Advertisement

मुंबईतला पत्रकार बनला गुजरातमध्ये आमदार, जिग्नेश मेवाणीने चारली भाजपाला धूळ

मुंबईत तीन वर्षे पत्रकारिता केलेल्या जिग्नेशने गुजरातमधील बानासकांठा जिल्ह्यातील वडगाममधून निवडणूक लढवताना भाजपाच्या चक्रवर्ती विजयकुमार हरकाभाई यांना तब्बल १८ हजार १५० मतांनी धूळ चारत दणदणीत विजय मिळवला आहे.

मुंबईतला पत्रकार बनला गुजरातमध्ये आमदार, जिग्नेश मेवाणीने चारली भाजपाला धूळ
SHARES

गुजरात निवडणुकीत भाजपाच्या विजयाची वाट अवघड करणारे तीन तरूण चेहरे म्हणजे हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी. त्यापैकी मुंबईत तीन वर्षे पत्रकारिता केलेल्या जिग्नेशने गुजरातमधील बानासकांठा जिल्ह्यातील वडगाममधून निवडणूक लढवताना भाजपाच्या चक्रवर्ती विजयकुमार हरकाभाई यांना तब्बल १८ हजार १५० मतांनी धूळ चारत दणदणीत विजय मिळवला आहे.


मुंबईशी ऋणानुबंध

सोमवारी गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होताच जिग्नेश हे नाव प्रकाशझोतात आलं. गुजरातमध्ये आंबेडकरी चळवळ रूजवणारा दलित नेता अशी ओळख बनलेल्या जिग्नेशने तीन वर्षे मुंबईत पत्रकारिता केली असून जिग्नेशचा मुंबईशी ऋणानुबंध असल्याची माहिती जिग्नेशचे निकटवर्तीय अमित चावडा यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.



आंबेडकरी नेत्यांचा पाठिंबा

वडगामधून भाजपाला नमवत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या जिग्नेशला मुंबईसह राज्यभरातील आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी पाठिंबा दिला होता. इतकंच नव्हे, तर वडगाममध्ये जाऊन त्याच्यासाठी प्रचार करणाऱ्यांमध्ये भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. तर आंनदाराज आंबेडकर यांनीही जिग्नेशला पाठिंबा देत त्याला जिंकून देण्याचं आवाहन वडगामधील दलित उमेदवारांना केलं होतं.


गुजरातमध्ये आंबेडकरी चळवळीचा उदय

गुराढोरांची चामडी सोलण्यास नकार द्या, मैला उचलू नका, असं दलित बांधवांना सांगत 'आझादी कूच' नावाने आंदोलन उभं करणाऱ्या जिग्नेशच्या विजयामुळे गुजरातमध्ये आंबेडकरी चळवळीचा उदय झाल्याचं मत, प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. जिग्नेश गुजरातमधील दलित बांधवांना न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


मासिकासाठी पत्रकारिता

काही वर्षे जिग्नेशचं मुंबईत वास्तव्य होतं. बोरीवलीतील एका फ्लॅटमध्ये जिग्नेश पेईंगगेस्ट म्हणून काही मित्रांबरोबर राहत होता. जिग्नेश पेशाने वकील असल्याचं सर्वांनाच माहित आहे, पण त्याआधी तो पत्रकार होता. त्याने मुंबईत पत्रकारिता केल्याचं खूप कमी लोकांना माहीत असेल. गुजरातमधील प्रसिद्ध 'अभियान' या गुजराती मासिकासाठी जिग्नेश पत्रकारिता करत असल्याचंही चावडा यांनी सांगितलं आहे. साधारणत: २००६ ते २००८ अशी तीन वर्षे त्याने मुंबईत पत्रकारिता केली आहे. जिग्नेशने अंधेरीतील भवन्स काॅलेजमध्ये शिक्षण घेतल्याचीही चर्चा आहे.



हेही वाचा-

भाजपाच्या मुंबई टीमने सूरत जिंकलं!

गुजरात निवडणूक: १ किलो सोनं घालून केला प्रचार, शिवसेनेच्या उमेदवाराचं डिपाॅझिट झालं जप्त

गुजरात निवडणूक इफेक्ट: सेन्सेक्समध्ये ९४१ अंकांची रिकव्हरी


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा