Advertisement

कांदिवलीतला 'ढोकळा’वाला नरमला, मनसेच्या आंदोलनाचा दणका

दुकानाची पाटी मराठीत करण्याची अनेकदा सूचना देऊनही तसं न करणाऱ्या ढोकळावाल्याला अखेर तोडफोडीनंतर जाग आली अन् मंगळवारी सकाळी त्याच्या दुकानावर मराठीत पाटी झळकू लागली. आंदोलनानंतर नरमलेल्या या ढोकळावाल्याची मुंबईत चांगलीच चर्चा आहे.

कांदिवलीतला 'ढोकळा’वाला नरमला, मनसेच्या आंदोलनाचा दणका
SHARES

गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर सरकारवर आगपाखड करताच मनसैनिकांनी मुंबईत खळ्ळखट्याकला सुरूवात केली. मेळाव्याहून परतताना मनसैनिकांनी वसईतील हाॅटेल-ढाब्यावरील गुजराती पाट्यांची तोडफोड केली. तर सोमवारी कांदिवलीतील राजू ढोकळावाला दुकानाच्या पाटीला लक्ष्य केलं. दुकानाची पाटी मराठीत करण्याची अनेकदा सूचना देऊनही तसं न करणाऱ्या ढोकळावाल्याला अखेर तोडफोडीनंतर जाग आली अन् मंगळवारी सकाळी त्याच्या दुकानावर मराठीत पाटी झळकू लागली. आंदोलनानंतर नरमलेल्या या ढोकळावाल्याची मुंबईत चांगलीच चर्चा आहे.


नेमकं काय झालं?

मनसेचे कांदिवलीतील विभाग प्रमुख दिनेश साळवी यांच्या नेतृत्वाखाली कांदिवली स्थानकानजीकच्या गुजराती पाट्यांना लक्ष्य करत सोमवारी या पाट्यांची तोडफोड करण्यात आली. मनसेच्या या आंदोलनादरम्यान गुजरातीत पाटी लावणाऱ्या कांदिवलीतील राजूभाई ढोकळावाल्याला देखील मनसैनिकांनी आपला हिसका दाखवला. या पाटीच्या तोडफोडीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.


दणका देणार

या खळ्ळखट्याकनंतर आता राजू ढोकळावालाच्या दुकानावर मंगळवारी चक्क मराठी पाटी झळकू लागली. मनसेच्या आंदोलनाचा हा दणका मानला जात असून यापुढंही जिथे जिथे गुजराती वा इतर भाषेतील पाट्या दिसतील तिथे दुकानदाराला मनसे स्टाईल दाखवण्यात येईल, अशी प्रतिक्रिया साळवी यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली. तर दुसरीकडे मराठीतून पाटी लावणाऱ्या राजू ढोकळावाल्याला उशीरा का होईना पण जाग आल्याबद्दल अभिनंदनही केलं.


म्हणून, पाटी बदलण्यास उशीर

राजू ढोकळावाला यांना पाटी बदलण्यासाठी मनसेकडून अनेकदा निवेदन देण्यात आलं होतं. पण राजू ढोकळावाला यांनी या निवेदनाकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे मसने स्टाईल दाखवत ही पाटी फोडण्यात आल्याचं समर्थन साळवी यांनी केलं.

तर दुसरीकडे मनसेच्या निवेदनानुसार आपण पाटी बदलणार होतो. पण आपल्या घरी लग्न असल्यानं पाटी बदलण्यासाठी वेळ मिळाला नाही आणि तितक्यात मनसैनिकांकडून पाटी तोडण्यात आल्याचं राजू ढोकळावाला यांनी 'मुंबई लाइव्ह'ला सांगितलं. काही का असेना पण मनसेच्या दणक्यानंतर ढोकळावाला नरमला, हे मात्र नक्की.



हेही वाचा-

भारत मोदीमुक्त करा- राज ठाकरे

देशातला मीडिया मोदीनियंत्रीत- राज ठाकरे



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा