Advertisement

कांदिवलीसह अंधेरीच्या प्रभाग ६२मध्येही होणार पोटनिवडणूक


कांदिवलीसह अंधेरीच्या प्रभाग ६२मध्येही होणार पोटनिवडणूक
SHARES

भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे कांदिवलीची प्रभाग क्रमांक 21ची जागा रिक्त झाली आहे. याचसोबत जातपडताळणीमुळे सदस्यत्व रद्द झालेल्या चंगेझ मुलतानी यांचा प्रभाग क्रमांक 62 रिक्त झाला आहे. त्यामुळे या दोन्ही जागांवर येत्या डिसेंबरपर्यंत पोटनिवडणुका होण्याची शक्यता आहे.

मुलतानी यांचे महापालिका सदस्यत्व रद्द झाल्यानंतर या जागी दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेचे राजू पेडणेकर यांची नगरसेवक म्हणून घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु या पोटनिवडणुकीमुळे राजू पेडणेकर यांचे नगरसेवक बनण्याचे मनसुबे उधळले आहेत.


सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक

कांदिवलीतील प्रभाग क्रमांक २१च्या भाजपा नगरसेविका शैलजा गिरकर यांचे महिन्याभरापूर्वी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यामुळे या रिक्त जागी पुढील सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घडवून आणणे अपेक्षित असून त्याप्रमाणे या ठिकाणच्या निवडणुकीसाठी मतदार यादी बनवण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे गिरकर यांच्या जागी त्यांच्या कन्येला उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

अंधेरीतील प्रभाग क्रमांक ६२मधील अपक्ष नगरसेवक चंगेझ मुलतानी यांचे महापालिका सदस्यत्व जातप्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे रद्द करण्यात आले. याठिकाणी पोटनिवडणूक न घेता दुसऱ्या क्रमांकावर असलेले राजू पेडणेकर यांची निवड करण्यात यावी, यासाठी शिवसेनेचा आटापिटा सुरू आहे. यासाठी मागील अनेक दिवसांपासून महापौरांच्या दालनात महापालिकेचे प्रमुख कायदा अधिकारी झेवियर्स यांच्यासमवेत बैठका झाल्या. त्यामुळे या जागी राजू पेडणेकर यांची निवड केली जाणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मनसे नगरसेवकांच्या पक्षप्रवेशादरम्यान राजू पेडणेकर यांच्या बाजूने लवकरच निकाल लागून एक जागा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.


जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पोटनिवडणूक

मुलतानी यांच्या जागेवर दुसऱ्या क्रमांकावरील राजू पेडणेकर यांची निवड न करता याठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. याबाबतचे पत्रच निवडणूक आयोगाने महापालिकेला पाठवले आहे. त्यामुळे मुलतानींच्या जागेवर पेडणेकर यांना नगरसेवक म्हणून निवडून देण्याऐवजी त्याठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाल्यामुळे शिवसेनेसमोरील आव्हान वाढले आहे. या दोन्ही प्रभागांमध्ये नोव्हेंबरपर्यंत मतदार याद्या सुधारीत करून डिसेंबर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या पोटनिवडणुका घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.



हेही वाचा - 

भांडुप पोटनिवडणूक, सासूच्या जागी सून आली निवडून

अपक्ष नगरसेवक चंगेझ मुलतानी यांचे महापालिका सदस्यत्व रद्द


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा