Advertisement

बाळासाहेबांचा ५ वा स्मृतीदिन, शिवाजीपार्क सज्ज


बाळासाहेबांचा ५ वा स्मृतीदिन, शिवाजीपार्क सज्ज
SHARES

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ५वा स्मृतीदिन शुक्रवारी पार पडत असून यानिमित्ताने शिवाजीपार्क येथील स्मृतीस्थळाच्या ठिकाणी येणाऱ्या शिवसैनिकांसाठी महापालिकेकडून सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यावेळी हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. यंदा शिवसेनेसोबतच महापालिकेकडूनही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.


महापालिकेकडून 50 लाखांची तरतूद

दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक या संकेत स्थळाचे लोकार्पण होणार आहे. महापौर निवासात स्मारक समितीच्या वतीने हा लोकार्पण सोहळा होणार आहे.
यंदा स्मृतीस्थळावर सेवा सुविधांसाठी महापालिकेच्या वतीने ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये स्मृतीस्थळाच्या ठिकाणी शोभिवंत व हंगामी फुलांची रोपे लावण्यात आली आहेत. तसेच मंडप उभारण्यात आला आहे. दर्शनाकरता रेलिंगची दुरुस्ती करून संरक्षक जाळी बसवण्यात आली आहे. याशिवाय, लोखंडी रेलिंगची रंगरंगोटी करण्यात आली आहे.


सीसीटीव्ही आणि एलईडी लाईट्स

या स्मृतिस्थळाच्या ठिकाणी तात्पुरते मोजो बॅरिकेडिंग उभारण्यात आले असून लोखंडी रेलिंगला पांढऱ्या कपड्यांचे पार्टिशन करण्यात आले. याठिकाणी ८ जागांवर सी.सी.टी.व्ही बसवण्यात आले असून ६० एलईडी लाईट्स व १० फ्लड लाईट्स लावण्यात आले आहेत. तसेच, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या तसेच पाण्याचे टँकर आणि मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आल्याचे जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादर यांनी सांगितले.


शिवसेनेच्या वतीने चहा-नाश्ता

येणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये, याकरता शिवसेनेच्या वतीने चहा-नाश्ता आणि जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत २ लाख लोकांच्या चहा नाश्ता आणि जेवणाची सोय शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. शिवाजी पार्क परिसरात १० ते १२ ठिकाणी चहा नाश्ता जेवणाचे स्टॉल्स शुक्रवारी लावण्यात येणार आहेत.

दरम्यान, शिवाजीपार्कला जाण्यासाठी बेस्टच्या वतीने दादर रेल्वे स्थानक (पश्चिम) आणि दादर हिंदू स्मशानभूमी दरम्यान अतिरिक्त बसगाड्या सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सोयीकरता दादर स्थानक (पश्चिम), शिवाजी पार्क स्मृतिस्थळ येथे बस निरीक्षक, वाहतूक अधिकारी यांची नेमणूक करण्यात असल्याचेही बेस्ट जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे.



हेही वाचा

खरं कोण खोटं कोण? 'त्या' नगरसेवकांवर मनसे, शिवसेना दोघांचाही दावा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा