Advertisement

कामगारांना नोकरीतून काढू नका, मुख्यमंत्र्यांचं उद्योजकांना आवाहन

कठीण प्रसंगात उद्योग व्यवसाय उभारणीत मोठा वाटा असलेल्या कामगरांना उद्योगांनी वाऱ्यावर सोडू नये. भलेही काही काळासाठी वेतन कपात केली तरी चालेल; पण कामगारांना नोकरीतून काढू नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

कामगारांना नोकरीतून काढू नका, मुख्यमंत्र्यांचं उद्योजकांना आवाहन
SHARES

जगभरातच कोरोनाची विचित्र परिस्थिती आहे. आपण सर्वतोपरी प्रयत्न करून कोरोनाच्या साथीला रोखत असलो तरी जीवन पूर्वपदावर कधी येणार हे सांगता येत नाही. या कठीण प्रसंगात उद्योग व्यवसाय उभारणीत मोठा वाटा असलेल्या कामगरांना उद्योगांनी (do not remove workers from any industry during lockdown says maharashtra cm uddhav thackeray) वाऱ्यावर सोडू नये. भलेही काही काळासाठी वेतन कपात केली तरी चालेल; पण कामगारांना नोकरीतून काढू नका. आपण स्वत: यासंदर्भात काही व्यवस्थापनांशी बोलणार आहोत, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योजनकांना केलं. 

भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई आदी सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, मुंबई आणि पुण्यासारख्या भागात कोरोनाच्या केसेस वाढत आहेत. मात्र, एप्रिल शेवटापासून आपण ग्रीन आणि ऑरेंज क्षेत्रातील उद्योग व्यवसायांना अटी आणि शर्तींच्या अधीन राहून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. पुरेशा क्रयशक्तीच्या अभावी अद्याप बाजारपेठांत ग्राहक नसल्याने काहीशी अडचण आहे. परंतु परिस्थिती सुधारत जाईल. आपण कुठेही मालवाहतुकीला थांबवलेले नाही, माणसांची वाहतूक थांबवली आहे. जेणेकरून साथीचा प्रसार होणार नाही. 

हेही वाचा - राज्यात लवकरच सुरू होणार हाॅटेल व्यवसाय- उद्धव ठाकरे

जुन्यांच्या नोकऱ्या घालवू नका

काही उद्योग आणि व्यवसायांतून नोकर कपात सुरु असल्याचं कळत असून ते चुकीचं आहे. कामगारांना नोकरीवरून काढू नका अशी आपली पहिल्यापासून भूमिका आहे. आपण स्वत: यासंदर्भात काही व्यवस्थापनांशी बोलणार आहोत. एकीकडे काही कारखाने परराज्यातील गावी गेलेल्या कामगारांची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे स्थानिक भूमिपुत्र नोकरीसाठी इच्छुक आहेत. अशा स्थितीत जे उपलब्ध आहेत त्यांना लगेच नोकऱ्या द्या आणि व्यवसाय सुरु करा, पण नव्या नोकऱ्या देताना जुन्यांच्या नोकऱ्या घालवू नका, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.  

औद्योगिक कामगार ब्युरो सुरु

यावेळी बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं, औद्योगिक कामगारांच्या नोकरीविषयक तक्रारी तुलनेने कमी आहेत. परंतु सेवा क्षेत्र मात्र अडचणीत आलेलं आहे. त्यांचा व्यवसायसुद्धा कमी झाला आहे. कंपन्या आणि मालकांसमोरसुद्धा अडचणी आहेत. मात्र कामगार, कर्मचारी याचे कुटुंब चालेल, चूल पेटेल अशी समंजस भूमिका घेणं गरजेचं आहे. मालकांशी सातत्याने संवाद साधून मार्ग काढता येईल. देशातील पहिल्या औद्योगिक कामगार ब्युरोचं उद्घाटन आपण करीत आहोत. जेणेकरून कुशल, अकुशल आणि अर्धकुशल कामगारांना रोजगार मिळेल.

यावेळी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सर्वश्री सुर्यकांत महाडिक, अजित साळवी, मनोहर भिसे, विनोद घोसाळकर, रघुनाथ कुचे, संजय कदम, विजय वालावलकर, मनोज धुमाळ, जीवन कामत, उदय शेट्ये, प्रभाकर मते-पाटील आदींनी सूचना केल्या.

काही व्यवस्थापन परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कामगार कपात करीत आहेत, विशेषत: कंत्राटी कामगारांच्या नोकऱ्या जात आहेत. सेवा उद्योग अडचणीत आहे. सर्व हॉटेल्स मेटाकुटीला आले आहे, कायम कामगारांवर वेतन कपातीची टांगती तालावर आहे. डिसेंबरपर्यंत ही वेतन कपात करावी असे सांगण्यात येत आहे. हॉटेल्स, आयटी, लॉजिस्टिकमध्ये कामगारांना कमी करणं सुरु आहे, छोट्या कंपन्यांनी तर कपातीचाच मार्ग अवलंबिला आहे अशा प्रकारच्या अडचणी यावेळी मांडण्यात आल्या.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा