वांचा समावेश आहारात असला पाहिजे. जसजसे वय वाढते तसतशी शरीराची हालचाल कमी होते. त्यामुळे या वयात पचनशक्ती मंदावते. त्यामुळे पचायला हलकं आणि शरीरासाठी पोषक अन्नाचे सेवन करावे.


"शरीरासोबतच मनाचे योग्य संतूलन राखणे आवश्यक आहे. त्यासाठी या वयात सामाजिक सुसंवाद साधणं गरजेचं आहे. अनेकवेळा असं होतं की वृद्ध ऐकटे पडतात. त्यामुळे त्यांच्यात नैराश्याची भावना निर्माण होते. घरात एकल कोंड्यासारखं बसून राहण्यापेक्षा घराच्या बाहेर पडावं. घराजवळ म्हणा किंवा सोसायटी जवळील कट्ट्यावर किंवा गार्डनमध्ये एक फेरफटका मारून यावं. तुमच्या वयाच्या मंडळींसोबत गप्पा माराव्यात. यामुळे तुम्हाला एकटेपणाची जाणीव होणार नाही. विविध सामाजिक संस्थांच्या कार्यात सहभागी झाल्यास तुमचा विरंगुळा होईल.” 

- अरुण नार्वेकर, चिकित्सक ( फिजीशियन )

योग्य आहार, शरीर सुदृढ करणाऱ्या अन्नाचं सेवन, व्यायाम आणि सामाजिक सुसंवाद अशा गोष्टी आचरणात ठेवणे ही वृद्धावस्थेत आरोग्य चांगले ठेवण्यासाठीची गुंतवणूक आहे. त्यामुळे सकस आहार आणि योग्य व्यायाम याचे तुमच्या आयुष्यात फार महत्त्व आहे. या सर्व गोष्टी जर आचरणात आणल्या तर मग काय मज्जानू लाईफ.

संबंधित विषय
ताज्या बातम्या