
राज्यात लवकरच हुक्का पार्लरवर बंदी येण्याची शक्यता आहे. तसे संकेत नुकतेच मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिले. हुक्का बंदीसाठी नवा कायदा करण्यात येणार असून या कायद्याचं प्रारूप तयार करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
काही महिन्यांपूर्वी कमला मिल कंपाऊंडमधील मोजोस बिस्ट्रो या रेस्टोपबमध्ये हुक्क्यामुळे लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता, तर ५६ जण जखमी झाले होते. यानंतर संपूर्ण राज्यात हुक्का पार्लरवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली.
त्यानुसार हिवाळी अधिवेशनात आ. मंगलप्रभात लोढा यांनी हुक्का पार्लर बंदीचा मुद्दा उपस्थित केला होता. हुक्का पार्लरच्या माध्यमातून अंमली पदार्थ तरूणांपर्यंत पोहोचत असल्याचं निदर्शनास आल्याने हुक्का पार्लवरील निर्बंधांकरिता नवीन कायदा बनवण्याचा विचार शासनाने केला. त्याप्रमाणे या नवीन कायद्याचं प्रारूप तयार करण्यात आलं असून हे प्रारूप लवकरच मांडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ''यापूर्वी राज्यात हुक्का पार्लरसाठी कोणताही कायदा नव्हता. त्यामुळे हुक्क्यावर निर्बंध आणणं कठीण जात होतं. म्हणून नवीन कायदा तयार करण्यात येत आहे. कमला मिल कंपाऊंडप्रकरणी तात्काळ चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यानंतर ६ अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यात आलं. न्यायालयाच्या निर्देशानुसार चौकशी समितीची स्थापना करण्यात येणार असून त्यात केवळ न्यायाधीशच नाही, तर १ निवृत्त न्यायाधीश, १ नगररचनाकार, १ अर्बन डेव्हलपमेंट मधील माजी सचिव यांचा समावेश असणार आहे.''
आग लागलेल्या रेस्टो पबमध्ये 'फायर एक्झिट' होती. मात्र, केवळ नफा कमावण्यासाठी त्या मार्गामध्ये टेबल ठेवल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळेच अनेकांचा जीव गेला, असं मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा-
कमला मिलमधील 'ती' आग हुक्क्यामुळेच!
